shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानवी स्वभावाच्या छटा उमटवणारे समुद्राशी हितगूज साधणारे श्रृतीचे पत्र..!

प्रिय,मला गवसलेल्या समुद्रास आज मला माझ तुझ्याशी असणाऱ्या नात्याबद्दल आणि तुझ्या कलेने तुझा खोलवर विचार करावसा वाटतोय.अनेक कवितांत,गाण्यांत तू प्रतिमेच्या रुपाने येतोस, अनेकांचा तू जिव्हाळ्याचा विषय,शास्त्रज्ञांचा तू अभ्यासाचा विषय.अनेक पर्यटक,रसिक, निसर्गप्रेमी तुझ्या किनाऱ्यावर बसून मनातल्या मनात भूतकाळाच्या किनाऱ्यावर पोहोचतात,काही भविष्याची स्वप्न रंगवतात तर काही एकटे स्वतःचा शोध घेतात.मी तिसऱ्या प्रकारातील बरं का ! पण आज मला तुझ्या मनाच्या तळाशी यावसं वाटतंय.

वर्षामागून वर्षे गेली, शतके गेली, आजूबाजूची परिस्थिती बदलली, माणसे बदलली, क्रांती घडून आली, तू मात्र आहेस तसाच, स्वतःच्याच विश्वात रममाण असणारा. तू कसा आहेस हे मला माझ्या आकलन शक्तीनुसार उमगलयं म्हणून वर मला गवसलेला समुद्र असा उल्लेख केला आहे. काहीजण म्हणतात तू सामावून घेणारा आहेस तर काही म्हणतात तुला नको असणाऱ्या गोष्टी तू बाहेर फेकणारा आहेस, पण मला असं वाटतं तू तुला हव तस जगणारा ,कुणाच्याही विश्वात रस नसणारा आहेस ,किंबहुना म्हणून च की काय सर्वांना तुझ्या विश्वात रस आहे.

तुझ्या किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक लाटा काही ना काही शिकवून जातात. तुझी एक बाब मला फ़ार आवडते, तू तुझ्या नदीची साथ कधीच सोडली नाहीस. तू शिकवलसं, बंधनात न रहाता आपल्याला हवं तस जगायला.तुझा हा स्वभाव तू बदलू नकोस हं ! कुणासाठीच ! का बदलायचं हे तुझं आयुष्य आहे ते तुझ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार हा सर्वस्वी तुझा आहे. तुझ्या मनाची कवाडे सताड उघडी असतात तू सामावून घेतोस सर्वांना अगदी आहे तस !तुझ्या स्वभावाची हि दुसरी छटा. आणि जे तुला सहन होत नाही ते बाहेर टाकतोस.बरोबरच आहे तुझ. तुझीही एक सहनशक्ती आहे. पण इतकही दिलदार असू नये रे की सर्वांनाच साठवून घ्यावं .नंतर तुलाच त्याचा त्रास होत असेल ना ?, ए पण तू कधी खवळू नकोस हं ! मला तुझ शांत रुपच आवडतं.खरं तर ज्या पाण्याचा तळ दिसतो ते पाणी शुद्ध. पण तुझ्या मनाचा तळ खूप शुद्ध आहे रे. सर्वांना सामावून घेणं हा तुझा स्वभाव ,तुला हवं तसं तू वाहतोस अगदी निस्वlर्थी पणे, कुणालाही त्रास न देता. इतक विष पोटात पचवल आहेस आणि तरीही प्रसन्नतेचा वर्षाव करतोस. तुझ्याकडे पाहीलं की, खूप शांत वाटतं, मोकळं वाटतं. तुझ्यासारखं जगावसं वाटतं निर्धास्त.पण तुझ्यासारखं सगळ्यांना सामावून घेण नाही जमायचं. कारण सामावून घेणारा स्वभाव घेऊन मला स्वतःला हरवून नाही बसायचन.आता तुला असं वाटेल माझ्या लेखनाची दिशा नकारात्मकतेच्या दिशेने जातेय ,पण खरचं सांग ना, स्वतःला विचारून तुझ्या या स्वभावामुळे तू स्वतः खुश आहेस का ? तुझं उत्तर हो असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीय.

 मी माझ्या सोयीनुसार तुझ्याकडे बघतेय का ?, काही का असेना, तुझ्यातलं जे आवडलं त्याचा खुलासा केला आहे आणि तुझ्यातलं जे तुलाच घातक आहे त्याचाही खुलासा केला आहे. तुला अशी भिती नाही वाटत का की सगळे तुला गृहित धरू लागतील.मला माहितीय तुला त्रास देणारे अनेक आहेत. पण माझ निनामी नातं तुझ्याशी जडलेलं आहे त्याच नात्याच्या हक्काने सांगतेय तू इतरांना संधीच देऊ नकोस,तुला त्रास देण्याची. स्वतः साठी स्वतःला बदल.शेवटी तुला योग्य वाटतंय ते तू कर, मला माहीती य की तू तुला हव तेच करणार पण तरीही हा अट्टहास,मी करतेय कारणं मला तुझं खवळलेल रुप नाही बघायचंय.

आपल नात असचं कायम रहाणार आहे ,कारण तू कुठेच जाणार नाहियस इथेच असणार आहेस ,आणि ज्या नात्यांची खात्री तीच नाती मी जोडते हा माझा स्वभाव.त्यामुळे वचनाशी प्रामाणिक असणारा तू मला फ़ार आवडतोस, ए शेवट कसा करु रे ? तुझी हितचिंतक म्हणाले तर अगदीच उपदेशात्मक पत्र होईल. तुझी चाहती म्हणू का ? हो तेच म्हणते.
कळावे ,
 तुझी चाहती ,

 कु. श्रृती संजय रसाळ - मुंबई

संकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर

close