shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दूरदर्शी राज्यकर्त्या... राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

दूरदर्शी राज्यकर्त्या... राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर.

"पुरुष जातीचा बडगा छेदून केली तुम्ही  समाजसेवा! भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा!! जात धर्म विसरून दाखवला मानवसेवेचा मार्ग नवा! राजमाता अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा!!"

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा लेख.


  इंदापूर प्रतिनिधी:  रणरागिनी तू पुण्यश्लोक तु जपलास वारसा शिवरायांचा! उतरून रणांगणी दाखविलीस तु शत्रूस ताकद तुझ्या मनगटाची,
 न्यायदानाची पुरस्कारती तू राग तुला अन्यायाचा, राजमाता तू, अहिल्यादेवी तू, अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा.
           जेव्हा जेव्हा या समाजामध्ये अन्यायाच्या, अत्याचाराच्या घटना वाढतात, अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपविण्याची एक शक्ती जन्म घेते ,आणि हेच घडलं ३१ मे १७२५ रोजी चौंडी गावातील माणकोजी शिंदे व सुशीलादेवी यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक तेजस्वी रत्न जन्माला आलं... या रत्नाला साक्षात सूर्यानेही मुजरा केला असावा असं हे रत्न, त्याचे नाव अहिल्यादेवी ठेवण्यात आले. 
त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांनी अहिल्यादेवींना अत्यंत निर्भीड धाडसी बनविले होते.
       वयाच्या आठव्या वर्षी शूर पराक्रमी सरदार श्री मल्हारराव होळकर यांचे पुत्र श्री खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
त्यांचा विवाह बाजीराव पेशवे यांनी शनिवार वाडा इथे लावून दिला. त्यावेळी खुद्द पहिले शाहू महाराज (छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र) उपस्थित होते. पाच दिवसाचा शाही विवाह सोहळा त्यावेळी पार पडला. आणि अहिल्यादेवी होळकर घराण्याच्या सूनबाई झाल्या.

