"देणाऱ्यांनी देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे "
असा आदर्श जपणारे रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक, श्रीरामपूर जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय परीट धोबी समाजसेवी मंडळाचे विविध पदे भूषविणारे एक कर्तव्यशील व्यक्तिमत्व म्हणून श्री लक्ष्मणराव जगन्नाथ निकमसर सर्वांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.
24सप्टेंबर 1953रोजी श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर या छोट्या खेड्यात जन्म झालेले श्री लक्ष्मणराव निकमसर यांनी रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सेवाभावी विचारांचा त्यांच्यावर ज्ञानसंस्कार झाले. एम. ए. बी. एड. प्रथमश्रेणी प्राप्त करणारे निकमसर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखेत प्रभावी अध्यपान कार्य केले.विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला.
श्री लक्ष्मणराव निकमसर यांच्या व्यक्तिमत्वावर वडील जगन्नाथ काशिनाथ निकम यांच्या सेवाकार्याचा प्रभाव आहे. समाजबांधव यांच्यातील वधू वर अथवा कौंटुबिक नात्यातील दुरावा घालविणे, अडीअडचणी समजून घेऊन वाद नको पण संवाद करा या जाणिवेने समाजकार्य करणारे वडील निकमसरांना आदर्श वाटले, तोच सेवेचा वसा आणि वारसा त्यांना मिळाला. डिसेंबर 1995मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील धोबी परीट समाजबांधवांची जनगणना कार्य व संघटन यांची बांधणी त्यांनी केली. श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व. जयंतराव ससाणे आणि समाजनेते माजी नगराध्यक्ष संजय फ़ंड यांच्या माध्यमातून मार्केट यार्ड परिसरात 24गुंठे जागा अनेकांच्या सहकार्यातून मिळविली. तेथे संत गाडगे महाराज यांचे आता सुंदर मंदिर उभे राहिले आहे.संत गाडगे महाराज यांची सुबक, प्रसन्न अशी मार्बलची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 20डिसेंबर 2013रोजी करण्यात आली. अडबंगनाथ धर्मसंस्थानचे मठाधिपती महंत अरुणनाथगिरी महाराजांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न झाला. या परिसरात दोन खोल्या, पाण्यासाठी बोअर यांची सोय आहे. मुख्यमंत्री साह्य निधीतून 25हजार रुपये मदत मिळाली. 2010पासूनच संत गाडगे महाराज यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम संपन्न होत आहेत.त्यासाठी श्री लक्ष्मणराव निकमसर अधिक भाग घेऊन हॆ उपक्रम समाजातील बांधवामार्फत संपन्न करतात.महामानव डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनसारख्या सेवाकार्याला ते सतत मदत करतात.
एक गतिशील आणि उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणून निकमसर यांचे कार्य कौतुकास्पद आहे. विविध पदावर ते कार्यरत आहेत. 1996 पासून ते महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवामंडळाचे सदस्य आहेत.1996पासूनच श्रीसाईबाबा संस्थान शिर्डी येथे आजीवन सभासद आहेत.
1997पासून श्रीसंत गाडगे महाराज सेवासंघ महाराष्ट्र गिरगाव मुंबई सभासद आहेत. 1998-99 काळात ते श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत बँकेच्या कर्ज समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. 2006पासून ते श्रीरामपूर तालुका परीट धोबी सेवासंघाचे अध्यक्ष आहेत. 29जून 2008 पासून ते महाराष्ट्र परीट धोबी सेवामंडळ जिल्हा अध्यक्ष म्हणून नेतृत्व करतात. नोव्हेंबर 2009ला त्यांना जन्मगावचा नाऊरभूषण पुरस्कार प्राप्त झाला.
श्री लक्ष्मणराव निकमसर यांची भ्रमंती आणि राष्ट्रीय पातळीवरील समाजकार्य कौतुकास्पद आहे. 17, 18एप्रिल 2010रोजी त्यांनी मध्यप्रदेश इंदौर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय धोबी महासंघाच्या उपक्रमात भाग घेतला, त्यांची तेथे कार्यकारिणीपदी निवड झाली. 20, 21एप्रिल 2013रोजी पटणा ईकाई बिहार येथील राष्ट्रीय संमेलनात त्यांनी भाग घेतला.
श्री लक्ष्मणराव निकमसर यांची 15सप्टेंबर 2015पासून श्रीरामपूर येथील जेष्ठ नागरिक आनंद मेळावाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून त्यांनी प्रभावी, लोकप्रिय, समाज उपयुक्त उपक्रम राबविले आहेत. मुलींच्या जन्माचे स्वागत, विविध शिबिरांचे, धार्मिक सहली, जेष्ठांचे वाढदिवस, आदर्शमाता पुरस्कार, आदर्श डॉक्टर पुरस्कार, श्रावणबाळ पुरस्कार, शासकीय योजना मार्गदर्शन मान्यवरांचे मार्गदर्शन, विधवा स्त्री आणि पुरुष यांना धैर्यवान पुरस्कार तसेच कोरोना काळात मदत पूरग्रस्त, भूकंपग्रस्त मदत,गरीब विद्यार्थी मदत, स्नेहभोजन, मेळावे, मनोरंजन असे कितीतरी उपक्रम हॆ निकमसरांच्या जेष्ठाप्रती असलेल्या आपुलकीचे नातेच आहे.ते तालुका पेन्शनर कार्यकारीचेही सदस्य आहेत.
श्री लक्ष्मणराव निकमसर यांना धर्मकार्य आणि समाजकार्य फार प्रिय आहे. नॉदर्न ब्रँच येथील श्री हनुमान मंदिर हरिनाम सप्ताह समितीचे ते सदस्य आहेत. अखिल भारतीय धोबी महासंघाचे सदस्य आहेत. 12जुले 2015पासून ते महाराष्ट्र धोबी परीट सेवामंडळ कार्यकारणीत वरिष्ठ सल्लागार म्हणून आहेत. 18मे 2016पासून ते संत गाडगे महाराज समाजसेवासंघ महाराष्ट्र गिरगाव मुंबई संस्थेचे प्रसारक आहेत. 13मे 2018पासून ते महाराष्ट्र परीट धोबी सेवामंडळाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.15जून 2018पासून ते श्रीरामपूर नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी म्हणून कार्य करीत आहेत.24नोव्हेंबर 2018पासून ते महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समिती कार्यकारिणी मंडळ सदस्य आहेत.
श्री लक्ष्मणराव निकमसर यांनी वयाची सत्तऱी पूर्ण केली तरी मोठया धाडसाने आणि निर्मळ मनाने विविध सेवाकार्यात भाग घेतात, नवे नवे उपक्रम राबवितात.अनेक कौंटुबिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक मानसिक संकटे, अडचणी आल्या तरी हसत हसत आणि उमेदीने ते कार्य करतात. जेष्ठ आणि अनुभवी अशी वाटचाल करणारे श्री लक्ष्मणराव निकमसर हॆ अशा वयात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.जगायचे आहे हिंमतीने, जीवन किती आणि कसे आहे, यापेक्षा असलेल्या क्षणाला आनंद द्यायचा, घ्यायचा आहे. हा विचार जगायला बळ आणि प्रतिष्ठा देणारा आहे. हाच आदर्श समोर ठेवून ह्या शब्दभावना व्यक्त केल्या आहेत.जेष्ठ ते श्रेष्ठ या जाणिवेने हॆ शब्दनमन आहे.
डॉ. बाबुराव उपाध्ये,
इंदिरानगर, श्रीरामपूर जि. अहमदनगर
भ्रमणसंवाद :9270087640
===========

