प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील महनीय व्यक्तीमत्व तथा कासारी व पंचक्रोषित शिक्षणाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिवंगत स्व.लक्ष्मणराव (अण्णा) डोईफोडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने रविवार दि.03 सप्टेंबर रोजी कासारी येथे उपजिल्हा रूग्णालय आय.सी.टी. विभाग आणि ग्रामिण विकास मंडळ बनसारोळा यांच्या संयुक्त विद्ममाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच ह.भ.प.केशव महाराज शास्त्री टाकळी यांचे किर्तन होईल. अशी माहिती कासारीचे सरपंच तथा स्व.लक्ष्मणराव डोईफोडे यांचे चिरंजीव अमोल ( दादा) डोईफोडे यांनी दिली आहे.
स्व.लक्ष्मणराव डोईफोडे यांनी कासारी या छोट्याशा गावातून सुरू केलेला प्रवास हा केज तालुक्यातील प्रत्येक माणसाला माहित आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिक्षण घेवून स्वतःचा ठसा उमटविला. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किती त्रास सहन करावा लागतो. याची जाणिव राहिल्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात रमण्याचा निर्णय घेतला. केज शहरात खा.रजनीताई पाटील व माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्रात काम सुरू केले. केज येथे पाटील यांच्या संस्थेेत मुख्याध्यापक म्हणून काम सुरू केले. त्याच बरोबर कासारी गावातील व आजु-बाजूच्या गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण हे शाळा नसल्याने राहू नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे कासारी गावात शाळा सुरू केली. 10 वी पर्यंतचे शिक्षण आज कासारी गावात स्व.लक्ष्मण अण्णा डोईफोडे यांच्यामुळे मिळत आहे. अण्णांनी सातत्याने समाजातील वेगवेगळ्या घटकांना केंद्रबिंदु माणून आपले काम सुरू ठेवले. त्यांच्यामुळे गोर-गरीबांच्या मुलांना सहजपणे शिक्षणाची संधी आपल्या दारात मिळाली.
अण्णांचे 2020 साली दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आजही कासारी गाव आणि केज तालुका हा शोकाकूल आहे. कारण त्या गावातील शिक्षण क्षेत्रातील अनमोल हिरा गमावल्याचे दुःख गावकर्यांना आहे. अण्णांची तृतीय पुण्यतिथी ही रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी होत आहे. त्या अनुषंगाने आण्णांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीला ज्ञात व्हावी आणि त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांचे चिरंजीव व कासारी गावचे सरपंच अमोल ( दादा) डोईफोडे हे करीत आहेत. त्या अनुषंगाने आण्णांच्या तिसऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शनिवार , दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत उपजिल्हा रुग्णालय आय.सी.टी.सी. विभाग आणि ग्रामिण विकास मंडळ बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने कासारी येथे हनुमान मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर होईल. तसेच सकाळी 11 ते 1 या वेळेत ह.भ.प.केशव महाराज शास्त्री टाकळीकर यांचे किर्तन होणार आहे. हा कार्यक्रम क्रांतीवीर आत्माराम बापु पाटील माध्यमिक विद्यालय कासारी ता.केज जि.बीड येथे होईल. तरी किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कासारीचे सरपंच अमोल ( दादा ) डोईफोडे यांनी केले आहे.


