बेलापूर प्रतिनिधी:
नव्या काळातील संशोधकांनी जुन्या काळातील संदर्भ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.जग बदलवणाऱ्या सामाजिक पुस्तकांनी आंतरविद्याशाखीय ज्ञान समृद्ध केले आणि समाज परिवर्तन केले असे प्रतिपादन नांदेड येथिल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण करताना "भाषा , सामाजिक शास्त्रे व वाणिज्य विद्या व्यवस्थापन यांचेतील आंतरविद्याशाखीय विचार प्रवाह" या विषयावर ते बोलत होते .ते पुढे असेही म्हणाले की, जग बदलवणाऱ्या पुस्तकांनी संस्कृतीच्या पायवाटा निर्माण केल्या. जग आकुंचन पावत आहे त्यामुळे समाज माध्यमे समजून घेणे गरजेचे आह.
दासकॅपिटल सारखे ग्रंथ आंतरविद्याशाखांचा पाया आहेत. नव्या काळातील अभ्यासकांनी जुन्या काळातील संदर्भ लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.यावेळी चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.शरद सोमाणी हे होते.चर्चासत्राच्या उद्घाटक बेळगाव येथिल राणी चेन्नमा विद्यापीठाच्या माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.मनिषा नेसरकर म्हणाल्या की, सध्याच्या संशोधनामधे उथळपणा,हास्यास्पदपणा तसेच संशोधनाचा दर्जा घसरलेला असून मानवाच्या जगण्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत .नव्या पद्धतीचे शिक्षण मानवी प्रगतीसाठी गरजेचे असून आंतरविद्याशाखीय अभ्यासाची गरज अपरिहार्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.संगमनेर येथिल मालपाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड म्हणाले की, शिक्षण पद्धतीत प्रत्येक वेळी होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक कशाप्रकारे करावी यावर त्यांनी प्रकाश झोत टाकला तसेच बहुआयामी ज्ञान मिळवण्याची क्षमता आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनात आहे.देवगाव (कन्नड)येथिल एबी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव म्हणाले की, सातत्याने प्रवाहित होणारा विचार स्वीकृत करण्याचा समाज प्रयत्न करीत असतो. इतिहासातून धडा घेऊन वर्तमानकाळ कसा जगायचा आणि भविष्यकाळ कसा घडवायचा याबाबत बोलताना रामचरीतमानस ,आयुर्वेद आणि मध्ययुगीन कालखंडाचे संदर्भ त्यांनी सांगितले.खुल्या सत्रामधे पुणे येथील ज्ञानसूर्य प्रकाशनाच्या संचालिका डॉ.उमा काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.दत्तात्रय फलके (नाशिक) , डॉ.दत्तात्रय गंधारे (राजूर) यांनी शोधनिबंधांचे वाचन केले.समारोप प्रसंगी फ्रान्स येथिल सुवेज कंपनीचे वरीष्ठ अधिकारी अक्षर आवलगावकर म्हणाले की, प्रचलित व्यवहारात यश मिळवताना भाषेचा अडसर किंवा भीती बाळगता कामा नये कारण भाषा व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे.चर्चासत्राचे प्रास्ताविक व परिचय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी करुन दिला.सदर चर्चासत्राचे सुत्रसंचालन प्रा. विलास गायकवाड प्रा.रुपाली उंडे यांनी केले तर आभार प्रा.प्रकाश देशपांडे यांनी मानले. या चर्चासत्रास देशविदेशातील संशोधक,प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब पवार, डॉ.अशोक माने , डॉ.मनोज तेलोरे,प्रा.अशोक थोरात, डॉ.संजय नवाळे, प्रा.निजाम शेख, डॉ.विठ्ठल सदाफुले,प्रा.सुनिल विधाटे,संदेश शाहिर,प्रा.सतिश पावसे,प्रा.चंद्रकात कोतकर, डॉ.बाळासाहेब बाचकर, डॉ.विनायक काळे,प्रा.स्वाती कोळेकर,प्रा.विकास नालकर , डॉ.विठ्ठल लंगोटे,प्रा.बी.जे पवार यांनी प्रयत्न केले.

