*मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सपकळवाडीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची केली दिलजमाई.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील गटा-तटाचे राजकारण तसेच पक्षांतर्गत मतभेद संपवून,सर्वांची एकत्र वज्रमूठ बांधण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळी प्रत्येक गावात जाऊन मोर्चेबांधणी करणार - सचिन सपकळ.
इंदापूर प्रतिनिधी: अनेक मातब्बर नेते पक्षाकडे असताना सुध्दा केवळ गावाअंतर्गत कार्यकर्त्यांच्या गटा-तटाच्या राजकारणामुळे पक्षाचे अतोनात नुकसान होत आहे.याचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला बसत आहे. त्यामुळे मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आतापासूनच सक्रिय झाले असुन त्यांनी प्रत्येक गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामधील मतभेद मिटवून मनोमिलन करण्यास सुरवात केली असून याची सर्वप्रथम सुरवात सपकळवाडी गावामध्ये झाली आहे.
या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य सचिन सपकळ व मार्केट कमिटीचे मा.संचालक भाऊसाहेब सपकळ यांच्या गटात प्रत्येक निवडणूकीमध्ये एकमेकांविरोधात टोकाचा संघर्ष पहायला मिळायचा,यादरम्यान पक्षाच्याच दोन गटातील होणाऱ्या राजकारणामुळे पक्षातील वातावरण गढूळ होत असायचे,मात्र गावकी-भावकीच्या राजकारणात नेते मंडळी पडत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर नेहमीच दरी वाढलेली पहायला मिळायची. परंतु महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परस्थिती बघता पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची वज्रमूठ बांधणे गरजेचे असल्याने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आतापासूनच ॲक्शन मोडवर आले असुन त्यांनी कालच सपकळवाडीत दोन्ही गटाचे मनोमिलन घडवून दोन्ही गटातील एकमेकांनी साखर चारून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.
मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत सपकळवाडीतील कार्यकर्त्यांनी गावातील सर्व मतभेद संपवून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एकदिलाने काम करण्याचे श्री.भरणे यांच्या समक्ष जाहीर केले आहे.
यावेळी सचिन सपकळ, भाऊसाहेब सपकळ,शिवाजी नथु सपकळ,शिवाजी जगन्नाथ सपकळ,शिवाजी गुंडिबा सपकळ,शिवाजी सोपान सपकळ,सुनिल भुजबळ,तानाजी सोनवणे,जगदीश सपकळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी उमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्त्यांनी एकत्र येत गावगाड्यातील सर्व मतभेद मिटवले आहेत.अशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील गटा-तटाचे राजकारण तसेच पक्षांतर्गत मतभेद संपवून,सर्वांची एकत्र वज्रमूठ बांधण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळी प्रत्येक गावात जाऊन मोर्चेबांधणी करणार आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत होणार असल्याचे सपकळ यांनी सांगितले.

