श्रीरामपूर प्रतिनिधी:
आमदारच पोलीस प्रशासन व अधिकार्यांपुढे हतबल होऊन थेट विधानसभेत आपली व्यथा मांडत असतील तर तो घणाघात नसून आमदारांची हतबलता असल्याचे तसेच आमदारांचा प्रशासनावर वचक नसल्याचे द्योतक आहे. आमदारच असे हतबल होत असतील तर सामान्य जनतेने काय करावे, असा सवाल लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलतांना श्री.धुमाळ म्हणाले की, आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूरच्या पोलीस अधिकार्यांची गुन्हेगारांबरोबर हातमिळवणी याबाबत विधानसभेत घणाघात, असे आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
.
वास्तविक आमदारांचा प्रशासनावर तसेच शासकीय व्यवस्थेवर अंकूश असणे गरजेचे आहे. ज्याअर्थी आ.कानडे यांनी हा विषय थेट विधानसभेपर्यंत नेला यातून त्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचेच स्पष्ट होते. खरे तर याबाबत आ.कानडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक यांच्याशी चर्चा करणे संयुक्तीक ठरले असते. जर पोलीस अधिकार्यांची गुन्हेगारांबरोबर हातमिळवणी असेल तर ती आमदार या नात्याने त्यांनी स्थानिक पातळीवरच निपटने गरजेचे होते. श्रीरामपूर शहरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे श्री.कानडे सांगतात तर मग आमदार म्हणून त्यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारणे गरजेचे होते.
असे काहीही न करता आ.कानडे यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केला यावरुन ते हतबल असल्याचे स्पष्ट होते. आमदार या नात्याने सामाजिक सुरक्षा, प्रशासनावर अंकूश, अवैध धंदे व गुन्हेगारीचा बंदोबस्त करणे हे आ.कानडे यांचे कर्तव्य ठरते. ज्याअर्थी पोलीस अधिकारी व गुन्हेगारांची हातमिळवणी तसेच अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे श्री.कानडे मान्य करतात, हे त्यांचे अपयशच ठरते. पोलीस अधिकारी व गुन्हेगार यांची हातमिळवणी करण्याची हिम्मत होतेच कशी तसेच अवैध धंदे राजरोसपणे चालतात कसे, याचे उत्तर आ.कानडे यांनी देणे आवश्यक आहे. आमदारच असे प्रशानापुढे हतबल होऊन हात टेकवित असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा, असा सवाल श्री.धुमाळ यांनी केला आहे.

