shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमित्त.. क्रांतिसप्ताहाचे ..


हा आठवडा क्रांती सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मागील वर्षी आणि याही वर्षी आपण अनेक देशभक्तीपर कार्यक्रम राबवत आहोत, करत आहोत. हे सगळे कार्यक्रम शाळा पातळीवरच न राबवता ते सर्वांसाठी असावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 

त्यातीलच 'हर घर झेंडा' हा एक उपक्रम. भारतीयांच्या प्रत्येक घरावर तिरंगा फडकत राहावा किती सुंदर कल्पना. पण प्रत्येक घरावर जेव्हा झेंडा फडकत होता तेव्हा त्याचे पावित्र्य राखले गेले का?  हा प्रश्न मनात येतो आणि आपण अंतर्मुख होऊन जातो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुचाकी चार चाकी गाड्यावरचे झेंडे, लहान मुलांच्या हातात चक्रीला लावून मोठ्या डौलाने फडकणारे झेंडे दुसरे दिवशी आपल्याला कुठे आणि कशा अवस्थेत सापडतात हे आपण पाहतो. 
हा जसा मनात विचार आला त्याचप्रमाणे या क्रांती सप्ताहाच्या निमित्ताने आपण घेत असलेले विविध कार्यक्रम फक्त आठवड्या पुरतेच मर्यादित आहेत का? 
 स्वातंत्र्य म्हणजे काय? क्रांती म्हणजे काय? हेच आता बऱ्याच जणांना माहित नाही. पाठ्यपुस्तक, इतिहासाची पाने वाचताना, सिनेमांमधून बघताना, एखाद्या आजोबांकडून अशा आठवणी ऐकताना आपण क्षणभर त्याचा अनुभव करू शकतो. त्या क्षणापुरती आपल्यात वीरश्री संचारते परंतु नंतर त्याचे काय? यावर आजच्या &🍨तरुण पिढीचे उत्तर  ' आता  स्वातंत्र्य मिळाले आहे त्या काळातील लोकांनी बलिदान केले हे खरे आहे पण आता आम्ही काय करू?' त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार या विचारांनी वाढत चाललेली पिढी, नेमके या पिढीला काय सांगावे? कोणते आदर्श पुढे ठेवावेत? या विचारात असलेली त्यांच्या आई-वडिलांची पिढी. 
पण खरोखरच या सर्व गोष्टी एवढ्या अवघड आहेत का? न समजण्या एवढ्या कठीण आहेत का? स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यातील अस्पष्ट रेषा स्पष्ट करून सांगता येणार नाही का? क्रांती करायची म्हणजे हातात शस्त्र घेऊनच करायची. हा विचार बदलून क्रांती म्हणजेच सकारात्मक बदल. असा विचार का करायचा नाही? आपण आपल्या दैनंदिन जीवनापासून या क्रांतीचा विचार करू शकतो का? हा विचार करून बघूया. सध्या सर्व करून पिढीला इंटरनेटच्या जाळ्यात ओढून घेतले आहे. या जाळ्यातून सुटण्यासाठी आता आपल्याला क्रांतीची गरज आहे. हे वाक्य पूर्णतः खरे नसले तरी आपण गरजेपुरते हे साधन वापरू शकतो का एवढे जरी केले तरी आपण क्रांती केली असे म्हणता येईल. दिवसातील झोपेचा वेळ सोडून काही तास मी मोबाईल बघणार नाही असे ठरवून नियमाने तसे वागणे म्हणजे आजच्या काळातली क्रांतीच होय. 
