शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सहज एका विमा योजनेची माहिती 'दिली. साईसंस्थान नोकरांच्या विठ्ठलराव पवार पतपेढीचे संचालक विठ्ठलराव पवार यांनी ही योजना साईसंस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी घातली. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी ती लागू करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे अपघाती मृत्यू झालेल्या साईसंस्थानच्या एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांस उद्या (ता. २६) तब्बल चाळीस लाख रुपये भरपाई मिळणार आहे.
साईसंस्थानचे कर्मचारी दीपक आवारे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांचे वेतन बडोदा बँकेच्या शाखेत जमा होत होते. या बँकेत 'कर्मचारी पगार बचत खाते अपघात विमा कवच योजने नुसार खातेदारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना चाळीस लाख रुपयांची विमा भरपाई देण्यात येते. कै. आवारे यांचे कुटुंबीय या योजनेचे पहिले लाभार्थी ठरले. उद्या बँकेच्या आणि साईसंस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रकमेचा धनादेश आवारे यांच्या वारसांना देण्यात येणार आहे.
याबाबत विठ्ठल पवार म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी मंत्रालयात गेलो असताना तेथील वरिष्ठ लिपिक सखाराम शिंदे यांनी मला या योजनेची माहिती आणि त्याबाबतचे पत्रक दिले. संस्थान कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे सांगितले. मी ही कागदपत्रे साईसंस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली. त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर सर्व बँकांकडे या योजने बाबत विचारणा केली. तीन बँकांनी ही योजना लागू असल्याचे सांगितले. त्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांनी तेथे खाते सुरू केले.

