सोमवारी रात्री दोन दिवस चाललेल्या भारत व पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात भारताने पाकिस्तानचा विक्रमी पराभव केल्याने पाकिस्तानमधील सामान्य क्रिकेट रसिकांपासून ते माजी क्रिकेटपटू, क्रिकेट पंडित व सोशल मिडीयावर तथाकथीत वनडे किंग पाकिस्तान संघ व संघातील प्रत्येक सदस्य, टिम मॅनेजमेंट व खास करून कर्णधार बाबर आझमवर टिकेचा अक्षरशः भडीमार होत असून बाबर प्रत्यक्ष त्या लोकांसमोर समक्ष उभा असता तर काय झालं असतं ? या प्रश्नाचं उत्तर फक्त परमेश्वरच देऊ शकतो. इतकं गंभीर वातावरण पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात झालं असून सोमवारची रात्र जणू पाकिस्तानवर काळरात्रच कोसळली की काय असं चित्र तेथील मिडीया, प्रसारमाध्यमे, युट्यूब चॅनेल्स यांच्यावरील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर जाणवत होते.
श्रीलंकेतील कोलंबोस्थित आर. प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषकाच्या सुपर फोर गटाच्या लढती सुरू असून बहुप्रतिक्षित अशी हाय होल्टेज मॅच भारत व पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यात रविवारी दुपारी सुरू झाली. मात्र भारताचा डाव अर्धा संपला असताना पावसाला सुरुवात झाली मग दिवसअखेर पाऊस थांबलाच नाही. त्यांनतर खास या सामन्यासाठीच ठेवलेल्या राखीव दिवशी उर्वरीत खेळ खेळला गेला. रविवारी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून श्रीलंकेतील पाऊस, खेळपट्टया यांचा कुठलाच विचार न करता भारताला फलंदाजीस पाचारण केले आणि तेथेच त्याचा आख्खा प्रयोगच फसला. याच स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात व मागील पाच टि२० सामन्यात पाकच्या आघाडीच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची पुरती वाईट हालात करून ठेवली होती. या गुलाबी आठवणी ध्यानात ठेवून बाबरने पुन्हा एकदा भारताला प्रथम फलंदाजी दिली. मात्र या वेळी भारतीय फलंदाज किती तयारीने आले आहेत हे त्याला प्रत्यक्ष मैदानात त्याचे हुकमी हत्यार शाहिन आफ्रिदी, नसीम शहा, हारिस रऊफ व फईम आश्रफ हे जलदगती फिरकीपटू शादाब खान यांची भारताचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी केलेली पिटाई पाहून अक्षरशः भोवळ आली असावी. पाकच्या सुदैवाने रोहित व गिल १२३ धावांपर्यंत पाठोपाठ परतले.
पाऊस सुरू होईपर्यंत विराट कोहली व १७३ दिवसानंतर संघात परतलेल्या लोकेश राहुलने कोणतीही पडझड होऊ न देता भारताचा डोलारा सांभाळला. मात्र त्यानंतर सोमवारी २५.५ षटकात दोघांनीच नाबाद राहात २०९ धावांची भर तर घातलीच शिवाय दोघेही नाबाद शतकं ठोकून परतले व पाकसमोर ३५७ धावांचे महाकठिण लक्ष ठेवले. त्यानंतर भारताच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना पाकच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली व वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे २२८ धावांचा पराभव पाकच्या माथी मारला.
