सातारा प्रतिनिधी:
आज ज्या नोकऱ्या आपणाला चांगल्या वाटतात त्या कालबाह्य होऊन नवीनच पद्धतीच्या नोकऱ्या व कौशल्य भविष्यात आपणाला लागणार आहे. यासाठी आपणाला अद्ययावत राहावे लागेल. त्यासाठी भविष्यवेधी प्रयोग शैक्षणिक क्षेत्रामध्ये करावे लागतील. असे मत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा.सूरज मांढरे यांनी व्यक्त केले, ते रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कर्मवीर जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी होते. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. भगीरथ शिंदे व संस्थेचे संघटक मा.डॉ.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की,रयत शिक्षण संस्थेत येण्याचा मला मनस्वी आनंद झाला आहे कारण आज जरी मी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणायुक्त पदी असलो तरी माझ्या प्रशासन सेवेच्या प्रारंभाला रयत शिक्षण संस्थेचा परिसस्पर्श झालेला आहे. समाज सुधारणा करणारा समाजसुधारक हा जनतेच्या जीवनावर खरोखर प्रभाव टाकत असतो अशा प्रकारचे एक प्रभावी समाजसुधारक म्हणजे कर्मवीर अण्णा. स्वातंत्र्यपूर्व काळांमधील समाज म्हणजे एक विषमगटाची साखळी होती यातील काही कड्या मजबूत तर काही कमजोर होत्या. अशा कमजोर कड्यांमध्ये ताकद आणण्यासाठी अज्ञान, परंपरा व काही रूढी यांच्या विरोधात शिक्षण देऊन जनतेला सक्षम करावयाचे होते आणि हे कार्य अण्णांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केले. देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बऱ्याचश्या जनतेला स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थच माहीत नव्हता. स्वातंत्र्यानंतर आपण अतिशय मजबूत व्हावे यासाठी शिक्षणावर कार्य होणे गरजेचे होते आणि हे कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यात उभे केले. शिक्षणावर भरपूर खर्च केला पाहिजे अशा प्रकारचा एक विचार मांडला जातो परंतु हा खर्च नेमका कशासाठी होतो या खोलामध्ये बरेच जण जात नाहीत. केवळ शैक्षणिक फी वाढवणे, उंच इमारती बांधणे, चांगले फर्निचर निर्माण करणे म्हणजे शिक्षणावर खर्च झाला असे म्हणता येणार नाही. त्यासाठी वर्गातील अध्ययन अनुभव किती दर्जेदार आहेत हे पाहावे लागेल. मी एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेलो असता विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर असे आढळून आले की त्या विद्यार्थ्यांना शिक्षक जे शिकवतात ते चांगले वाटते. ते जे टी.व्ही. अथवा संगणकावर शिकतात त्यापेक्षा ते त्यांना अधिक भावते. जे विद्यार्थ्यांना भावते त्याकडेच आपण लक्ष देण्याची गरज आहे. केवळ क्रीडांगणे उभी करून ऑलिंपिकचे खेळाडू तयार होतील का ? थोडक्यात साचेबद्ध विचार आपणाला सोडावे लागतील. आज शासनाचे ७० हजार कोटी शिक्षणावर खर्च होतात. ज्ञान असे हवे की त्याला व्यवहारामधील संवेदना समजल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांची सर्वांगीण म्हणजे ३६० अंशातून प्रगती व्हायला हवी. माणूस घडवते ते खरे शिक्षण. आजही राज्यामध्ये एक कोटी निरक्षर आहेत हे आजचे वास्तव आहे. अण्णांनी केवळ संस्था स्थापन न करता त्यास कमवा आणि शिका या योजनेची जोड दिली आणि यामुळेच समाजामध्ये असणारी श्रेणीबद्धता कमी होण्यासाठी मदत झाली. शिक्षणक्षेत्रातील श्रेणीबद्धता नष्ट करण्याची गरज आहे. यासाठी तर कर्मवीर अण्णांनी शिक्षणाला श्रमाची जोड दिली होती.
