प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ९/ करमाळा तालुक्याती उन्हाळ सुट्टी लागल्यापासून व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः मुलीचे बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असून यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
करमाळा तालुक्यात मे महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यातच पहिल्या आठ दिवसात सात व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यात चार महिला असून तीन मुलींचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात आठ दिवसात ५१ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यात करमाळा तालुक्यातील सात व्यक्तींचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्या सर्व व्यक्ती या वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेलेल्या आहेत. बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अनेक मुली या प्रेमप्रकरणातूनच जात असल्याची उदाहरणे आहेत. घरातील कर्त्या व्यक्तीला विश्वासात न घेता भावनेतून प्रेमात पडायचे आणि याची घरात कोणालाही कल्पना न देता पळून जायचे असे प्रकार घडत आहेत. मात्र या घटनांमुळे आई- वडिलांची चिंता वाढत आहे.
पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे म्हणाले, ‘घरात पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यांच्या राहणीमानातील बदल ओळखायला हवेत. मोबाईलचा अति आणि चुकीचा वापर यामुळे असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. महिलांसह पुरुषांचे ही बेपत्ता होण्याचे प्रमाण आहे. मात्र पुरुषांच्या बाबतीत अनेकजण तक्रार देत नाहीत. हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येकानी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