भारताकडून जसप्रित बुमराहा, हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूरने प्रत्येकी एक तर चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने अवघ्या पंचवीस धावात पाच फलंदाज गुंडाळले. जखमी हारिस रऊफ व नसिम शहा फलंदाजीस येऊ न शकल्याने आठ बाद एकशे अठ्ठावीस धावांवरच पाकचे ताबूत थंडावले आणि त्यानंतर पाकिस्तान मध्ये क्रिकेटपटूंच्या नावाने शिमगा सुरू झाला. यामध्ये पाकिस्तानातील माजी क्रिकेटपटूंचे युट्यूब चॅनेल्स, प्रसिद्धी माध्यमे आघाडीवर होते. पीसीबीचे माजी अध्यक्ष रमिज राजा, माजी कर्णधार सलमान बट, शोएब अख्तर यांच्या व इतर अनेक चॅनेल्सवर कर्णधार बाबर आझमला नकली किंग म्हणण्या पासून ते त्याच्या आजवरच्या सगळ्या ध्येय धोरणाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली. शिवाय आयसीसी मानांकनात पाकचा संघ तुलनेने कसा कच्चे संघ नेपाळ, झिंबाब्वे, आयर्लंड, युएई, हाँगकाँग, आफगाणिस्तान, बांगलादेश यांना हरवून अव्वल बनला यावर मोठे पारायण सुरू असून स्वतःला किंग समजणारा कर्णधार बाबर आझम याच कमकुवत संघांसमोर धावांचे रतीब ओततो व आयसीसीचे पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळवितो. मात्र खरे बलवान संघ समोर आल्यावर शेपूट घालून धुम ठोकतो. याचे छान पैकी चर्वण संपूर्ण पाकिस्तान सुरू असून या सामन्यात तो कसा बाद झाला इथपासून ते नाणेफेक जिंकल्यावर भारताला फलंदाजी देणं त्याचं कसं चुकलं, गोलंदाजीतील प्रयोग कसे फसले, संघावर नसलेलं नियंत्रण जगासमोर दाखविण्यात पाकमधील कोणताच क्रिकेटप्रेमी मागे नव्हता. आजमितीला बाबर आझम पाकिस्तानातील सगळ्यात मोठा खलनायक ठरला आहे. कोहलीशी होणारी त्याची तुलना बिलकुल बरोबर नसल्याचे समस्त पाकिस्तानी क्रिकेट जाणकारांचे मत बनले असून असून 'खरा किंग' कोहलीच असल्याचे तेथील प्रत्येकाला पटले आहे.
संतापलेल्या पाक क्रिकेट प्रेमींनी तर पाकिस्तान संघातील प्रत्येकाची कुंडलीच बाहेर काढली असून सलामीवीर इमाम उल हक त्याचा काका व विद्यमान निवड समिती अध्यक्ष इंझमाम उल हक याच्या मेहरबानीवर कसा निवडला जातो यावर मोठा काथ्याकूट सुरू आहे. तर फखर झमान म्हणजे दात व नखं काढलेला वाघ असल्याचे सांगण्यात आले. मोहम्मद रिझवान केवळ टि२०तील भांडवलावर वनडे संघात जागा अडवून बसला असल्याचे बोलले जात आहे. चाचा इफ्तिखार, शादाब खान हेही पाकिस्तानी जनतेच्या रडारवर असून पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू निदा डरने या सामन्यात पाकच्या फलंदाजांची फिरकीपटू कुलदिप यादव समोर उडालेली गाळण बघून व पाकचा एकमेव अव्वल फिरकी गोलंदाज शादाब खानची भारतीय फलंदाजांनी केलेली चटणी बघून " जसे पृथ्वीवरून डायनासोर व पाकिस्तानमधून स्पिनर गायब झाल्याचे " धाडसी विधान केले.
या पराभवाचे शल्य पाकिस्तानी रसिकांना जिव्हारी लागले असून त्यांच्या भावना पराकोटीला गेल्या असून भारतीय संघ खरोखर दर्जेदार असल्याची चर्चा पाक मध्ये सुरू आहे. कर्णधार रोहित शर्माच्या प्रत्येक निर्णयाचे कौतुक होत असून गिल, राहुल, कोहली, पांडया, शार्दूल, बुमराहा, सिराज, कुलदिप, जडेजा यांचा आदर पूर्वक उल्लेख केला जात आहे.
मात्र बोलघेवडया शोएब अख्तरने एका विजयाने भारत मोठा होत नाही व पाकिस्तान संपला असं होत नाही, असे दुटप्पी विधान करून भारतात येऊन पैसे कमावण्याठीची चापलुसी सुरूच ठेवली आहे. एकंदर पाहता हा पराभव पाकिस्तानी लोकांना चांगलाच झोंबला असून पाकचे आव्हान अंतिम फेरी पर्यंतच संपले तर या संघाचे पाकमध्ये गेल्यावर काय हालात होतील हे देवालाच ठाऊक ?
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

