shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुन्हा एकदा पावसाच्या सावटात भारत - पाकिस्तान लढत !


         पंधरावा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर गटाच्या महत्वाच्या लढतीत दोन पारंपारीक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात एक दोन्ही संघांच्या दृष्टीने आत्मसन्मानाची व अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी निर्णायक लढत रविवारी दहा सप्टेंबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार असून या सामन्यातही कँडीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्याप्रमाणेच पर्जन्य राजाचे तांडव होण्याची शक्यता आहे. परंतु क्रिकेट शौकिनांसाठी आनंदाची वार्ता म्हणजे ११ सप्टेंबर हा दिवस या सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. सामन्याच्या मुळ दहा तारखेला खेळात काही बाधा आली तर दुसऱ्या राखीव दिवशी हा सामना पहिल्या दिवशी ज्या स्थितीत थांबला होता तेथून पुढे खेळला जाईल. यामुळे क्रिकेट रसिकांना भारत पाकिस्तान सामन्याचे थ्रील खऱ्या अर्थाने पुर्णतः अनुभवता येणार आहे.

स्पर्धेत सुरुवातीला सहा संघ सहभागी झाले होते. पहिल्या फेरीतील चाळणीनंतर दोन्ही गटातून अनुक्रमे नेपाळ व अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद झाले.  अ- गटातून पाकिस्तान व भारत तर ब- गटातून श्रीलंका व बांगलादेव सुपर फोर साठी पात्र ठरले. आता हे चार संघ एकमेकांशी एकेकदा झुंजतील व यातील अग्रक्रमाचे दोन संघ अंतिम फेरीत आपसात झुंजतील.
            भारताप्रमाणेच सध्या श्रीलंकेतही पावसाळा सुरू आहे. वास्तविक या स्पर्धेचे मुख्य संयोजक पाकिस्तान आहे.मात्र भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिल्याने भारताच्या हट्टापोटी हि स्पर्धा मोठ्या प्रमाणात श्रीलंकेत खेळली जात आहे. श्रीलंकेत खेळताना याच स्पर्धेत काही सामने बाधीत झाले आहेत. तर पुढील बऱ्याच सामन्यांना पावसाचा फटका बसण्याचा स्थानिक हवामान खात्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पुढील सर्व सामने त्याच प्रेमदासा स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. तरीही भारताचा रविवारचा नियोजित सामना वगळता कोणत्याही सामन्यास राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. याचे कारण सरळ आहे. भारत व पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपूर्ण जगतात फार मोठी आहे. यामध्ये संयोजक पाकिस्तान, श्रीलंका, आशियाई क्रिकेट कमिटी व बीसीसीआयला मोठा मलिदा मिळणार असल्याने या सामन्याला विशेष दर्जा लाभला आहे. जर याच दोन संघात १७ सप्टेंबरला अंतिम सामना झाला तर त्यासाठी काय सवलती दिल्या जातील याचा आताच अंदाज न केलेला बरा.
              सुपर फोर गटात पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरविले असल्याने ते मोठया आत्मविश्वासाने भारताविरूध्द मैदानात उतरतील. तर भारताचा सुपर फोर मधील हा पहिलाच सामना असल्याने भारतावर पाकिस्तानपेक्षा अतिरिक्त दबाव असणार आहे. पाकिस्तान हा सामना जिंकले तर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश बराचसा निश्चित होईल तर भारताला श्रीलंका व बांगलादेश विरूद्धचे सामने दिसतात तेवढे सोपे जाणार नाहीत. त्यामुळे भारताला पुढील मार्ग सुकर करुन अंतिम फेरीत खेळायचे असेल तर पाकिस्तानवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागेल. हे काम दिसतं तितके सोपे नाही त्याचे कारण म्हणजे भारताचे अव्वल चार फलंदाज मागील काही सामन्यात खासकरुन पाकिस्तान विरुद्ध शेळपटासारखे खेळले आहेत आणि या सर्वांची शिकार करण्यात अग्रेसर असलेला डावखुरा जलदगती गोलंदाज शाहिन शहा आफ्रिदी पूर्णतः तंदुरुस्त आहेच शिवाय चांगल्याच जोमातही आहे. याच स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने भारताची टॉप ऑर्डर तहस- नहस करून टाकली होती. त्यावेळी सुदैवाने ईशान किशन -हार्दिक पांड्याची शतकी भागीदारी व पर्जन राजाची कृपा यांनी भारताचा संभावित पराभव टळला.
              रविवारी होणाऱ्या सामन्यात भारताला खास करून आपल्या प्रमुख फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ते जर यशस्वी ठरले तर भारताला विजयाच्या आशा बाळगता येतील मात्र नवख्या नेपाळ विरूद्ध गोलंदाजांची झालेली तारांबळ बघता पाकिस्तानच्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना आवर घालता येईल का ? हा सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न प्रत्यक्ष मैदानावर पावसाने स्वतः न खेळता खेळाडूंना खेळू दिले तर तमाम क्रिकेट शौकिनांना क्रिकेटचा आनंद लुटता येईल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close