महिला आणि बालक हे समाजातील दुर्लक्षित घटक- न्यायाधीश भाग्यश्री पाटील
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १५ / श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, बार असोसिएशन,सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व मा . श्री सुधाकर यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि . १५ जुलै रोजी श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर या ठिकाणी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मा .भाग्यश्री पाटील,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी बोलताना बालकांना बऱ्याच गोष्टी आकलन क्षमतेच्या अभावी सांगता येत नाहीत. त्यांच्या अडचणी समजावून घेण्यात आपण पालक आणि शिक्षक म्हणून कुठेतरी कमी पडत आहोत. समजत पण उमजत नाही, अशा अवस्थेतून बालक किंवा विद्यार्थी जात असतात. अशावेळी आपण त्यांचे मित्र बनायला हवे व त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात. आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये शरीराच्या अवयवाविषयी बोलताना मुलांना संकोचल्यासारखे वाटते. बऱ्याच वेळेस, मुलांवर किंवा मुलींवर जे अत्याचार होतात ते जवळच्या व्यक्तीकडून होतात. ७० ते ८० टक्के लोक हे त्यांच्या ओळखीचे असतात किंवा त्यांचे नातेवाईक असतात. भारतीय दंड संहितेमधील कलमे ही बालकांच्या शारीरिक शोषणाबद्दल समावेशक नव्हती. त्यामुळे सन २०१२ साली बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्यान्वये बालकांच्या होणाऱ्या शोषणाबद्दल कठोर प्रकारे शासन होईल, याचा परामर्श घेण्यात आला. भारतीय दंड संहितेमध्ये लहान मुलीचा वापर अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी झाला तर शिक्षेची तरतूद नव्हती. शिक्षा कशी करायची हा प्रश्न उद्भवत होता. तो प्रश्न या कायद्याने सोडविला आहे. यातील तरतुदीत लहान मुलांना अश्लील साहित्य दाखविणे, अश्लील चित्र दाखविणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे. बऱ्याच वेळा मुलांना काही लोक चॉकलेटचे,भेटवस्तूचे आमीष दाखवून त्यांचं शोषण करतात. अशा वेळी मुलांनी अनोळखी व्यक्तींकडून कुठल्याही स्वरूपाचे चॉकलेट भेटवस्तू स्वीकारू नयेत. अनोळखी व्यक्ती भेटवस्तू देत असेल तर त्याबद्दल आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगून सावध करावे व त्याची तक्रार करावी, जेणेकरून अशा गोष्टींना वेळीच पायबंद घालता येईल. शाळा ही मुलांच्या सामाजिक संस्करणाचे पहिले संवेदनशील केंद्र आहे. त्यामुळे मुलांना योग्य वयात चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्रीमती. भाग्यश्री पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून एडवोकेट नंदकुमार जिवडे, उच्च न्यायालय, मुंबई यांनी सायबर सिटी व सायबर सेक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच व्यासपीठावर डॉक्टर शरद कोलते, सचिव ,श्रीराम कृष्ण एज्युकेशन फाउंडेशन सेठ नंदलाल धुत इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर, राधिका जेऊरकर मुख्याध्यापिका श्री. रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन सेठ नंदलाल धुत इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर ,ऍडव्होकेट अभय राजे, सदस्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर ऍडव्होकेट राजाभाऊ शिर्के, उपाध्यक्ष,अहमदनगर बार असोसिएशन सहशिक्षिका पंडित, एडवोकेट मोरे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर येथील शिक्षक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगरचे कर्मचारी श्री विकास कर्डिले, श्री कृष्णा कोंगे, श्री वैभव दळवी यांनी सहकार्य केले.

