बेलापूर । प्रतिनिधी:-
एखाद्या उद्घाटनाचा कार्यक्रम अन मंत्रीमहोदयांचा व्यस्त कार्यक्रम हे नित्याचेच झालेले.मात्र जेंव्हा विद्यार्थ्यांचे सादरीकरण मंत्रीमहोदय मन लावून ऐकतात आणि सादरीकरणाने प्रभावित होतात,भारावून जातात, तेव्हा चक्क मुलांना शाबासकी मिळते आणि मुलांचा उत्साह गगनात मावेनासा होतो.विद्यार्थीही आनंदून जातात.
प्रसंग आहे बेलापूर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्याच्या पायाभरणीच्या समारंभाचा.या कार्यक्रमास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.त्यांच्याच हस्ते खोल्यांच्या पायाभरणीचा समारंभ पार पडला.यावेळी गावातील अनेक मान्यवरांसह गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी या देखील उपस्थित होत्या. याप्रसंगी मिळालेल्या वेळेच्या भाऊगर्दीमध्ये उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जलील शेख व इयत्ता तिसरीच्या वर्गाशिक्षिका महेजबीन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मंत्रीमहोदयांसमोर एक छोटीशी नाटिका सादर केली,ज्यात राष्ट्रभक्ती ओतपोत भरलेली होती.भारत देश कसा विविध जातीधर्मांनी समृद्ध देश आहे हे दर्शविणारी नाटिका अल्पावधीमध्ये विविध वेशभूषा धारण करून मनमोहकपणे सादर केली आणि सदरीकरणावर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
मंत्री विखे देखील जाम खुश झाले.
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या छोट्याशा पण प्रभावशील नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली यात विविध जाती- धर्मांनी समृद्ध असलेली भारत माता हा त्या नाटीकेचा गाभा होता.या विषयाने नामदारांना मोहित केले पण जेव्हा उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री महोदय उभे राहिले त्याचवेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडे रोख करत हिंदी भाषेमध्ये बच्चो,आपके नाटयीकरणसने हमे बहुत खुश किया असे म्हणत उत्स्फूर्त दाद दिली.
यामध्ये अल्कमा सय्यद,अमान मंसुरी,बुशरा आत्तार,रिफत बागवान,मदिहा शेख,तमन्ना सय्यद,खदीजा सय्यद,हुदा सिद्दिकी आणि आलिया कुरेशी आदीं विद्यार्थ्यांनी भूमिका उत्तमरित्या पार पाडली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे उत्तम असे सहकार्य लाभले.

