सार्थक संस्थेच्या वतीने मुलींना सायकल वाटप
शौकतभाई शेख
श्रीरामपूर-समाजात अनेक अडचणींना सामोरे जात अनेक मुली शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहेत,अशा मुलींचे शिक्षण अविरतपणे चालू रहावे याकरिता सार्थक बहुउद्देशीय संस्था पितृत्वाची भूमिका पार पाडत आहे हे अभिमानास्पद बाब असल्याचे केशव गोविंद देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पुजारी यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील केशव गोविंद विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात विविध कारणांनी पितृत्व हरवलेल्या मात्र माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या तालुक्यातील काही मुलींना सार्थक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सायकल वाटप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बापूसाहेब पुजारी बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य किसनराव वमने होते. व्यासपीठावर शाळेचे प्राचार्य सोपानराव मगर,अमित कन्स्ट्रक्शन चे अमित मोहिते, ट्रस्टचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव भगत, केंद्रप्रमुख योगेश महामिने, अविनाश काटकर, संस्थेचे अध्यक्ष उमेश तांबडे, उपाध्यक्ष समीर बागवान, महेजबीन बागवान,आमीन शेख परीक्षित नाईक,संचालक संजय कोळसे पाटील,भारत वारुळे,प्रशांत होन,शिक्षकवृंद आदि उपस्थित होते.
श्री.पुजारी पुढे म्हणाले,पालकत्व हरवल्यानंतर सर्वाधिक नुकसान त्या कुटुंबाचे होत असते, त्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकच समस्यांना तोडून द्यावे लागते अशावेळी सार्थक संस्थेने पुढाकार घेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुलींना सायकली भेट देत त्यांच्या शिक्षण घेण्याच्या जिद्दीला प्रोत्साहन दिले हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रारंभी संस्थेचे सचिव शकील बागवान यांनी संस्थेचे कार्य सांगताना समाजातील सामाजिक भान जपणारे अनेक जण संस्थेला मदत करत असतात त्यातून संस्था प्रामुख्याने मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यावर लक्ष देते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य किसनराव वमने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणाच्या धोरणामुळे स्त्रियांच्या माध्यमातून किमान अर्धे जग शिक्षणाच्या प्रवाहात आल्याचे म्हटले.मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या सार्थक संस्थेला उज्वल भवितव्य असल्याचेही म्हटले.
याप्रसंगी सायकल प्राप्त मुली भक्ती बोल्हे,अक्षदा मुसमाडे, आयेशा शेख आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश राजुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिरीष सूर्यवंशी यांनी केले.

