shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कडी .....

कडी

            ( लेखिका : अनुरिता झगडे

घराची साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोंड्याच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला..... मै हूँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्र घरात एकटे असू... आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.  मनाच्याही दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो. 

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर.... कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर... मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात.... जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग..... अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चात्ताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला होती हे सहज विसरुन जातो. 

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत... घरात... समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते. 

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं... दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.  आपणही जरुर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल. 

फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा.
 
- - - लेखिका : अनुरिता झगडे , अ .नगर

close