shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सृष्टी आणि सृष्टीपल्याड बघण्याची दृष्टी देते ते शिक्षण आणि शिक्षक


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे ,डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी प्रगल्भ विचारांचा समाज घडवणाऱ्या शिक्षणाने समृद्ध समाज घडविण्यात आपले जीवन वेचणारे सर्व समाज सुधारकांना तसेच अंधश्रद्धेने माखलेल्या समाजाची मनोभूमी नांगरून त्यावर ज्ञानाची बीजे रोवून त्याची जोपासना करणाऱ्या संत साहित्याला वंदन.

    सदर लेखात मी शिक्षणाविषयी ,शिक्षकांविषयी माझे विचार मांडणार आहे.अनेक थोर माणसांनी शिक्षणाचे महात्म्य लिखाणाच्या स्वरूपात, वक्तव्याच्या रूपात मांडले आहे .थोर साहित्यिक प्राध्यापक अशोक बागवे यांनी 'स्वताच स्वताचा आरसा होणे' याला शिक्षण म्हटले आहे. अब्राहम लिंकन यांच्या पत्रातून सुजाण नागरिक घडविण्याची तळमळ मला ते पत्र वाचताना जाणवली.
       मला असं वाटतं अन्न, वस्त्र, निवारा या सर्वच सजीवांच्या मूलभूत गरजा पण माणसाला इतकच पुरेसं नाही मनुष्य प्राण्याकडे कला आहे, शिक्षण आहे ,विचार करण्याची क्षमता आहे ,बुद्धी आहे म्हणून तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ,प्रगल्भ आहे. कलेचे शिक्षण असो वा पुस्तकांचे शिक्षण असो शिक्षण माणसाला माणूस बनवतं. विचार योग्य दिशेने करण्याची क्षमता देत. शरीराची वाढ  निसर्गातः  होते पण मनाची ,बुद्धीची प्रगल्भता वाढवण्याची क्षमता ही शिक्षणात असते.शिक्षण आणि शिक्षक कसा असावा या प्रश्नाचं माझं उत्तर म्हणजे माझी शाळा सांताक्रुज़ येथे वसलेली साने गुरुजी आरोग्य मंदिर .माझ्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे माझी शाळा फक्त जगणे शिकवत नाही तर कलात्मकतेने जगणे शिकवते. माझ्या शाळेत संगीत, नृत्य, क्रीडा ,जुडो टेबल टेनिस, मल्लखांब ,कॅरम पासून सर्व सर्व आहे.  शाळा म्हणजे ज्ञानाचा प्रगल्भ विचारांचे सुजाण नागरिक घडविण्याचे मंदीर ही व्याख्या माझ्या शाळेकडे बघून मी करीन. मनुष्य हा बालवयात जास्तीत जास्त वेळ अगदी आई-वडिलांच्या पेक्षाही जास्त वेळ आपल्या शाळेत गुरूवर्य यांच्या सहवासात असतो. तेथे उमलत्या वयात त्याला सुरक्षित वातावरण ,सुसंस्कृत गुरुवर्य लाभणे फार महत्त्वाचं. बऱ्याच यशस्वी माणसांचा हा अनुभव आहे की बालवयात चित्रकला शिक्षक, मराठी विषयाचा शिक्षक किंवा संगीत शिक्षक हे त्या त्या विषयाचे ज्ञान देत त्या त्या विषयाची गोडी लावून जातात आणि माणसाला त्याच्यातील सुप्त गुणांची ओळख होऊन तीच त्याच्या जगण्याची दिशा ठरते.
