प्रतिनिधी : सुर्यकांत होनप
करमाळा : १७ / सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या 'बुधभूषण फाउंडेशन' (पुणे) या सामाजिक संघटनेने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून करमाळा शहर व तालुक्यातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके मिळवुन देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून गरजु विद्यार्थी-विद्यार्थीनींना शालेय पुस्तके सहजपणे उपलब्ध होत आहेत.
'बुधभूषण फाउंडेशन'चे चेअरमन अमोल दुरंदे यांच्या संकल्पनेतून पुढच्या इयत्तेत गेलेल्या विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके जमा करून ती पुस्तके गरजुंना देण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील समाजसेवक तानाजी सुखदेव माने यांनी आपली कन्या कु. श्रद्धा हीची इयत्ता दहावीची परीक्षा झालेली असल्याने तिची पुस्तके 'बुधभूषण फाउंडेशन'चे व्हा. चेअरमन दुर्गेश राठोड यांचेकडे जमा केले. शहरातीलच एका होतकरू विद्यार्थीनीला दहावीची पुस्तके हवी असल्याची मागणी राठोड यांचेकडे पुर्वीच आली होती. यानुसार शनिवार दि. १५ रोजी 'बुधभूषण फाउंडेशन'चे मार्गदर्शक आलिम शेख यांच्या हस्ते ही पुस्तके गरजु विद्यार्थीनीला देण्यात आली.
यावेळी फाऊंडेशनचे संदीप चुंग, सुशील राठोड, मंगेश बागडे, आनंद शहा, सागर महामुनी, बंडु सरडे, अक्षय परदेशी उपस्थित होते.
करमाळा शहर व तालुक्यातील पालकांनी
"समाज कार्याची धरूया कास,
चला बुधभूषण फाउंडेशनला देऊ या साथ"
या ब्रीद वाक्यानुसार आपल्या पाल्याची वापरलेली किंवा वाचून झालेली जुनी पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी 'बुधभूषण फाउंडेशन'चे व्हा. चेअरमन दुर्गेश राठोड यांच्या शुभम जनरल स्टोअर्स मेनरोड, करमाळा येथे जमा करावीत, असे आवाहन बुधभूषण फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके हवी असतील, त्यांनी बुधभूषण फाउंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