आपण दिवसभर कोणाशी ना कोणाशी काहीतरी बडबड करत असतो. या बडबडीमध्ये एकमेकांवर कुरघोड्या करणे ,आरोप करणे, चहाड्या सांगणे अशा अनेक निरर्थक बडबडी टाळल्या तर आपली खूप ऊर्जा साठवून राहील ज्याचा आपल्याच व्यक्तीमत्व विकासाला उपयोग होईल. पण आपण हे करतो का? आज आपल्याच मनाशी विचारून बघा आपण किती दिवसात एखादं पुस्तक वाचलं आहे का? वर्तमानपत्रातील ठळक बातम्या सोडून त्याचे बारकावे वाचले का? आपल्या घरातल्या लोकांबरोबर किती संवाद साधतो. मी मुद्दामून संवाद हा शब्द वापरला. संवाद म्हणजे प्रश्नोत्तर नाहीत. आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना कधी भेटलो त्यांच्याशी बोललो या गोष्टीला किती दिवस झाले हा विचार करून बघा. याचा अर्थ आपण वास्तव जगापासून लांब जाऊन आभासी अशा वास्तव वाटणाऱ्या जगामध्ये रममाण होतो.
अशा आभाशी जगातून आपण वास्तव जगात येणे म्हणजेच क्रांती. क्रांती घडण म्हणजे मुळातून सर्व बदलणं. पण हा बदल आपल्यामध्ये झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी त्याबद्दलची प्रचंड चीड राग आपल्या मनात असला पाहिजे तरच या गोष्टी होऊ शकतात. आपल्याला राग येतो चीड येते आणि आपण काहीतरी आदळापट करून आपले नुकसान करून घेतो समर्थ रामदास म्हणतात 'नको रे मना कोप हा खेदकारी' म्हणजे संतांनी सुद्धा रागावू नका चिडू नका असे सांगितलेले नाही. जो राग शांत झाल्यावर आपल्याला वाईट वाटेल आपण चुकलोय असे वाटेल असा राग नको. 
अशा आपल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण क्रांती करू शकतो ही जरी वैयक्तिक क्रांती असली तरी सामाजिक क्रांतीसाठी सुद्धा शस्त्र हातात घेण्याची गरज नाही. जसे मी रस्त्यावर कुठे थुंकणार नाही घाण टाकणार नाही रॉंग साईडने गाडी चालवणार नाही त्याच पद्धतीने दुसरा कोणी तसं करत असेल तर आपण तिथे आपल्या नम्र आवाजामध्ये 'आपण असे करू नका.' असे स्पष्टपणे मी सांगेन. तेवढा स्पष्टपणा आणण्यासाठी सुद्धा आपल्याला क्रांतीची गरज आहे. 
क्रांती ही बाहेरून येणारी गोष्ट नसून ती आपल्या मनातून आली पाहिजे. आपल्या मनात कुटुंबात समाजात ज्या वाईट गोष्टी सुरू आहेत त्याबद्दल आपल्याला राग चीड निर्माण होऊन त्याचा समूळ नाश कसा करावा यासाठी ही क्रांती गरजेची आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे उदाहरण घेतल्यास त्यांना चाललेल्या या परिस्थितीचा मनापासून राग आला त्यामुळेच त्यांनी सशस्त्र क्रांतीचा उठाव केला. वसंतराव नाईक यांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. पुणे येथील शनिवारवाडा येेथील जाहीर सभेत "जर या दोन वर्षात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही, तर या शनिवारवाडा समोर मी जाहीर फाशी घेईन" अशी भिष्मप्रतिज्ञा केली. आणि अल्पावधीतच त्यांनी हरितक्रांती घडवून आणली.  शस्त्र हातात न घेता केलेली ही क्रांतीच.
हे सर्व आज सांगायचे कारण तर आजचे बालक  हे उद्याच्या समर्थ भारताचे नागरिक आहे या सर्वांना आपण सर्वांनी सक्षम केले तरच ते भारताला समृद्ध बनवतील.
चला तर मग आपणही या क्रांती सप्ताहाच्या निमित्ताने एक विषय ठरवून त्यामध्ये क्रांती करूया.  अशी क्रांती करूया जी आपल्या भावी पिढीला उपयोगी होईल. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होईल. आणि खऱ्या अर्थाने क्रांती सप्ताहाचा अर्थ आपण साकारू शकू.

 ज्योत्स्ना पवार
close