shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक दिनानिमित्त .. आदर्श विद्यार्थी घडवताना-- प्रा. कैलास जाधव

नगर / विशेष प्रतिनिधी

 ' शिक्षक '  हा शब्द ऐकला तर डोळ्यासमोर उभा राहतो तो समुद्रातला एखादा दीपस्तंभ, कधी तो मार्गदर्शक ठरतो कधी ज्ञान सधनेचा परमोच्च अविष्कार ठरतो .अशा विविध प्रकारच्या भूमिकेतून आपल्या कर्तव्यदक्षतेचा व ज्ञानाचा अविरत वाहणारा झरा बनतो .

       आज दि . ५ सप्टेंबर . स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती, एक उत्तम शिक्षक, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. आपण पवित्र काम करणाऱ्या तसेच देश घडवणाऱ्या शिक्षकांसाठी एक कृतज्ञता दिवस म्हणून पार पाडत असतो. डॉक्टर राधाकृष्णन हे विसाव्या शतकातील विद्वानांमध्ये अग्रस्थानी होते त्यांचे आपल्या  देशासाठी अतुलनीय योगदान होते . ते उत्तम वक्ता,शिक्षण महर्षी होते. एका आदर्श शिक्षकातील गुण त्यांच्यात होते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतो .शिक्षकाचे  स्थान समाजात सर्वोच्च आहे कारण शिक्षकाने घडवलेल्या कितीही उच्च पदावरील व्यक्तीला शिक्षकांनीच घडवलेले असते.

असे म्हणतात की शिक्षक आणि रस्ते हे दुसऱ्यांना आपल्या मार्गापर्यंत पोहोचवतात पण स्वतः मात्र तिथेच असतात अतिशय समर्पणाचा भाव त्यांच्यामध्ये असतो म्हणून समाजातील सर्व घटकांमध्ये आपण शिक्षकांचा सदैव सन्मानच करत असतो .आपल्या आयुष्यातील     अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट करणारा प्रकाश रुपी देवदूत असतो. आपल्या आयुष्यात   सरस्वतीच्या  विणेचा नाद सतत घुमावा म्हणून, प्रयत्नशील असतात ते शिक्षक  आपल्या आचार आपले विचार व उच्चारातून आपल्याला बळ प्रदान करणारे आपले शिक्षक असतात.

रामकृष्ण परमहंस यांनी एक आदर्श विद्यार्थी स्वामी विवेकानंद यांना घडवले. चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य सारखा विद्यार्थी घडवला . साने गुरुजी, प्र .के . अत्रे, यांनी समाजामध्ये आदर्श विद्यार्थ्यांचे बीज पेरले. शिक्षणाचा अर्थ जर फक्त ,,'शालेय शिक्षण' घेतला तर कसे चालेल, म्हणून आज शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या प्रती तसेच आदर्श समाज निर्माण करण्याच्या प्रती आपल्या जबाबदारी वाढल्या आहेत. आज काळ प्रचंड झपाट्याने बदलत आहे त्यामध्ये मोठमोठ्या आव्हानांना शिक्षकांना सामोरे  जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे भाव विश्व समजून घेऊन त्यांना बदलत्या काळानुसार मार्गदर्शन करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर् उभे आहे . आज आपल्या सर्व शिक्षक बांधवांना विषयाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी एक उत्तम चांगला, चांगला व्यक्ती आधी कसा बनेल या दृष्टीने प्रयत्न करायला हवे, झपाट्याने बदलत चाललेली समाज व्यवस्था यानुसार आपले ज्ञानसाधना करून आदर्श समाज घडण्यासाठी अग्रेसर झाले पाहिजेत .नवनव्या वाटांचा शोध घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे म्हणतात विनाश आणि निर्माण करणे हे शिक्षकांच्या हातात असते त्यानुसार नवविचारांचा आणि नव्या उमेदीचा एक आदर्श समाज निर्माण करताना आपल्या संस्कृतीची नाळ तुटून देता एक चांगला विद्यार्थी आपण तयार करूया .

एक शिक्षक म्हणून आपण आपल्या मध्ये प्रयोगशीलता, नाविन्यता, चिकित्सकृती, कृतिशीलता, यांचा अवलंब करून येणाऱ्या पिढीचे जगणं सुंदर आणि समृद्ध करूया.
आपण फक्त संशोधक वृत्ती निर्माण करूया विद्यार्थ्यांना अधिकाधिक कृतिशील आत्ता त्यांच्यातील कला कौशल्य ओळखून, भावना समजून घेऊन, आपल्या कर्तव्याची मोहर उमटूया शिक्षण ही एक जिवंत प्रक्रिया आहे तिला सर्व शिक्षकांनी आपल्या प्रतिभेने आपल्या अनुभवाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूया विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाची व यशाची ज्योत अविरत तेवत ठेवूया त्यांना फक्त पुस्तकी  ज्ञान न देता  त्यांच्यातील गुण कौशल्यांना उत्तेजन देऊन त्यांचे भविष्य उज्वल बनवूया नेहमी त्यांच्यात सकारात्मकता प्रदान करूया .

 त्यांच्यात उत्तम नेतृत्व गुण तयार करूया त्यांच्यातील आत्मविश्वास व स्वाभिमान यांना खतपाणी घालून त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मसमर्पणाने कार्य करूया. कधी विद्यार्थी आणि पालक यांच्यात दुवा होऊन संवाद रूपाने विविध समस्या सोडवूया विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता ओळखून त्यांना समोर येणाऱ्या आव्हानांना धैर्याने  सामोरे जाण्याची शिकवण प्रदान करूया.

आज शिक्षणाचा अविरत वाहणारा ज्ञान प्रवाह रुंदावत चालला आहे . बदलत्या काळाचा बदलत्या शैक्षणिक बदलाचा मागोवा घेत आपल्या शिक्षकांची जबाबदारी मुख्य ठरते आहे  .मुलांकडे व्यापक दृष्टिकोनातून आपण पाहिले पाहिजे त्यांच्यातील अंगभूत  क्षमता, कला, कौशल्य , त्यांचा मानसिक कल ,या आजच्या शिक्षण पद्धतीतील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी ठरत आहेत  त्यांच्या अज्ञानरूपी सर्वांगीण क्षेत्र समृद्ध करण्यावर भर देऊया.

या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षकांच्या प्रति समाजानेही पालक वर्गानेही, व्यवस्थापकांनी, एकत्र येऊन एक विचाराने एक आदर्श विद्यार्थी  उत्तम देशाचा नागरिक बनण्यासाठी सहकार्य करावे हीच या निमित्ताने सदिच्छा ...

- - प्रा.कैलास जाधव ( एस एस सी बोर्ड नियामक )
ज्ञानसंपदा स्कूल ,अ.नगर
close