   तिथून पुढे मल्हाररावांच  मार्गदर्शन, आशीर्वाद अहिल्यादेवींना लाभले आणि  खऱ्या जीवनाची वाटचाल सुरू झाली.
          अहिल्यादेवींच्या प्रवासात सर्वात जास्त योगदान कोणाचं, तर ते  मल्हाररावांचं म्हणजेच त्यांच्या सासऱ्यांचं , मल्हाररावांची कौतुकाची थाप  अहिल्यादेवींना घडवत आणि लढवत गेली .कारण मल्हारराव म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे अहिल्यादेवींच्या पाठीवरील कौतुकाची थाप असा सासरा लाभणं म्हणजे अहिल्यादेवींचे खूप मोठे भाग्य होते.
           मल्हाररावांनी अवघ्या आठ वर्षाच्या आपल्या सुनेला युद्धनीती शिकवायला सुरुवात केली. युद्ध कसं करायचं ,जेव्हा युद्धाला सुरुवात होते तेव्हा तोफांच्या येणाऱ्या भयानक आवाजाला निधड्या छातीने सामोरे कसे जायचे, भाला कसा फेकायचा, तलवार कशी चालवायची ,घोडे स्वारी कशी करायची,खंबीर कसे राहायचे हे शिकविले व  त्याचसोबत राजकारण, धर्मकारण, संस्कृती ,समाजकारण, अर्थकारण सुद्धा शिकविले.
मल्हारराव जेव्हा मोहिमेसाठी बाहेर पडायचे तेव्हा राज्याचा कारभार अहिल्यादेवींकडे सोपवुन जायचे.
     अहिल्यादेवींचे पती खंडेराव हे देखील पराक्रमी योद्धा होते. १७५४ मध्ये कुंभेरीच्या लढाईमध्ये त्यांना वीरमरण आले.नवरा गेल्यानंतर त्याकाळी सती जाण्याची परंपरा होती. त्याचप्रमाणे अहिल्यादेवी सुद्धा सती जायला निघाल्या होत्या.पण सासरे मल्हाररावांनी त्यांना समजाविले "तुम्हीच आमचा खंडेराव आहात .या प्रजेची काळजी आता तुम्हाला घ्यायची आहे.  तुम्ही जर गेलात तर आम्ही कोणाकडे बघायचे" मल्हाररावांनी त्यांना विनंती केली "अहिल्या तू सती जाऊ नको, आता तूच आमचा पुत्र आहेस" याची पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली आणि मल्हाररावांच्या बोलण्याला मान देऊन अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत .आणि सती जाण्याची जी अनिष्ट परंपरा होती ती सुद्धा त्यावेळी त्यांनी मोडीत काढण्याचे काम केले.
दुर्दैवाने  १७६६ मधे मल्हाररावांचे निधन आणि खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी एकट्या पडल्या.
      होळकरांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवले नव्हते तर "तलवारीच्या पातीवर आणि मनगटाच्या जोरावर"त्यांनी ते उभे केले होते .आतापर्यंत सर्वात जास्त संकट कोणत्या राज्यकर्त्यावर आली असतील तर ती अहिल्यादेवी होळकरांवर आलेली होती. अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा खंडेराव, सासरे मल्हारराव, मुलगा मालेराव, मुलगी मुक्ता, नातू यांचे निधन झाले .राज्य कारभार पाहण्यासाठी कोणी पुरुष म्हणून उरला नव्हता. अशा वेळी एकट्या अहिल्यादेवींनी राज्यकारभार करण्याचा निर्णय घेतला. या संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे 50000 ची फौज घेऊन अहिल्यादेवींच्या राज्यावर चालून आले. परंतु अहिल्यादेवींचे दूरदृष्टी ती किती बघा... अहिल्यादेवी न डगमगता, न घाबरता राघोबा पेशव्यांना पत्र लिहितात.... राघोबा दादा..
      मी एकटी आहे  असं समजू नकोस, पाहुणा म्हणून आलास तर हत्तीवर बसून मिरवणूक काढेल, आणि शत्रू म्हणून आलास तर त्याच हत्तीच्या पायाखाली देण्याची ताकद आमच्या मनगटात आहे ...
जेव्हा आम्ही हातात तलवार आणि खांद्यावर भाला घेऊन मैदानात उतरू तेव्हा तुम्हाला खूप जड जाईल, आपली भेट लवकरच रणांगणात होईल. परंतु लक्षात ठेवा, मी जर हरले तर मला कोणी नावं ठेवणार नाही परंतु तुम्ही जर हरलात तर जग तुम्हाला नाव ठेवेल की तुम्ही एका महिलेकडून पराभूत झालात.
अहिल्यादेवींचे हे पत्र वाचून राघोबा दादा मनातूनच हरले आणि युद्धातून माघार घेतली.
अहिल्यादेवी जाणत होत्या, फक्त हातात तलवार घेऊन चालणार नाही तर सोबत बुद्धी कौशल्य हे असावं लागतं.
"शत्रूला रणांगणात पराभूत करण्याआधी त्याला मनातून पराभूत करायचं असतं, कारण मनातून पराभूत झालेल्या शत्रू रणांगणात जिंकण्याची गोष्ट तर लांबच, पण उभा सुद्धा राहू शकत नाही"हे मानसशास्त्र त्यांनी अवगत केले होते.
 सर्वसामान्यांसाठी करत असलेल्या कार्यामुळे लोक त्यांना लोकमाता, राजमाता, राष्ट्रमाता देवी मानत असत. होळकरांची दौलत, मानसन्मान त्यांनी जवळपास तीस वर्षे संभाळला. समाज उपयोगी कामे करत असताना त्यांनी जनतेचा पैसा त्यामध्ये वापरला नाही. स्वतःच्या "खाजगी दौलतीतून" त्यांनी लोक उपयोगी कामे केली.
    अशा कर्तव्यदक्ष ,न्यायप्रिय दानशूर, धर्मनिरपेक्ष, चारित्र्यशील , प्रजावत्सल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी  यांची २९८ वी जयंती आपण आज साजरी करत आहोत.
         जयंती साजरी करत असताना बऱ्याच ठिकाणी डीजे लावून विचित्र प्रकारच्या गाण्यांवरती डान्स करतात, काही  तर दारू पिऊन नाचताना सुद्धा दिसतात.. पवित्र मातेच्या जयंती मध्ये असा नाच किती योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
 मातेची जयंती साजरी करत असताना सामाजिक कार्य किती करता येईल? समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अशा प्रकारे जाता येईल? गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी कशी घेता येईल? ज्या मुलांना शिक्षणाची सोय नाही ज्यांना इच्छा असूनही शिक्षण मिळत नाही त्या मुलांना शिक्षण कसे देता येईल ?चुकीच्या मार्गावरील लोकांना सरळ मार्गावर कसे आणता येईल? लोकोपयोगी कामे कशी करता येतील? यांचा विचार करण्याची  ही खरी वेळ आहे.                      अहिल्यादेवींनी जो आदर्श निर्माण करून दिला आहे तो आपल्याला पुढील पिढीला कसा देता येईल याचा विचार करण्याची खरंतर ही वेळ आहे.
 पुढारलेल्या समाजात  वावरत असताना आपण बघतो आजही आपण भटकंती करणाऱ्या समाजाला न्याय देऊ शकलो नाही. शासनही त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात कमी पडले आहे ,सत्ता येते सत्ता जाते पण जो तो स्वतःपुरताच विचार करून सत्तेचा उपभोग घेताना दिसतो .माझ्या या भटक्या समाजाला न्याय देण्याचं काम कोणाला जमेल की नाही?
जे अहिल्यादेवींनी जवळ जवळ ३०० वर्षांपूर्वी केलं ते आम्हाला आजही जमत नाही ही आमची शोकांतिका आहे की कमजोरी??
राज्यकर्त्यांच्या पुढे फक्त कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून मिरविण्यात तरुण पिढीला आवड निर्माण होत आहे पण स्वतःच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड कुठेच दिसत नाही, अशा या तरुण पिढीचा उपयोग काय ??स्वतःच्या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी लढणं गरजेचे आहे.
पण आमची पिढी ही फक्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते सोशल कार्यामध्ये नाही पण मनावर घेईल तो आमचा समाज काय????
 अगाध संपत्ती असून ही अहिल्यादेवी तपस्विनीचे जीवन  जगल्या. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
         आयुष्यभर त्यांनी सिंहासनावर पांढरे घोंगडी ठेऊन राज्यकारभार केला. ना कुठला देखावा ना कुठला ऐशो आराम आराम. त्या सर्वसामान्यांचे जीवन जगल्या.
            शेवटी एक लिहावंस वाटतं...
"पुरुष जातीचा बडगा छेदून केली तुम्ही  समाजसेवा! भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा!! जात धर्म विसरून दाखवला मानवसेवेचा मार्ग नवा! राजमाता अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा!!"
        अशा या लोकमातेस राष्ट्रमातेस कोटी कोटी प्रणाम .

लेखन व शब्दसंकलन-  मयुरा (ठोंबरे) पाटील, इंदापूर 
सामाजिक कार्यकर्त्या.
close