बेलापूर प्रतिनिधी:
संविधानाच्या वाटेवरच भारतीय लोकशाहीचा विकास आहे असे प्रतिपादन बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात समाजकल्याण विभाग समान संधी केंद्र, राज्यशास्त्र , इतिहास व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात कार्यालयीन अधीक्षक संदेश शाहीर सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले. ते पुढे असेही म्हणाले की, भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
राज्यघटनेत एक प्रास्ताविका ,८ अनुसूची ,२५ भाग आणि ४४८ कलमे,५ परिशिष्टे आहेत .आत्तापर्यंत १०१ घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत असेही ते म्हणाले.प्रथम सत्रात विषयतज्ज्ञ म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्री स्वातंत्र्य" या विषयावर बोलताना म्हणाल्या की, स्त्रियांच्या विकासाचा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय विकासाचा कार्यक्रम आहे.तो सर्वांनी हाती घेतला पाहिजे तरच स्रिया सक्षम होतील.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला म्हणूनच आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया अग्रभागी दिसून येतात.द्वितीय सत्रात डॉ.बाबासाहेब पवार यांनी "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान"या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण केले.ते म्हणाले की,भारतीय संविधानाने सर्व श्री पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा समान अधिकार दिलेला आहे तसेच समान कामाबद्दल समान वेतन मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याची व्यवस्था विधेयकामध्ये आहे. हिंदू कोड बिल बिलामध्ये आई-वडीलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणे मुलींनाही समान हिस्सा दिलेला आहे असेही ते म्हणाले.तिस-या सत्रात डॉ.विठ्ठल सदाफुले यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्य आणि कर्तृत्व" या विषयावर मांडणी केली .ते म्हणाले की, स्त्रियांच्या हक्क व अधिकारासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती आहेत. जर हे हिंदू कोड बिल पास झाले असते तर स्त्रियांना त्याचवेळी समान हक्क आणि अधिकारांची प्राप्ती होऊन स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला असता आणि स्त्री पुरुष समानता निर्माण झाली असती. नंतर बऱ्याच वर्षांनी हिंदू कोड बिल मधील तरतुदी हळूहळू लागू करण्यात आल्या. संविधान अंमलात येऊन आज ७० वर्ष पूर्ण झाली तरी अजूनही सक्षमीकरण आवश्यक आहे. समतावादी आणि मानवतावादी विचार प्रवाहांची समाजाला गरज आहे असे ते म्हणाले,खुल्या सत्रामधे प्रा.बी.जे पवार यांनी "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व" मांडताना त्यांनी केलेले सामाजिक ,शैक्षणिक,राजकीय,आर्थिक, शेती, पाणी, स्रीसन्मान, त्यांची गंर्थसंपदा आदि कार्याचा महत्त्वपूर्ण आढावा घेतला तर कार्यालयातील वरीष्ठ लिपिक कृष्णा महाडिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा समाजकल्याण विभाग अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे कार्य करते .आपण सर्वांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी काम केले पाहिजे.शिष्यवृत्तीबाबत जनजागृती केली पाहिजे.सदर चर्चासत्राची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. अध्यक्षीय सूचना डॉ.संजय नवाळे यांनी मांडली. प्रा.अशोक थोरात यांनी अनुमोदन दिले.प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.सतिश पावसे यांनी केले.चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

