shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अकोले तालुक्यातील निंदणीय प्रकार



अहमदनगर प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या गणोरे गावातील उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याने एका व्यक्तीची जागा हडपण्याचा प्रकार केला असल्याचे उघडकीस आल्याने तथा सदर मुळ जागा मालक व्यक्ती हा मयत आहे की ?, बेपत्ता आहे ?  याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र आंबरे यांनी या प्रकरणी आपले लक्ष केंद्रित केले असता माहिती अधिकारांतर्गत अधिक माहिती जाणून घेत सदर घटनेचा सखोल मागोवा घेतला आणी ही घटना उघडकीस आणली असून प्रशासनाकडूनही उपसरपंच व स्वयंघोषित संत म्हणून घेणाऱ्या सदस्याला प्रशासनाने चांगलीच चपराक लगावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात माजी उपसरपंच असलेल्या या ग्रामपंचायत सदस्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीररीत्या सदर व्यक्तीची मिळकत बळकावल्या प्रकरणी जागेचा उतारा रद्द करण्याचा आदेश प्रशासनाने काढला असल्याने राजेंद्र आंबरे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून उर्वरित कामातही लक्ष घालून सदर प्रकरण तडीस लावणार असल्याचे राजेंद्र आंबरे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.राजेंद्र आंबरे यांनी सन २०१४ साली माहितीच्या अधिकाराखाली याबाबत माहिती मागवली होती. मात्र ग्रामपंचायत सदस्य नामदेव आंबरे याने तात्कालीन ग्रामसेवक ढाकणे यांच्यावर दबाव आणून माहिती मिळविण्याकामी प्रतिबंध घातल्याने सदर माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.राजेंद्र आंंबरे यांनी पंचायत समिती अकोले तसेच राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांच्याकडे अपील दाखल करून सदर माहिती अपिलात राज्य माहिती आयोग नाशिक यांनी सन २०१८ साली निकाल देऊन जन माहिती अधिकारी ढाकणे यांना माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजेंद्र आंबरे यांनी जिल्हा परिषद अहमदनगर, पंचायत समिती अकोले यांना वेळोवेळी अर्ज करून सदरील अपहाराबाबत पत्रव्यवहार केला होता. परंतु प्रशासनाकडूनच या प्रकरणास केराची टोपली दाखवल्याने शेवटी मुख्यमंत्री, सचिवालय, विभागीय महसूल आयुक्त नाशिक, व जिल्हा परिषद अहमदनगर प्रशासनाकडे त्यांनी वेळोवेळी तात्कालिन ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच नामदेव किसन आंबरे याच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार दाखल करून रितसर चौकशी व कारवाई करण्याची मागणी श्री.राजेंद्र आंबरे यांनी केली होती.
त्यानुसार पंचायत समिती अकोले यांना मुख्यमंत्री कार्यालय तसेच जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून आलेल्या चौकशी आदेशानुसार चौकशी केली असता त्यात गणोरे येथील मयत जगन्नाथ पुंडलिक आप्रे यांच्या नावावर असलेली मालमत्ता ग्रामपंचायत मिळकत नंबर १९३ वर असलेली मालमत्ता तत्कालीन उपसरपंच व स्वयंघोषित संत नामदेव किसन आंबरे याने २००३ साली मयत जगन्नाथ यांचा मुलगा सोमनाथ जगन्नाथ आप्रे व नामदेव आंबरे याने केलेल्या ५ रुपयांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सन २००३ साली तत्कालीन ग्रामविकास अधिकारी  बाबासाहेब पंडितगीर गोसावी यांनी मिळकत नंबर १९३ ही नामदेव आंबरे यांच्या नावावर करून दिली होती. त्यानंतर वर्तमानपत्रात एका नामांकित वकिलामार्फत चुकीच्या पद्धतीने नोटीस प्रसिद्ध करुन सदर मिळकत ही आमच्या अशीलाने खुश खरेददीने १९९३ साली विकत घेतली असल्याचे नोटिसीमध्ये सांगण्यात आले होते.त्यानुसार दबावतंत्राचा अवलंब करून माजी उपसरपंचाने स्वतःच्या नावावर सदर जागा केली असल्याचे उघडकीस आले आहे. अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी आर. डी. अभंग यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात म्हटले की, या प्रकरणी चौकशी केली असता त्यांना मुळ जागामालक मयत असताना त्यांच्या वारसांद्वारे सर्वप्रथम रितसर वारस हक्क अधिकार प्रक्रिया राबवुन त्याद्वारे मालकी हक्क प्राप्त करून नंतर त्या मालमत्तेचे हस्तांतरण होणे कायद्याच्या दृष्टीने अभिप्रेत असताना तशी कायदेशीर प्रक्रिया न राबवता केवळ प्रतिज्ञापत्र सादर करुन तत्कालीन उपसरपंच नामदेव आंबरे यांनी स्वतः चे नाव लावले असल्याचे निदर्शनास येत असून हे कायद्याचे दृष्टिकोनातून अयोग्य व चुकीचे असल्याचे श्री. राजेंद्र आंबरे यांनी निदर्शनास आणून दिले. सदर नोंदीचा उतारा (८ अ ) तात्काळ रद्द करणे योग्य असून या चौकशी अहवालात उपसरपंच नामदेव किसन आंबरे याने तब्बल १० वर्षे उशीर करून हे प्रकरण नोंदीसाठी ग्रामपंचायत मध्ये दिले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच पदावर कार्यरत होते. आपल्या पद व अधिकारांचा गैरवापरच नव्हेतर दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या नोंद केली असल्याचे निदर्शनास आले असल्याने दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी श्री.राजेंद्र आंबरे यांनी केली आहे.
याचबरोबर सदर जागेचे मालक असलेले मयत जगन्नाथ आप्रे यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सोमनाथ जगन्नाथ आप्रे हा सन १९९३ सालापासून गावातून अचानक गायब होण्याचा आणि या मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठग नामदेव किसन आंबरे याचा परस्पर काही संबंध आहे का ? नाही ? ज्या पद्धतीने जागा हडपणे मयताचा मुलगा नेमका कधी, कुठे, कसा गायब झाला याचा अद्याप कोणालाच काही थांगपत्ता लागलेला नाही. याचीही केंद्रीय उच्च तपास यंत्रणांमार्फत चौकशी करावी अशी मागणी श्री.राजेंद्र आंबरे यांनी केली आहे. 
गेली तीस -पस्तीस वर्षापूर्वीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले असून सातबारा कधी कोरा होणार किंबहुना सदर जागा मालकाचे पुढे काय झाले ? याचा उलगडा कसा होईल ?, याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
close