नागरी समस्यांप्रश्नी नगर पालिका प्रशासन दखल घेणार का हो ?
गोंधवणीरोड पुलाजवळील रस्ता दुरुस्त करुन देणार का हो ?
सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख (ABS)
इम्रान शेख
श्रीरामपूर - शहरातील वाढती रहदारीमुळे रस्ते वारंवार खराब होणे, ड्रेनेज फुटणे,पावसाळ्यात पाणी साचणे इत्यादी समस्या उद्भवत असतात. श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील गोंधवणी रोड पुलाजवळील प्रभाग १ व १२ कडे जाणारा सुमारे १०० मीटर पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावेत अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजहर शेख (ABS) यांनी श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, संजयनगर,इदगाह परिसर,रामनगर,मिल्लतनगर, फातेमा हौसिंग सोसायटी जि.प.कर्मचारी सोसायटी आदि ठिकाणी जाण्या- येण्याकरीता हा मुख्य रस्ता होय, म्हणून या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.मात्र हा रस्ता जणू नगर पालिकेने कायमचाच दुर्लक्षत केल्याने सदरील परिसरातील नागरिकांनी कमालीचा त्रास सहन करणे भाग पडत आहे.याकरीता मागे दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी संबधित रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी संघटनेच्या वतीने सदरील रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करुन झाडे लावा आंदोलन करत श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आलेले होते. तरी देखील अद्यापपर्यंत नगर पालिका प्रशासनाने यावर कोणतेही कार्यवाही केली नाही,तथा रस्त्याचे कामेही झालेले नाही. याविषयी परिसरातील नागरिकांची वारंवार तक्रार येत असून मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर सतत रहदारी व वर्दळ सुरु असते. तसेच कायम त्याठिकाणी रस्ता खराब होत असल्याने अपघात घडणे, पावसाळ्यात पाणी साचणे, पाटाचे पाणी पाझरणे इत्यादी समस्या उद्भवत आहे. सध्या त्याठिकाणी भुयारी गटारीचे काम चालू झाल्याने सदरील रस्ता आणखी फुटला असल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सदरचा रस्ता फक्त १०० मीटर पर्यंत खराब असल्याने संबंधित प्रशासन नेहमी या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वारंवार लेखी व तोंडी निवेदन देवूनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही की या कामांमध्ये कसलीच तत्पर्ता दाखविली जात नाही,हे शहरातील नागरीकांचे दुर्दैव नव्हेतर काय असे म्टल्यास वावगे ठरणार नाही,अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
या प्रकारास परिसरातील नागरीक पुरते वैतागले गेले असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे याकरीता त्यांना देखील लेखी निवेदन पाठविण्यात आलेले आहे.सदर ठिकाणी कोणताही अपघात घडल्यास किंवा येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम सुरु न झाल्यास संबंधित नगर पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात समस्त त्रस्त नागरीकांसमवेत रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही अजहर शेख यांनी या निवेदनात दिला आहे.
यावेळी निवेदन देताना अल्तमश शेख, सौरभ जाधव, फैजान बागवान, नरेंद्र लोंढे, मोईज पठाण, सामाजिक कार्यकर्ते तौफिक शेख, राष्ट्रीय मानवाधिकारचे जिल्हाध्यक्ष जमीर पिंजारी, नोमान शेख, धीरज पवार, फरदीन शेख, बिलाल काकर, प्रशांत मिसाळ, वैभव शेळके आदि उपस्थित होते.

