"माझ्याना आयुष्यात सतत अपयश पडतं. जणूकाही त्या विक्रम आदित्यच्या वेताळाप्रमाणे आपल्याच मानगुटीवर बसतं ?माझं इंजिनिअरिंगला पुन्हा पुन्हा बसून सुद्धा शिक्षण पूर्ण का होत नाही .पाचव्यांदा परीक्षेला बसून सुद्धा माझ्या पदरात अजून सीए का पडत नाही ?मागील सहा वर्षात चार उद्योग करून पाहिले परंतु धंद्यात खोट.... हेच आमच्या नशिबी लिहिलंय.." ही आणि अशा प्रकारची व्यक्तव्य जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा आपलं आपल्याला समजायला हवं आपण सर्वजण पूर्व प्राथमिक पासून शिक्षण घेत आलो. प्रत्येक वर्षी चांगल्या गुणांनी पासही झालो ,मग गाडी आता का अडखळत चालली . लहानपणी '"जसे की पाढे पाठांतराचा कंटाळा ,निबंध च्या पुस्तकातून आयता निबंध लिहून काढणे, गृहपाठाचे उत्तरे नवनीत मधून पूर्ण करणे, मराठीचे , इंग्रजी व्याकरणाचा वरवर अभ्यास करणे "या अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यापुढे येतात . मुलं शिक्षण म्हणजे शाळा ,अभ्यास ,गृहपाठ, परीक्षा, गुण यांच्याच मागे धावत असतात .अतिशय रोगिष्ट अशा स्पर्धेच्या दलदलीत स्वतःला ढकलतात .दलदल म्हटली की वरवर सपाट दिसणारा पृष्ठभाग ...आत अडकला तर तो अडकूनच बसतो. आपलेही असेच होते ..दलदलीप्रमाणे आपण नुकतेच शिक्षणाच्या मागे लागतो. ज्ञान संपादन करण्याच्या मागे नाही. खरोखरच या शिक्षणाने आपण आपल्या जीवनाचा वेळ उत्तम घालू शकलो तर आज ज्ञान प्राप्त झाले असे म्हणता येईल नाही का ?
डॉ.आंबेडकरांनी लिहिलेल्या " विद्यार्थ्यांनो जागृत व्हा "लेखात यामध्ये त्यांचे पहिलेच वाक्य फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण होते ते लिहितात "विद्यार्थी दशेत असणाऱ्या काहींना मी स्वानुभवाने सांगू इच्छितो "...मी जेव्हा केव्हा हा लेख बघते ,वाचते प्रत्येक वेळी या एका वाक्यातून मला वेगळा अर्थ मिळत जातो. या वाक्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे परवा आमच्या वर्गात घडलेला प्रसंग ..तास होता इतिहास असा त्यामध्ये शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले.. अशा अर्थाचे वाक्य आले यावरून मी विद्यार्थिनींना शून्यातून निर्मिती म्हणजे काय असे म्हटल्यावर मुली एकदम म्हणाल्या या वाक्प्रचाराचा अर्थ किंवा वाक्यात उपयोग परीक्षेला येणार नाही.. तर मी चक्राहून गेले काय बोलावे सुचेना ,अपार्टमेंटच्या जमान्यातील या मुलींनी प्रत्येक घरांच्या खोल्यांची दारे अशा प्रकारे बंद केली ,तर 'घर 'ही संकल्पना त्यांना कळणार नाही .त्याचप्रमाणे त्यांनी विषयाचे हे कप्पे असेच पाडले ,तर त्यांना नक्की अभ्यासक्रम म्हणजे काय? अभ्यास म्हणजे काय? तो कशासाठी ?का करायचा? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहतील. पाठ्यपुस्तकातील धडे वाचणे म्हणजे आपल्याला या विषयातील ज्ञान झालं का? ज्ञानाचे उपयोजन जीवनात करतो का? हे बघणं खूप महत्त्वाचे आहे . सध्याच्या काळात ज्ञानरचनावादावर पाठ्यपुस्तकांची निर्मिती झाली आहे .आपण कोणत्याही विषयाची पाठ्यपुस्तके बघा त्याच्यामध्ये ज्ञानाबरोबर उपयोजनावरही भर दिला जातो ,पण खरोखर हे दैनंदिन जीवनात घडत आहे का ?शिक्षणातून शिक्षक विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत ,सुशिक्षित असे विद्यार्थी मन घडवितात. मुलांनी मुलांसारखं निसर्गतः तगलं पाहिजे नी शिक्षण घेतलं पाहिजे.
