युवकांनी संस्थात्मक रचना व कार्य समजून घेणे काळाची गरज - ॲड. सिद्धेश गायकवाड
रोट्रॅक्ट पदाधिकारी व संचालकांचा जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न : सिंहगड इन्स्टिट्यूट सुट्टीदिवशीही गर्दीने फुलले
फोटो ओळ : पुणे येथे लुमोस या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी रोट्रॅक्टचे युवक युवती व रोट्रॅक्ट कौन्सिल मेंबर.
इंदापूर ( प्रतिनिधी ) सामजिक जीवनात काम करीत असताना, युवकांना कोणत्यातरी संस्थेबरोबर किंवा संस्थेत काम करावे लागते. आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट संस्थेशी निगडित आहे. सरकारी, खाजगी, निमसरकारी तसेच आदी संस्थांचा कारभार व रचना आपल्याला माहिती असल्यास काम करणे सोपे जाते. त्यामुळे युवकांनी संस्थात्मक रचना व त्याची कार्य समजून घेणे काळाची गरज आहे. असे आवाहन पुणे रोट्रॅक्ट प्रांतप्रतिनिधी ॲड. सिद्धेश गायकवाड यांनी केले.
पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कंम्प्युटर अप्लिकेशन नऱ्हे, येथे रविवारी रोटरी इंटरनॅशनलच्या अंतर्गत रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्टच्या वतीने, जिल्हास्तरीय पदाधिकारी व संचालक प्रशिक्षण कार्यशाळा, "लुमोस" या नावाने, रोटरीचे प्रांतपाल मंजू फडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी रोट्रॅक्ट प्रांत प्रतिनिधी ॲड. सिद्धेश गायकवाड बोलत होते.
यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संचालिका विजया पुराणिक यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्धाटन करण्यात आले. या प्रसंगी माजी प्रांतप्रतिनिधी अर्जुन देव, कार्यक्रम अधिकारी साची कोठारी, सचिव अर्जुन फिरके, शिष्टाचार अधिकारी समृद्धी कुलकर्णी, प्रशिक्षक संकेत जैन, शरद कोरेकर, निखिल जैन, राधिका शिंदे, सौरव थोरात व जिल्हा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रविवारी सिंहगड इन्स्टिट्यूटला सुट्टी असताना देखील युवकांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याने, महाविद्यालयाचा परिसर दररोजच्या सारखे गर्दीने फुलला होता. यावेळी माजी प्रांतप्रतिनिधी ॲड. आकाश चिकटे यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी दोन जिल्ह्यातून जवळपास ७० विविध क्लबचे अध्यक्ष व सचिव कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी साची कोठारी यांनी केले तर आभार संकेत जैन यांनी मानले.
चौकट : प्रशिक्षणात सातशे युवक प्रतिनिधी सहभागी
रोट्रॅक्टच्या "लुमोस" कार्यशाळेत, पुणे शहर, पुणे ग्रामीण, पनवेल, अलिबाग, रायगड, इंदापूर, बारामती, दौंड भागातून एकूण ७०० युवक - युवतींनी सहभाग घेवून, प्रशिक्षण घेतले. जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत, रोट्रॅक्टच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठया प्रमाणत युवक कार्यक्रमात सहभागी झाल्याने, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

