वडापुरीत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न.
महाराष्ट्र चॅम्पियन पै. मामा तरंगे ठरला श्री भैरवनाथ यात्रेच्या शेवटच्या कुस्तीचा विजयी मानकरी.
हनुमान मंदिरासमोर श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी (ता. इंदापूर ) वडापुरी हे गाव श्रीनाथ यांची पुण्य पावन भूमी असून या गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा दिनांक २९ मार्च व ३० मार्च रोजी पार पडली. या दोन दिवसाच्या यात्रेत वडापुरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दर्शन घेतले. यात्रेमध्ये नियोजित सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरागत पद्धतीने नियोजन बद्ध पार पडले. यामध्ये श्रीं चा छबिना मिरवणूकीत अनेक भाविक भक्तांनी नोटांच्या माळा व भेटवस्तू घालून आपले नवस पूर्ण केले. श्रीं चा छबिना पूर्णपणे नोटांच्या माळेमध्ये भरून गेला होता. मिरवणुकीत लेझीम, पारंपारिक वाद्य, सनई ,बँड, हलग्या इत्यादी स्वरूपातील वाद्या वरती गावातील लहान थोर भावीक ग्रामस्थ आनंदात नाचत असलेले दिसून आले. या मिरवणुकी दरम्यान श्रीं छबिनाच्या स्वागतासाठी महिला व पुरुषांनी आरती ओवाळत पुष्पहार, नोटांचे हार घालून ठिकठिकाणी स्वागत केले.
ही मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा करीत रात्री बाराच्या दरम्यान श्रीनाथ मंदिर या ठिकाणी गुरु शिष्य भेटीसाठी पोचली. त्यानंतर श्री भैरवनाथ मंदिराकडे हा श्रीं चा छबिना मार्गस्थ होऊन पोहोचला यानंतर महाआरती करण्यात आली. वसंत नांदवळकर सह रविंद्र पिंपळे लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्या या कार्यक्रमाचे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशा मंडळाचा हजेरी कार्यक्रम सकाळी ७ ते ९ या दरम्यान संपन्न झाला. व त्यानंतर यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने रामनवमीनिमित्त हनुमान मंदिरासमोर ह भ प घनश्याम महाराज देवकर यांचे राम जन्म उत्सवानिमित्त कीर्तन संपन्न झाले व त्यानंतर उपस्थित स्त्रियांनी राम जन्म पाळणा म्हणत झोका देत साजरा केला. यावेळी वडापुरी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .याप्रसंगी जगदाळे बंधू यांच्या वतीने महाप्रसादाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना देण्यात आला.
दुपारी ३ ते ७ या वेळेमध्ये कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक नामवंत कुस्तीपटू यांनी उपस्थिती दर्शवून रोख स्वरूपातील बक्षीस घेत आपल्या कुस्ती खेळ अतिशय चुरशीने खेळत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आपला खेळ सादर केला. मैदानी कुस्ती मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मामा तरंगे विरुद्ध पैलवान भैया डांगे यांची शेवटची कुस्ती संपन्न झाली. यामध्ये मामा तरंगे यांनी विजयश्री खेचून आणला.
यावेळी उपस्थित यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने मामा तरंगे यांचा रोख रकमेसह सत्कार करून गौरविण्यात आले. ही यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी गावातली सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

