छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण युवा पिढीने आचरणात आणावेत - अनिताताई खरात
शिवजयंतीनिमित्त तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
इंदापूर: काल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इंदापूर मधील वेगवेगळ्या शिवजयंती उत्सवास तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात यांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना अनिताताई म्हणाल्या की, सध्याच्या युवा पिढीला महाराजांचें गुण आत्मसात करून ते आचरणात आणण्याची खूप गरज आहे. सध्याची काही युवा पिढी भरकटत चालली आहे. जातिवाद महिलावर होणारे अत्याचार, इतरांविषयी द्वेष भावना, भ्रष्टाचार या गोष्टी वाढत चालल्या आहेत आणि महाराजांचा या गोष्टीला विरोध होता. महाराजांनी नेहमीच सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन राज्य केले. परस्त्रीला मातेसमान मानले. उच्चनीच, गरीब, श्रीमंत हा भेदभाव राजांनी कधीच केला नाही आणि आत्ताची युवा पिढी कुठे चालली आहे याचा विचार करून युवकांनी अशा जयंती उत्सवातून संकल्प करावा की महाराजांचे गुण आत्मसात करून त्याप्रमाणे आपले आयुष्य जगावे. या सर्व गोष्टी करून महाराजांचे गुण व आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आयुष्य जगले तरच आपण आपल्या आयुष्याची लढाई यशस्वीपणे पार पाडू शकतो.महाराजांना अपेक्षित असणारे राज्य आपण निर्माण करू शकतो असे विचार जयंती निमित्त अनिताताईंनी मांडले.

