shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये गुरुवर्य प्रा.बी.डी.पाटील गौरवग्रंथाचे प्रकाशन

आठवणीने दाटला कंठ -डोळे ओलावले - कृतज्ञतेने झाले सर्वजण कृतार्थ 

उद्धव फंगाळ 
सातारा -येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक महाविद्यालय असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी विभागातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.तसेच या मेळाव्यातच ‘मराठी विभाग विकास व मराठी भाषा संवर्धन: आपली जबाबदारी  ‘या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये १९८५ ते १९९५ या कालावधीत मराठी विभागात काम केलेले मराठी विषयाचे प्राध्यापक गुरुवर्य प्रा. बी. डी. पाटील यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या प्रा.डॉ.सुभाष वाघमारे संपादित ‘प्रेरणास्तंभ ‘या गौरवग्रंथाचे प्रकाशन या वेळी मराठी विभागातील सेवानिवृत्त जेष्ठ प्राध्यापक प्राचार्य मा.के.यादव,प्राचार्य श्रीधर हेरवाडे,प्रा.डी.ए.माने,प्रा.बी.डी.पाटील, प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रा.डॉ.नलिनी महाडिक, प्रा.डॉ.शिवाजी पाटील,रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, प्रा.उत्तमराव सूर्यवंशी, प्रा. सरलादेवी निकम,प्रा.सुमन निकम,डॉ.मानसी लटकत डॉ.मीरा देठे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी विषयाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच प्रा.सुभाष बागवडे , प्रा.ए. वाय. यादव ,प्रा.आर.एस.यादव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाने या मेळाव्याचे आयोजन मराठी विभागाने केलेले होते. 
   प्रारंभी मराठी विभागात काम केलेले प्रा.डॉ.विमला पाटील, डॉ. र.बा.मंचरकर,प्रा.संभाजीराव देसाई,प्रा.शंकर गणपती कुंभार, डॉ.शुभांगी भूतकर, डॉ.सुमन पाटील यांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विभागात काम केलेल्या उपस्थित सर्व प्राध्यापकांच्या सेवाकार्याबद्द्द्ल माहिती देत  सन्मानचिन्हे देऊन  त्यांना मराठी विभागाकडून  गौरवण्यात आले.गुरुवर्य प्रा.बी.डी.पाटील गौरवग्रंथांचे प्रकाशन करून प्रा.बी.डी.पाटील यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘कृतज्ञतापत्र ‘देण्यात आले. सेवाकार्याचा आढावा घेणारे भावस्पर्शी कृतज्ञतापत्राचे शब्दांकन प्रा.डॉ.सुभाष वाघमारे केले आहे  त्या पत्राचे  जाहीर वाचन यावेळी करण्यात आले. 
 या कार्यक्रमात मनोगते व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये म्हणाले’’ कर्मवीर अण्णांनी संस्था उभी केली म्हणून तुमच्या माझ्यासारखी गोरगरीब कुटुंबातील मुले शिकली. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात अनेक चांगले प्राध्यापक झाले.
 त्यातीलच एक प्रा.बी.डी.पाटील आहेत. ‘प्रेरणास्तंभ’ हा ग्रंथ  त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपलेपणा वाढविणारा ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी बंधुत्वाने राहावे हा संस्कार आहे.अण्णांचे संस्कार हे असेच तेवत ठेवले पाहिजेत. आपण आज विज्ञान युगात आहोत, विज्ञानाबरोबरच माणुसकीही वाढवली पाहिजे. 

