नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर या ठिकाणी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने एक लाख वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच लोणी काळभोर मधील जय गणेश कोचिंग क्लासेस, सूर्यवंशी क्लासेस, गिरिश विभा ट्रस्ट, यांनी सहभाग घेतला होतो यावेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, माने सर, सुर्यवंशी सर, जीवन जाधव सर, हुमे सर, शिवराज अमित जगताप, तुळशीराम कोंढारी तसेच ग्रीन फाउंडेशन, वनविभाग लोणी काळभोर, जय गणेश कोचिंग क्लासेस, सुर्यवंशी क्लासेस उपस्थित होते.
आज 23 जुलै या दिवशी "वनसंवर्धन दिन" हा साजरा केला जातो. हा दिवस निसर्गातील प्रत्येक गोष्टी जसे झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात नैसगिक साधनसंपत्तीविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो. आताच्या चालु युगाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रगतशील युग म्हटले जाते. आधुनिक पद्धतीने मानवी बुद्धी व तंत्रांच्या आधारावर विकास आणि प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी जगात चढाओढ करत आहे. हे करत असताना मानवाच्या वाढत्या गरजा, अन्नधान्य, कारखाने, उत्पादने यांची वाढती गरज आणि सोबतच लोकसंख्यानुसार वाढती मागणी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ताण नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडत आहे.
नैसर्गिक वनसंपत्तीला नष्ट करून त्या ठिकाणी मानव आपली वस्ती बसवत आहे, ही वस्ती बसवताना लोक ही गोष्ट विसरतं की विकास गरजेचा अत्यावश्यक आहे तशीच ही वृक्षसंपदा टिकणे त्यापेक्षाही महत्त्वाची आहे. वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढली की त्या लोकांच्या हाताला काम निर्माण करण्यासाठी नवीन निवासी वस्त्या, नवीन कारखानदारी यासाठी अधिक जागेची पूर्तता करण्यासाठी तेथील वनसंपदा माणूस नष्ट करत आहे.या आधुनिक युगातला माणूस सध्या फक्त आपले सुख, संपदा, वैभव, स्वार्थ पाहत आहे. आधुनिकीकरणाच्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली निसर्गातील अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीवर घाला घालून, माणूस आपली हौस पुर्ण करतोय. पण हे सगळं करतांना आपल्याला मुळे निसर्गाच्या संतुलित जीवनचक्राला आपण कुठेतरी ब्रेक लावत आहोत हेच लोकांच्या मुळात लक्षात येत नाही आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" असे आमच्या संतांनी फार काळापुर्वीच सांगून ठेवले आहे. आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत पूर्वजांनी वड, पिंपळ, तुळस ,आंबा, कडुनिंब अशा असंख्य प्रकारच्या झाडांना महत्व दिले. या देशी झाडांचे वृक्षारोपण करुन त्यांचे जर का योग्य रित्या संवर्धन केले तर या झाडांमुळे योग्य प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यामुळे मुबलक पाणी मिळते, सावली मिळते, बाष्प टिकून राहते, ऑक्सिजन मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे भूजल पातळी वाढते त्यामुळे आपोआप तापमानात घट होते.
म्हणून प्रत्येकांने वृक्षरोपण आणि वनसंवर्धन करणे काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.