श्रम हे माणसा माणसातील भेद नष्ट करतात. भारतामध्ये अजूनही श्रेणीबद्धता बाहेरच्या सर्व क्षेत्रांमध्ये दिसते आहे. दुर्दैवाने भारतामध्ये तांत्रिकदृष्ट्या उच्च शिक्षण घेतलेला विद्यार्थी पदवीदान समारंभातच जबाबदारी स्वीकारू शकत नाही हे आजचे वास्तव आहे; परंतु हे मात्र आपणाला इस्राइल, दक्षिण कोरिया व इतर देशांमध्ये आढळते. इन्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणतात की, भारतामध्ये तयार झालेल्या इंजिनियरला अनुरूप इंजिनिअर करण्यासाठी दोन वर्षे आम्हाला काम करावे लागते. त्यामुळे आपण जे शिक्षण विद्यार्थ्यांना देतो आहे त्यावर विचार करण्याची गरज आहे. १८३८ पासून सुरू झालेल्या शिक्षण पद्धतीत गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये केवळ आपण पाच वेळा वेगवेगळे आयोग आणून बदल केले. गेल्या दशकाचा व शतकाचा विचार करत असता समाज बदलाचे प्रमाण खूप कमी होते; परंतु सद्यस्थितीमध्ये नवतंत्रज्ञानामुळे पाच दहा वर्षापेक्षाही एक दोन वर्षातच मानवी व्यवहारात बदल होत आहेत. त्यामुळे वर्गातील शिक्षण अगदी पाच वर्षाच्या कालावधीतच कालबाह्य ठरते की काय? असे वाटते. मोबाईलच्या युगामध्ये लोकांचे बँकेत जाणे बंद झाले आहे.
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये टेस्लासारख्या कार येऊ लागल्या आहेत. जर भविष्यात सेन्सर सिस्टीम अधिक भक्कम झाली तर ड्रायव्हरलेस कार भारताच्या रस्त्या रस्त्यावर दिसू लागतील. मग सध्याच्या कार मध्ये गुंतवणूक करणारे उद्योग असतील, बँकिंगचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी असतील, यांनी कोणत्या पद्धतीचे शिक्षण घ्यावे हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. पारंपरिक शेती व सध्या चालू असणारी शेती याच्यामध्ये सुद्धा फार मोठा बदल होत आहे; त्यामुळे जे ज्ञान विद्यार्थ्याला किंवा जे कौशल्य विद्यार्थ्याला वर्गात आपण देणार आहोत ते अद्ययावत असणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही लवकरच वय वर्षे तीन ते वय वर्षे सहा या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी एक उपक्रम राबवत आहोत. रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेने की ज्यांना फार मोठे रिसोर्सेस आहेत त्यांनी वाटा उचलायला हवा. यासाठी शासन, एनजीओ, सीएसआर, पालक व संस्था या पाच जणांनी मिळून योगदानाची वज्रमुठ तयार करण्याची गरज आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवीसाहेब म्हणाले की, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दारिद्र्यात पिचलेल्या बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे समाजउत्थानाचे काम पण वेगळ्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभे केले. आज या रयत शिक्षण संस्थेचे एका वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहापासून कार्यास सुरुवात केली. वयाच्या पंधराव्या वर्षापासून ४२ वयापर्यंत कर्मवीरांनी वसतिगृहयुक्त शिक्षण व प्राथमिक शाळा ही आपले कार्यक्षेत्र निवडले होते. जवळपास स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ५७८ प्राथमिक शाळा अण्णांनी उभारल्या होत्या. शासनाच्या धोरणानुसार त्या सर्व शासनाकडे हळूहळू टप्प्या-टप्प्याने वर्ग केल्या. या शाळा एकाच टप्प्यात घेण्याची शासनाची देखील त्यावेळी आर्थिक तयारी नव्हती. प्राथमिक शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षक हवेत यासाठी १९३५ ते १९४० या काळात अण्णांनी डी.एड. कॉलेजची स्थापना केली. