shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोकर परीसरात बिबट्याचा उच्छाद...,सोबत पट्टेरी वाघाचेही घडले दर्शन



*एका आठवड्यात चार शेळ्या फस्त आणि पाच कुत्रे गायब

*वन विभागाने बंदोबस्त करावा, अन्यथा अंदोलनाचा इशारा

भोकर (वार्ताहर) :
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात बिबट्याच्या उच्छादाने परीसरातील बळीराजा भयग्रस्त झाला असून वनविभागाने या परीसरात पिंजरा लावून उच्छाद मांडलल्या बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा परीसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे. या बिबट्याने परीसरातील एका कालवडीवर हल्ला चढवत, चार शेळ्या फस्त करत अनेक कुत्रे गायब केल्याने शेतात राहत असलेल्या शेतकर्‍यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही या परीसरातील बिबटे मोकाट असल्याने वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.


भोकर परीसरात तसे बिबट्याचे दर्शन नित्याचेच झालेले आहे. परंतू गेल्या आठवड्यापासून परीसरातील शेतकर्‍यांना या बिबट्याने बेजार केले आहे. या बिबट्याने गेल्या आठवड्यात लक्ष्मीबाई नारायण पांढरे यांचे कालवडीवर हल्ला चढवत तीला गंभीर जखमी केले, त्यावेळी लक्ष्मीबाई पांढरे यांना जाग आल्याने त्यानी ओरडा केल्याने ती कालवड बचावली असली तरी तीच्या उपचाराचा मोठा खर्च पांढरे कुटूंबियांना करावा लागला.
तर एकाच आठवड्यात चार ठिकाणच्या चार शेतकर्‍यांच्या चार शेळ्यांवर हल्ला चढवत या बिबट्याने त्या फस्त केल्या आहेत. त्यात गट नं.217 मध्ये वस्ती असलेल्या मिना रावसाहेब म्हसे यांची एक शेळी फस्त केली.त्यानंतर गावालगत गट नं.310 मध्ये वस्ती असलेले सिताराम मारूती शिंदे यांचे शेळीवर मध्यरात्री हल्ला चढवत घरासमोर बांधलेली शेळी फस्त केली. त्यानंतर खानापूर रोडपासून काही अंतरावर गट नं.371 मध्ये वस्ती करून राहत असलेल्या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या इंदुबाई रावसाहेब रूपटक्के यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर या बिबट्याने हल्ला करत त्यांची शेळी जागेवर मारून टाकली. 

तर श्रीरामपूर - नेवासा राज्यमार्गालगत गट नं.221 मध्ये वस्ती असलेले सतीष यशवंत खेडकर यांच्या शेळीवर हल्ला चढवत तीला सुमारे एक हजार फुटापर्यंत ऊसात नेवून ती फस्त केली या शेळीचे काही अवयव शिल्लक असल्याने तीचा पंचनामा होवू न शकल्याने या खेडकर कुटूंबास नुकसान भरपाई पासून वंचीत रहावे लागले. एकंदरीत या बिबट्याने एकाच आठवड्यात चार शेळ्या फस्त केल्या आहेत. दुसरीकडे येथील जेष्ठ कार्यकर्ते भिकाजी पोखरकर, शेतकरी असलेले बबनराव काळे, गणेश विधाटे आदिंसह अनेक शेतकर्‍यांच्या वस्तीवरील कुत्रे या बिबट्याने गायब केल्याने अशा प्रकारे परीसरातील अनेक शेतकर्‍यांच्या वस्तीच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे.
या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र वनविभागाचे विरोधात तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा येथील संतोष रूपटक्के, सचीन पोखरकर, मनोज शिंदे, हनुमान पांढरे, निखील कांबळे, सम्राट माळवदे, हरीभाऊ पटारे, गणेश विधाटे आदिंसह कार्यकर्त्यांनी दिला आहे.
परीसरात बिबट्या बरोबर पट्टेरी वाघाचाही संचार असल्याची शेतकर्‍यांची खात्री
दरम्यान या परीसरात बिबट्या बरोबरच पट्टेरी वाघ असल्याची खात्री असल्याचे वाघाचे प्रत्यक्षदर्शीने सांगीतले, भोकर - वडाळामहादेव रोडवर भोकर शिवारात असलेल्या ओढ्याजवळील चौधरी व कुर्‍हे यांचे शेतालगत रस्त्याच्या कडेला सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घास आणण्यासाठी गेलेले संजय मते हे घास घेवून निघत असताना गाडीवर बसल्यानंतर त्यांना लाबंलचक पट्टेरी वाघ बसलेला दिसला, त्यावेळी त्यांनी सेल्फस्टार्ट असलेली गाडी चालू करत ओरडा केला, त्याच बरोबर जवळच घास कापत असलेल्या सिंधुबाई रूपटक्के यांनी ही ओरडा केला. 
या आवाजाने लगतचे गणपत कुर्‍हे व त्याची कन्या कोमल कुर्‍हे हे ही मदतीला धावले, फटाके वाजविल्यानंतर काही क्षणात तो वाघ लगतच्या चौधरी यांचे ऊसाचे शेतात दिसेनासा झाला. त्यावेळी संजय शिंदे यांनी मी समक्ष मृत्यू बघीतल्याची प्रतिक्रीया दिली. तर जवळच असलेल्या चौधरी यांचे ऊसाच्या शेतात सहा कुत्र्यांचे सांगडे दिसल्याने हे कुत्रे या वाघाने फस्त केल्याचे उघड झाले.

त्यामुळे या परीसरात बिबट्या बरोबर पट्टेरी वाघाचा ही संचार असल्याचे स्पष्ट होत असल्याने या बिबट्यांचा व वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
close