नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे महाविद्यालय पुढील मोठी आव्हाने आहेत मात्र विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नवसह्याद्री महाविद्यालयाला आम्ही विद्यापीठाकडून सहकार्य करू. नवसह्याद्री शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी केले.
यावेळी पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर व डॉ. धोंडीराम पवार, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे, अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. मंगेश वाघमारे, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, उपाध्यक्षा सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, संचालिका सानवी सुके, विश्वस्त बाबुराव (नानासाहेब) सुके, प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, डॉ. मनोजकुमार दळवी, प्रा. पंकज भोकरे, प्रा. किरण पवार उपस्थित होते.
नसरापूर येथील नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये यावर्षापासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होत असून काल (दिनांक ०८, सप्टेंबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपथितीत भव्य उदघाटन सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते.
डॉ. सुरेश गोसावी पुढे म्हणाले, विद्यार्थी हा भारताचा चांगला नागरिक बनला पाहिजे आणि यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. विद्यार्थ्यांनी आवड, ध्येय, पेशा आणि व्यवसाय या चारसूत्री कौशल्यावर काम केले पाहिजे. स्थानिक विद्यार्थ्यांनी स्थानिक समाजाच्या गरजांचा अभ्यास केला पाहिजे. समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन केले पाहिजे.
रविंद्र शिंगणापूरकर म्हणाले, दैनंदिन जीवनातील , व्यवहारातील अर्थव्यवस्था विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे, नवीन शैक्षणिक धोरणात इंटर्नशिपला महत्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण करत असताना उद्योजकता कसे होता येइल हा दृष्टीकोन ठेवून काम करावे.
डॉ. धोंडीराम पवार म्हणाले, ग्रामीण भागातील जिवंतपणा, माणुसकी हे नवसह्याद्री शिक्षण संस्थेने कायम ठेवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे फक्त ती शोधण्यासाठी शिक्षकांना कष्ट घयावे लागणार आहेत.
राहुल पाखरे म्हणाले, विद्यापीठाने सुरु करत असलेच्या कनेक्ट युनिव्हर्सिटी या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला भेट द्यावी. विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञान समजून घ्यावेत. युवर्क म्हणून नवीन तंत्रज्ञान अवगत करणे आणि संशोधन करणे हि आपली जबाबदारी मोठी आहे.
पोपटराव सुके म्हणाले, विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारे आणि कंपनी मध्ये गरजेचे असलेले शिक्षण देऊ. तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू आणि कौशल्यपूर्ण अभियंता तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे.
एमसीए विभागाचे उदघाटन करून कॉम्पुटर लॅब चे अनावरण कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविदयालयातील सर्व विभागाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवनाथ गोवेकर, प्रा. राम घुगे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन समन्वयक डॉ.सुहास पाखरे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक डॉ. तानाजी दबडे यांनी केले.

