शनिवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी समस्त क्रिकेट जगताचे लक्ष श्रीलंकेतील कँडी स्थित पल्लेकल स्टेडियम कडे असणार आहे. कारण तेथे संपूर्ण जगाला जागेवर खिळवून ठेवणारा एक बहुप्रतिक्षित क्रिकेट सामना होणार आहे आणि तो खेळला जाणार आहे एकदिवसीय सामन्यात आयसीसीच्या प्रथम मानांकनाच्या पाकिस्तान आणि तिसऱ्या क्रमाकांच्या भारत यांच्या दरम्यान आशिया चषकासाठी !
आजमितीला पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थैर्य, ढासळलेली आर्थिक परिस्थिती, अस्थिर जनजीवन या सगळ्या गदारोळात पाकिस्तान क्रिकेट संघाने मायदेशातील समस्त क्रिकेट शौकीनांना आनंदीत होण्याची संधी दिली आहे. पाक संघाने मागील सहा पैकी पाच मालिका जिंकून थेट आयसीसीचे प्रथम मानांकन मिळविले आहे. यामुळे पाकिस्तानचा क्रिकेट संघ ठासून भरलेल्या आत्मविश्वासाने आशिया चषकात उतरला आहे व त्यांच्याकडे संभावित विजेते म्हणून बघीतल्यास अतिशयोक्ती नसावी.
या उलट भारताची परिस्थिती आहे. मागील काही दिवसांपासून संघातील अनेक प्रमुख खेळाडू दुखापत ग्रस्त होते. त्यामुळे संघाची घडी पार विस्कटली होती. त्याचाच परिपाक म्हणजे आयसीसीच्या मानांकनात भारताची प्रथम क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीकडे संशयाने बघितले जात आहे. त्याला जबाबदार असलेल्या कारणांपैकी एक म्हणजे आजमितीचा एक कमजोर संघ म्हणून गणल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला वनडे मालिकेत ३-२ ने लोळविले आहे.
पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील वातावरण सर्वच बाबतीत अलबेल असूनही खेळाडूंचे प्रदर्शन लाजीरवाणे होत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटपटूंपेक्षा भारतीय खेळाडूंना गलेलठ्ठ मानधान, अलिशान सुविधा पुरविल्या जात आहे. असे असूनही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत एकजिनसीपणा दिसत नाही. त्यामुळे कागदोपत्री दिसायला मजबूत भासणारा भारतीय संघ कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धेत मागील दहा वर्षांपासून विश्वविजेतेपदा पासून दूरच राहात आहे
पाकिस्तानच्या संघ बांधणीवर नजर टाकली तर सरळ जाणवते की, त्यांची बॅटींग लाईन स्थिरस्थावर आहे. मधली फळीही आता विश्वास पात्र कामगिरी करत असल्याने पाकसाठी ती नक्कीच आनंदाची बाब आहे. शिवाय फिरकी माराही समतोल दिसतो तर वेगवान गोलंदाजीही धारदार आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला रोखणं भारतासाठी सोपं नसेल. पाकने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नवख्या नेपाळचा शब्दशः धुव्वा उडविला असल्याने त्यांचा संघ जोमात असणार ! विशेष म्हणजे पाकने या सामन्याच्या पूर्व संध्येलाच आपला अकरा जणांचा अंतिम संघ जाहिर केल्यामुळे त्यांचे इरादे व आत्मविश्वास किती बुलंद आहेत हे दिसून येते.
पाकिस्तान संघाने आपल्या नियोजनात एक अमूलाग्र बदल केला आहे तो विराट कोहलीबाबत. आपणास ठाऊकच आहे की, कोहलीचा पाकिस्तान विरूद्धचा रेकॉर्ड चांगला आहे व प्रत्येक वेळी तो पाकला रोखण्याचा एकहाती प्रयत्न करतो. शिवाय कोहलीचा चिडका स्वभाव जगजाहीर आहे. त्याला जर कोणी डिवचलं तर तो पेटून उठतो व प्रतिपक्षावर तुटून पडतो. त्यावर पाकिस्तानने तोडगा काढल्याचे दिसते. पाकचा कर्णधार बाबर आझमने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीचे तोंडभरून कौतुक केले व त्याला सामन्यादरम्यान न डिवचण्याचे जणू सुतोवाचच केले आहे. बाबरचीच "रि" उपकर्णधार शादाब खानने ओढल्याने पाकिस्तानी खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात कोहलीची हरबऱ्याच्या झाडावर चढवून शिकार करण्याची योजना घेऊन उतरणार आहेत हे नक्की !
भारतीय कर्णधार रोहितच्या मते भारत -पाक सामन्यासाठी नाणेफेकीला विशेष महत्व नसेल परंतु मागील काही दिवसांपासून भारताची गंभीर डोकेदुखी ठरणारी संघ निवड याही वेळी भारताच्या आणि यशाच्या मार्गात अडसर ठरू शकतो.
जसप्रित बुमराहा, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर हे दुखापतीनंतर प्रथमच मोठया स्पर्धेत उतरत असले तरी संघ प्रबंधनाने केएल राहुलला सतरा जणांच्या संघात निवडूनही श्रीलंकेला न नेल्याने त्याच्या फिटनेसचा प्रश्न अजूनही सुटला नसल्याचे सांगून जाते.
राहुल ऐवजी यष्टीरक्षण करताना ईशान किशन दिसणार असून, सुर्यकुमार यादव अंतिम अकरा जणात नसणार हे दिसत आहे. आता प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी तेथील पावसाळी हवामान, वातावरण, खेळपट्टी यांचा योग्य अभ्यास करून परिस्थितीनुसार संघ निवडला तर भारताला संधी असेल. नाही तर आपल्या सोयीचे खेळाडू खेळविण्याचे नेहमीचे राजकारण झाल्यास भारताला प्रथम ग्रासे मक्षिपःत होऊ शकतो.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

