shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद ... मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केले आश्वासित.

इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनासाठी  दोन कोटी रुपयांची तरतूद ... मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  विधानसभेत केले आश्वासित.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी गढीच्या संवर्धनासाठी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता  प्रश्न.

इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन होण्यासाठी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचा इतिहास तरुणांपुढे कायम ज्वलंत ठेवण्यासाठी विधान भवनात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्षवेधी मध्ये प्रश्न उपस्थित केला. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेत या ठिकाणचा ऐतिहासिक ठेवा सरकारने जतन करून त्या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली.
 आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, इतिहासाची साक्ष असणाऱ्या आणि इंदापूरच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी शासनाने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या या ऐतिहासिक वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनासाठी या ठिकाणी असणारे जुने बुरुज, गाव वेश, भुयारी मार्ग याचे पुनर्जीवन करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. नवीन पिढीला इतिहास ज्ञात व्हावा यासाठी या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक निर्माण करावे. या ठिकाणी त्यांच्या पादुकांसाठी दगडी मूळ स्वरूपात चबुतरा उभारला गेला पाहिजे. यासाठी महसूल, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक लावावी. शासन स्तरावर आराखडा तयार करावा. शिवाय गढीची जागा अतिक्रमित होऊ नये म्हणुन शासनाने ताब्यात घ्यावी.अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
वीरश्री मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीत अनेक गावे वतन दिली होती. त्यापैकी इंदापूर हे एक होते. शेवटच्या क्षणापर्यंत मालोजीराजे येथे वास्तव्यास होते याचा उल्लेख शिवभारत ग्रंथात आढळतो.
इ.स.वी. सन १६०६ मध्ये इंदापूर मध्ये जे युद्ध झाले त्यात त्यांना वीरमरण आले. ज्या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे वास्तव्य होते. त्या ठिकाणी आता जुनी तहसील कचेरी आहे .याच गढीवर  समोर इंद्रेश्वराचे मंदिर असून इंदापूरचे ग्रामदैवत म्हणून त्याची ओळख आहे. ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या  दर्शनाने वीरश्री मालोजीराजे दिनक्रमाची सुरुवात करत असायचे अशी नोंद आढळते.
   तसेच  इंदापूर शहर हे पुणे सोलापूर हायवे वर असून इंदापूर तालुक्यातील  उजनी जलाशय हा मोठा आहे .राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण या ठिकाणी आहे. या शिवाय कुंभारगाव, भिगवन ,गंगावळण, शहा परिसरात पर्यटक हे फ्लेमिंगो पाहण्यासाठी येत असतात जर या ठिकाणी इतिहासाची साक्ष असणाऱ्या वीरश्री मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन, पुनर्जीवन झाले तर भावी पिढीला याचा फायदा होणार आहे.

यावर उत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की,
आमच्यासाठी शिंदे फडणवीस सरकारसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपयांची ऐतिहासिक गड, किल्ले संवर्धनासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार इंदापूर मधील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अधिवेशनात दिले.
 तात्काळ आराखडा केला जाईल. दोन महिन्याच्या आत इंदापूर मधील असणाऱ्या गढीवर शासन स्तरावरून मी स्वतः उपस्थित राहून बैठक लावली जाईल. शिवाय इंदापूर मधील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी सात दिवसाच्या आत पर्यटन स्थळ म्हणून घोषित केली जाईल. या गढीची जागा संरक्षित राहण्यासाठी शासनाकडून तात्काळ पावले उचलली जातील असे आश्वासन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आश्वासित केले.
close