       माझ्या शाळेतील एकाही शिक्षकाने कधीही दुजा भाव केलेला मला आठवत नाही का कुणाचा त्रागा केलेला नाही जीव ओतून शिकवणे, शिक्षकी पेशा सोबत संपूर्णतः प्रामाणिक असणं काय असतं हे मी माझ्या शिक्षकांकडून शिकले आणि अनुभवले सुद्धा .माझ्या विद्यार्थ्यांना विषयाचे संपूर्णतः आकलन व्हावं, त्यांच्यात संस्कार मुल्ये रुजावीत सुजाण नागरिक घडावा, त्याच्यात नेतृत्व गुण असावेत त्याच्यातील सुप्त कला विकसित व्हावी ,आत्मविश्वासाने जगणारा माणूस, योग्य दिशेने विचार करण्याची क्षमता त्याच्यात रुजावी स्वतःचे ठाम मत ,ठाम विचार असावेत इतका परिपूर्ण माणूस घडला पाहिजे ही तळमळ माझ्या शाळेची कायमच मी पाहत आली आहे. माझ्या शाळेने अनेक पत्रकार, सीए ,चित्रकार ,वादक घडवले आहेत. माझ्या तर संपूर्ण जीवन माझ्या शिक्षकांनी, शाळेने व्यापल आहे आणि बहरले आहे. मी या शाळेत अल्पकाळ होते काही कारणास्तव तेथील स्थैर्य बदलावे लागले व आमचे वास्तव्य दुसऱ्या ठिकाणी झाले परंतु आजही शाळेत सोबतची नाळ माझी तशीच आहे .माझ्या बाई आजही माझ्यावर माझ्या लेखणीवर ,माझ्या वक्तृत्वावर तितकच प्रेम करतात सर्व माजी विद्यार्थी अनेक कार्यक्रम उपक्रम आमच्या शाळेत राबवतो. इतकी वर्षे लोटली पण आजही प्रत्येक क्षण मला आठवत असतो माझ्या शाळेत गेले की मंदिरातच गेल्यासारखं वाटतं मला खूप जपलं आहे माझ्या बाईंनी, सरांनी म्हणून शाळा शिक्षण शिक्षक हे शब्द उच्चारताच मी हळवी होते.
       आज माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझे पहिले गुरू माझे आजोबा पांडुरंग महादेव रहाटे यांचं आणि मला लाभलेल्या सर्व माझ्या गुरुवर्यांमुळे त्यांनी मला जगण्याची दिशा दिली आत्मविश्वास दिला प्रेम दिले. 
        माणूस कितीही मोठा झाला तरी शाळेबद्दल गुरुवर्यांबद्दल त्याच्या मनात आठवणींचा हळवा कोपरा असतोच माझ्या शिक्षकांनी कायमच मला प्रोत्साहन दिले आहे चांगले काय वाईट काय नीरक्षीर विवेक बुद्धी शाळेमुळे मिळाली. मिळून मिसळून सहकार्य करत एकजुटीने पुढे जाण्याची संस्कार मूल्ये सर्वच विद्यार्थ्यांमध्ये रुजवली शाळेनं. ही संस्कार मूल्य अधोरेखित करताना ग. दी माडगूळकरांचे शब्द मला आठवतात, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख यात शेवटी कुरुप वेड पिल्लू स्वतःच् प्रतिबिंब पाहतो तेव्हा त्याला कळतं की तो राजहंस आहे हे प्रतिबिंब दाखवण्याचे कार्य शिक्षण आणि शिक्षक करत असतात व माझ्या शिक्षकांनी माझ्या बाबतीत केले त्याचबरोबर इतर पिल्लांमध्ये जे समाजाचे प्रतिक आहेत त्यांच्यात मिळून मिसळून राहण्याची सहकार्याची भावना असते तर त्यांच्या वागणुकीचा राजहंसाला त्रास झाला नसता म्हणून संस्कार मूल्य सुद्धा शिक्षक रुजवू शकतो आणि सुजाण, विवेकी समाज घडविण्याची ताकद शिक्षकात असते.

*कु.श्रृती संजय रसाळ - मुंबई
एम. ए. (बी.एड.(प्रथम वर्ष )

*वृतसंकलन: स्वाभिमानी न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close