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्यानंतर अण्णांनी आपले लक्ष माध्यमिक शिक्षणाकडे केंद्रित केले. १९४० मध्ये महाराजा सयाजीराव विद्यालयापासून माध्यमिक शिक्षणक्षेत्रात तर १९४७ साली छत्रपती शिवाजी कॉलेजच्या रूपाने महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रात अण्णांनी संस्थेचे कार्य पुढे चालू ठेवले. त्यावेळची सामाजिक परिस्थिती विचारात घेता अण्णांचे हे कार्य अलौकिक होते. संस्थेच्या बऱ्याचशा विद्यालयांना व महाविद्यालयांना समाज सुधारकांची नावे असून यातील लोकसहभाग हा लक्षणीय होता. अण्णांची विद्यालये ही अत्यंत गरजू आणि मागास ग्रामीण भागामध्ये उभारली गेली होती. आज संस्थेकडे ७५३ शाखा असून साडेचार लाख विद्यार्थी, १५ हजार सेवक वर्ग असून आता गुणात्मक वाढीकडे संस्था काम करीत आहे. अण्णा हे सर्व समाजासाठी दीपस्तंभ असल्याने त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण त्यांची जयंती प्रतिवर्षी साजरी करतो. कौशल्य विकास व कम्युनिकेशन स्किल विकसित करण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवत आहे. एक प्रशासक या नात्याने कालसुसंगत सेवाशर्ती, नवीन शैक्षणिक धोरणासाठी सुसंवाद व शासकीय पातळीवरून शिक्षण प्रशिक्षण व्हावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या काळामध्ये जे समर्पण व प्रामाणिकपणा रयत सेवकांनी व कार्यकर्त्यांनी दिला तसाच किंवा त्याहूनही जास्त प्रामाणिकपणाची आज संस्था पुढे नेण्यासाठी गरज असल्याचे ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा.विकास देशमुख यांनी केले. ते म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोंबर १९१९ रोजी संस्थेची स्थापना बहुजन समाजाचा विकास हा शिक्षणाशिवाय होऊ शकणार नाही हे ओळखून केली. त्यामुळे आज महाराष्ट्र देशामध्ये शिक्षणक्षेत्रात अग्रेसर दिसतो याचे श्रेय निश्चितच कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला आहे. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक महात्मा गांधी, महाराजा सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, सद्गुरू गाडगे महाराज, वि.रा. शिंदे यांनी केले. अण्णांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांनीही साथ दिली. रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण संस्था नसून संस्कारपीठ आहे. समाजाच्या गरजा ओळखून संस्थेने आपल्या धोरणात बदल केले आहेत म्हणून संस्था राष्ट्रीय विकासात सुद्धा मोलाची भूमिका बजावत आहे.
उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी मानले. कर्मवीर कुटुंबीय, सहसचिव मा.बी.एन. पवार, ऑडिटर प्रि.डॉ.शिवलिंग मेनकुदळे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा.रामचंद्र कोरडे, शिक्षणाधिकारी मा.प्रभावती कोळेकर, मा.शबनम मुजावर, मा.सुभाष शिंदे, रवींद्र खंदारे, संदेश जाधव तसेच संस्थेचे कायदा सल्लागार दिलावर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेम्बर्स, लाईफ वर्कर्स, स्थानिक शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संभाजी पाटील यांनी रयतगीत सादर केले.
*प्रा.डॉ.सुभाष वाघमारे*
प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख,पदवी व पदव्युत्तर मराठी अभ्यास व संशोधन केंद्र,
प्रसिद्धी विभागप्रमुख,छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा.
(घटक महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा) भ्रमणध्वनी: ९८९०७२६४४०.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.बाबुराव उपाध्ये (सर)
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

