बावडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरण कामाचे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
- रु. 30 लाखाचा निधी.
इंदापूर : प्रतिनिधी दि.14/4/23
बावडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकण कामाचे भूमिपूजन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.14) जयंतीदिनी करण्यात आले. सदर कामासाठी जिल्हा नियोजन मंडळातून हर्षवर्धन पाटील यांनी रु.30 लाखाचा निधी मंजूर केला आहे.
बावडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्यास जयंतीनिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात आदर्श अशी भारतीय राज्यघटना लिहिली. या राज्यघटनेनुसार सध्या देश सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. डॉ. बाबासाहेब देशाचे पहिले न्यायमंत्री होते. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते, अभ्यास होता. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये जनतेच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार प्रत्येकाने आचरणात आणावेत,असे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
बावडा गावच्या विकासासाठी प्रत्येकाने आपली राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये 30 लाख रुपये निधी मधून पेव्हर ब्लॉक बसवणे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज आदी सुशोभीकरणाची कामे केली जातील. सुशोभीकरणाच्या कामासाठी आणखी निधी लागला तर दिला जाईल, असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादा कांबळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, उदयसिंह पाटील, मनोज पाटील, डॉ.लक्ष्मण आसबे, महादेव घाडगे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ, नवबौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले.

