श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने लोयोला युथ ग्रुपच्या सदस्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहाय्यक धर्मगुरू फा. सुनिल गायकवाड, सि. जॅकलिन, युवक मंडळ,ज्येष्ठ नागरिक व गायन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन रवि त्रिभुवन यांनी केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना फा.सुनिल गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन बहुजनांना न्याय, स्वातंत्र्य व समता मिळवून देण्यासाठी अर्पण केले. संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या हक्क अधिकाराचे प्रत्येक भारतीय नागरिकाने संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमा दरम्यान रवी त्रिभुवन आणि निर्मला आमोलिक यांनी गायलेल्या गीतांमुळे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात फा. ज्यो. गायकवाड म्हणाले की, जागतिक विद्वानांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथमस्थानी आहे. अनेक हाल अपेष्टा सहन करून बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांच्या अनंत उपकारामुळेच आपले जीवनमान उंचावलेले आहे, परंतु हे केवळ शिक्षणानेच शक्य होऊ शकते हे बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे त्यामुळे युवकांनी डॉ.आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला अधिक महत्त्व द्यावे व सामाजिक भान जपून यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करावी असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.
शेवटी युवक मंडळाचे अध्यक्ष प्रतीक गायकवाड यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सि. जॅकलिन, युवराज गायकवाड, रोहन गायकवाड, शुभम आढाव, प्रज्ञा गायकवाड, ऐश्वर्या गायकवाड, स्नेहल रणदिवे, प्राजक्ता रणदिवे, महिमा मोकळं यांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