शब्दाने माणसे जोडता आणि तोडता येतात.शब्दांचा उपयोग माणसे जोडण्यासाठी केला पाहिजे. मराठी भाषा आणि साहित्य याविषयी आपुलकी निर्माण करणारा हा ग्रंथ असून कृतज्ञता भावनेचा आनंद सोहळा आहे. कर्मवीरांच्या विचारांच्या संस्काराने वाटचाल केलेली ,तसेच कॉलेज उभे करण्यासाठी निष्ठेने योगदान दिलेली व्यक्तिमत्वे एकत्र आणून मराठी विभागाने खूप चांगले काम केले आहे. मराठी ही आपली ज्ञानभाषा आहे. तिच्या विकासात मह राष्ट्र संस्कृतीचा गौरव आहे. संशोधक व अभ्यासू साहित्यिक हे लेखन,वाचन ,संवाद इत्यादी विविध उपक्रम करून मराठी भाषेचे बळ वाढवतील अशी आशा त्यांनी यावेळी प्रकट केली. 
 प्रा.डी.ए.माने म्हणाले की छ.शिवाजी कॉलेजची समृद्ध परंपरा डॉ.सुभाष वाघमारे यांनी सुरु ठेवलेली आहे हे पाहून मला आभिमान वाटतो. प्रा.बी.डी. पाटील म्हणजे माणसे मिळवणारी चालती बोलती प्रयोगशाळा आहे.असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की ‘’प्रेरणास्तंभ या ग्रंथामुळे चांगली पिढी निर्माण होण्याची प्रेरणा मिळत जाईल.यातील प्रस्तावना सर्वांनी वाचायला हवी. मला प्रा.पाटीलसर यांच्याबरोबर काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.कॉलेजच्या मराठी विभागात अनेक अभ्यासू प्राध्यापक झाले आहेत.त्यांचा ज्ञानवारसा आपण  जोपासला पाहिजे. 

प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे त्या दिशेने प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी धन्यता व्यक्त केली. 
 गौरवग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात व्यक्त होताना प्रा.बी.डी.पाटील म्हणाले ’आज समाजामध्ये पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाराची गरज आहे.माझी सहचारिणी प्रेमळ स्वभावाची होती म्हणूनच माझे  विद्यार्थ्यांशी आत्मीय नाते तयार झाले.पत्नीने प्रत्येक वेळी मदत करण्याविषयी मला सांगितले असे सांगताना पत्नीच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. पुढे बोलताना ते म्हणाले की’विद्यार्थ्यांना मी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान शिकवत होतो.विद्यार्थी हीच माझी संपत्ती आहे. शामच्या आई पुस्तकाचा प्रभाव माझ्यावर कायम आहे. मुलांवर ,प्राणीमात्रावर ,समाजावर प्रेम कसे करावे हे मला सानेगुरुजी यांच्याकडून शिकायला मिळाले.३८ वर्षात मी अनेक विद्यार्थी घडविले.ते माझ्याशी कुटुंबाप्रमाणे जोडले आहेत.हीच माझी खूप मोठी संपत्ती आहे असेही ते म्हणाले.
    
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मा.के यादव म्हणाले की’ चांगले प्राध्यापक चांगले विद्यार्थी घडवतात तर चांगले विद्यार्थी चांगले प्राध्यापक घडवितात.प्राध्यापकांनी आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहिले पाहिजे तरच जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करता येईल.प्राध्यापक भगवान पाटील हे हाडाचे प्राध्यापक आहेत.गौरवग्रंथ निर्माण होणे ही प्रा.बी.डी.पाटील यांच्या कार्याची पोचपावती आहे असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.
 या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.समृद्धी जाधव ,सुहास पवार,नंदिनी पाटेकर ,प्रा.सुनील शिंदे,प्रा.डॉ.नलिनी महाडिक, प्रा. उत्तमराव सूर्यवंशी व अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.  

प्रारंभी गुरूवर्य प्रा.बी.डी.पाटील यांच्याविषयी संपादित केलेल्या ‘प्रेरणास्तंभ ‘या गौरवग्रंथाचे संपादक प्रा. डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.गौरवग्रंथात लेखन करणाऱ्या ५० लेखकांना प्रा.बी.डी.पाटील यांच्या हस्ते गौरवग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.  प्रा.पोपट काटकर व प्रा.विश्वजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.सुनील शिंदे यांनी आभार मानले.


प्रेरणास्तंभ’ या गुरुवर्य प्रा.बी.डी.पाटील गौरवग्रंथाचे प्रकाशन करताना डावीकडून प्रा.डॉ.शिवाजी पाटील , प्रा.उत्तमराव सूर्यवंशी , प्रा.डी.ए. माने ,प्राचार्य श्रीधर हेरवाडे , प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, प्रा.डॉ नलिनी महाडिक,प्राचार्य मा.के यादव ,प्रा.सुमन निकम , प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये .डॉ.मानसी लाटकर ,प्रा.बी.डी.पाटील,सचिन पाटील ,अनिता व नील दर्श पाटील ,प्रा.पोपट काटकर व संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे.

close