"श्रावणमासी हर्ष .. मानसी हिरवळ..दाटे चोहिकडे "या ओळी केवळ पाठ करण्यासाठी नसतात तर त्या जगण्यासाठी असतात. कार्यानुभव सारख्या विषयात मुलींना एकदा पुष्पगुच्छ तयार करायला सांगितला मुलींनी पुष्प गुच्छात रंगीबेरंगी फुले वापरून आकर्षक गुच्छ तयार करण्यास सुरुवात केली. कृत्रिम रंगाच्या चमचमणाऱ्या जिलेटिन पेपर मध्ये त्यांनी फुले, गुंडाळली पण मुलींना त्याचा रंग अनुभवता आला नाही ना गंध अनुभवता आला... हे सारं का घडतं कारण आपण सारे जगकृत्रिम करू पाहतो पाहू इच्छितो.
अभ्यासाला आज सर्वच विद्यार्थ्यांनी एका बॅरियर्समध्ये घातलेले आहे. अभ्यासाचा अर्थ ते एखाद्या साच्याप्रमाणे घेतात एकदा का साचा आला की कला हरवली मग त्यात यांत्रिक पणाला कारण साच्यातून घालून बनवलेली मूर्ती मी हाती घडवलेली मूर्ती यात फरक राहणार.. हाताने मूर्ती घडवितांना आपण त्यात तन-मन अर्पून त्या मूर्तीच्या आपल्या संवेदना जोडत असतो पण आजच्या यांत्रिक युगात शिक्षण घेऊन मानवी संवेदना आणि खऱ्या ज्ञानाची ओळख हरवत जात आहे का? अशी भीती निर्माण झाली.
आज घेतल्या जाणाऱ्या शिक्षणाने मुलांच्यातील चांगुलपणा वाढीस लावून त्याचे बी रुजवणे .चांगल्या घटनांची जाणीव निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे .
फक्त गुण, क्रमांक हीच ज्ञानाची मोजपट्टी नव्हे. आज काही जण शिक्षणातून ज्ञानाचा उपयोग विध्वंसक गोष्टी करण्यामागे करू लागले... विद्यार्थी शिक्षणाने एकमेकांशी संधान साधू लागली याचवेळी शिक्षणातील घेतलेल्या ज्ञानाने अनेक वेळी नको त्या घटना घडू लागल्या ..उदाहरणार्थ बॉम्ब निर्मिती, गर्भलिंग चाचणी द्वारा स्त्रीभ्रूण हत्या या प्रकारात आपण घेतलेले शिक्षण खऱ्या अर्थाने ज्ञानपूर्ण झाले का? तर नाही, शिक्षणाने प्राप्त झालेल्या ज्ञानाने विद्यार्थ्यांनी आपले वर्तन सत्कृत्य व सकारात्मक ठेवले पाहिजे .पुस्तकी शिक्षणाने माणूस फक्त पोपटपंची करू लागतो. व्यावसायिक , व्यवहार ज्ञानाचे शिक्षण घेतले तरच त्याचा जीवनात आपल्याला उपयोग होतो. नाहीतर दलाई लामा 'आपल्या काळात 'या कवितेत म्हणतात त्याप्रमाणे
देखाव्याच्या खोलीत खूप काही मांडलेलं
पण खोटी ची खोली रिकामी
ज्ञानाचे भांडार वाढलेले
पण नेमकेपणाचे झरे आटलेत
अशी आपली परिस्थिती निर्माण होऊ नये.
ज्योत्स्ना पवार
(शिक्षिका हुजूरपागा प्रशाला)

