प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केज येथील सर्व धर्मियांसाठी एकतेचा संदेश देणारे सुप्रसिद्ध दर्गाह हज़रत ख़्वाजा मोहज्जि़बोद्दीन (रहे) यांच्या उर्स निमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी देशमुख साहेब यांच्या वाड्यातून संदल काढून दर्गाह शरीफवर चढवला जाणार आहे. रात्रभर शहरातुन घोड्यावरून मिरवणूक काढत पहाटे दर्गाह शरीफवर संदल चढवला जातो. गेली शेकडो वर्षांपासून केजकरांची परंपरा अजुनही कायम आहे.
दुसऱ्या दिवशी उर्स भरवला जातो. यामध्ये खास महिलांसाठी खरेदी करण्यासाठी अनेक स्टॉल्स लावले जातात. लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे आणि खाण्यासाठी हॉटेल्स ची व्यवस्था कमीटीकडून करण्यात येते. 23 ते 25 सप्टेंबर पर्यंत हारुणभाई हाजी चांदपाशा इनामदार यांच्याकडून सर्वांसाठी शाकाहारी लंगर चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, तर 24 आणि 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले कव्वाल यांच्या कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सलग पाच दिवस चालणारा हा महोत्सव सर्व धर्मियांसाठी खुला असतो.
उर्स महोत्सवासाठी इनामदार परिवाराकडून प्रत्येक वर्षी एक समिती गठीत करण्यात येते. यावर्षी गठीत करण्यात आलेल्या उर्स कमिटीचे अध्यक्ष तालेब वलियोद्दीन इनामदार यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून इम्रान शमशामोद्दीन इनामदार यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कमिटीतील विविध सदस्यांची निवड अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
हजरत ख्वाजा मोहज्जिबोद्दीन (रहे) यांच्या उर्स महोत्सवात सर्व समुदायातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन इनामदार उर्स कमिटीचे अध्यक्ष तालेब इनामदार यांनी केले आहे.


