shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षकाच्या बदलीने विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ,सहकारी शिक्षक झाले भावूक....


शिक्षकाच्या बदलीने विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ,सहकारी शिक्षक झाले भावूक....

मुलांची भाषणे ऐकताना उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले...आपल्या गुरूजींना निरोप देताना सर्व मुले गहिवरली..
इंदापूर प्रतिनिधी: ८ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेतून बदली होवून गेलेले नंदकुमार सूर्यवंशी सरांचा सदिच्छा निरोप समारंभ संपन्न झाला.प्रथम नंदकुमार सुर्यवंशी सरांचा सपत्निक सन्मान शाळा व गावाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पालक म्हणून साहेबराव पिसाळ यांनी मनोगतामध्ये असे शिक्षक लाभणे म्हणजे आपल्या गावाचे भाग्य असे गौरवोद्गार काढले.सरांचा आजपर्यंत कौठळी शाळेतील प्रवास सांगून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.नंतर मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली. मनोगत व्यक्त करतानाच मुलांच्या डोळ्यात पाणी येत होते..त्यांना वाईट वाटत होते.त्यांची हृदयस्पर्शी भाषणे ऐकताना उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. नंतर मुख्याध्यापक भारत ननवरे यांनी सूर्यवंशी सर व शाळा याबाबत अनेक आठवणी सांगितल्या.सूर्यवंशी सरांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व गावाने माझ्यावर प्रेम,माया केली. मला समजून घेतले. जवळपास १५ वर्षे माझी ज्ञानदानाची सेवा या कौठळी शाळेत घडली,शाळेचे,मुलांचे अनेक प्रसंग त्यांनी सांगितले.गावातील पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी, सहकारी शिक्षक यांची मला चांगली साथ मिळाली. ही शाळा सोडून जाताना मला वाईट वाटत आहे हे म्हणत असताना सरांना रडू कोसळले. सर्व ग्रामस्थांनी सर पुन्हा बदली होईल त्यावेळी याच शाळेत पुन्हा या आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत अशी आर्त हाक दिली.जातेवेळी शाळेतील सर्व मुलांनी रडत रडत सरांना गराडा घातला.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पिसाळ,सरपंच नामदेव मारकड, उपाध्यक्ष चंद्रकांत माने,सदस्य बापूराव मारकड,अमोल मोरे,दादा पाटोळे,सचिन मोरे,अंगणवाडी सेविका राजश्री मोरे,त्रिशला पोळके, शिलावती गायकवाड, सारिका पाटोळे सह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आरती गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन भारत ननवरे यांनी तर आभार उपक्रमशील शिक्षक अमित भोंग यांनी मानले.

close