हृदय पिळवटून टाकणारी घटना नुकतीच बोरीवली येथे घडली. आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेणारी ७८वर्षीय जोडीदार शेजारी मरून पडलेली असताना कायमचे अंथरुणाला खिळलेल्या ८० वर्षीय तिच्या पतीला त्याचा थांगपत्ताही नव्हता.
बोरीवलीमधील राजेंद्रनगर येथील भूमीगार्डन इमारतीत हा प्रकार नुकताच घडला.
८० वर्षांचे भास्कर शेट्टी हे कायमचे अंथरुणात खिळून आहेत.त्यांची ७८ वर्षीय पत्नी सुलोचना त्यांची आपुलकीने देखभाल करत होत्या.काय हवं नको ,औषधे वेळेवर देत होत्या. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांना झोपेतच घेऊन गेला. आपली पत्नी आपल्याला सोडून गेली आहे हे अचेतन असलेल्या भास्कर शेट्टी यांच्या खिजगणतीतही नव्हते. त्यांना भूक लागली असेल पण सांगण्याची त्यांच्यात क्षमता नव्हती.शरीराची कुठलीही हालचाल करता येत नाही, पत्नी हाताने उठवून योग्यवेळी त्यांना जेवण भरवत होती. त्यांची शुश्रूषा करत होती.आजूबाजुला काय चालले आहे याची संवेदना भास्कर शेट्टी यांना बिलकुल नसते. अशातच त्यांची पत्नी सुलोचना ही दोन तीन दिवसांपासून शेजारीच मरून पडली आहे.पण त्यांना त्याची भनक देखील नाही.असली तरी ते हतबल आहेत,ना बोलता येत ना हलता येत,भूक लागलेली सांगू शकत नाही, शी-सू अंथरुणातच होते. अशा परिस्थितीत मुले जवळ असणे कोणालाही साहजिकच वाटेल पण त्यांची एकुलती एक मुलगी रेश्मा ही अमेरिकेत आहे.त्यांची काळजी घेण्यासाठी नैतिक कर्तव्य म्हणून तिने केअरटेकर ठेवला होता,पण तो नीट देखभाल करत नाही म्हणून त्याला काढून टाकले होते, त्याची जागा दुसऱ्या केअरटेकरने अद्याप घेतली नव्हती,म्हणून त्यांची पत्नी सुलोचना याच त्यांची देखभाल करत होत्या.
सुलोचनाबाई या मरून पडल्या पण सोसायटीत कोणाला त्याची खबर नव्हती.पावसामुळे त्या खाली येत नसाव्यात असा ग्रह सगळ्यांनी केला,वीस वर्षांपासून स्नेह असलेल्या रेश्मा नांदीवडेकर यांनी त्यांना कॉल केला पण काहीच प्रत्युत्तर न मिळाल्याने त्या त्यांच्या खोलीकडे गेल्या ,बाहेर येत असलेल्या दुर्गंधीमुळे त्या घाबरल्या पोलिसांना बोलावण्यात आले तेंव्हा, सुलोचनाबाई हतबल असलेल्या पतीच्या बाजूला निपचित पडल्या होत्या हे दिसले,दुर्गंधी सुटली म्हणजेच त्या किमान दोन तीन दिवसांपासून मरून पडल्या असतील हे निश्चित.
प्रश्न असा आहे की, भास्कर शेट्टी आणि सुलोचना शेट्टी यांनी आपली हयात मुलीला शिकवण्यासाठी घातली असेल,तिचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी पोटाला चिमटे काढले असतील,उपाशी राहून आपल्या भावना जाळल्या असतील.आपल्या सुखदुःखापेक्षा मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष दिले असेल. ते यासाठीच ना की मुलगी शिकली की ,आपल्या म्हातारपणाची काठी होईल.म्हातारपणी आपल्याला सांभाळेल.पण झाले उलटेच ,मुलगी अमेरिकेत स्थित असलेल्या मुलाशी लग्न करून अमेरिकनवाशी झाली.ती तिकडे सुखात आहे,पण तिच्या आईबापांचे काय? कोणाच्या भरवशावर ती त्यांना सोडून गेली.
आपली मुलगी अमेरिकेत आहे याचा अभिमान नक्कीच शेट्टी कुटुंबाला असेल.पण अशा या वयात त्या अभिमानाचे करायचे काय? उतार वयात आपली माणसे आपल्या सोबत असावीत असे कोणाला वाटणार नाही?
आईवडिलांनी संपूर्ण आयुष्य ज्या मुलांसाठी घालवलेले असते त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात आपल्या जवळ असावे असे त्यांना साहजिकच वाटत असते.
समाजमाध्यमांवर सतत फिरत असलेली अशीच एक घटना नगरच्या वृद्धाश्रमात राहत असणाऱ्या तज्ञ डॉ.मुधोमगावर यांच्यावरही घडली नाही काय? स्वतः प्रथितयश डॉक्टर असताना त्यांनी मुलगी आणि मुलाला डॉक्टर बनवले, दोघांचे लग्न करून दिले दोघांनाही जोडीदार डॉक्टरच भेटले. आणि विशेष म्हणजे चौघेही अमेरिकेत स्थायिक झाले.इकडे डॉ.मुधोमगावकर यांची पत्नी अगोदरच त्यांना सोडून गेलेली.मुलांनी त्यांची सोय एक वृद्धाश्रमात केलेली.तिथे ते आजारी पडले मुलांना निरोप गेला,मुलांना कामाच्या व्यस्थतेमुळे येता आले नाही,आश्रमात काही पैसे पाठवून दिले आणि त्यांची सेवा त्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोपवली.काही दिवसांनी डॉक्टर मरण पावले,तेंव्हाही कामाच्या व्यस्थतेमुळे त्यांना येता आले नाही.वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, त्यांचे सर्व विधी त्यांनीच केले.मुले मात्र आले नाहीत.यापुढेही येणार नाहीत.
मुंबईत एक पॉश वस्तीत अशीच एक घटना घडली होती.आलीशान घरात राहणाऱ्या एक वृद्धाचा मृत्यू घरात झाला,जेंव्हा त्याची दुर्गंधी सुटली तेंव्हा शेजाऱ्यांना माहीत झाले.पोलिसांना बोलवले गेले,वृद्धांच्या नातेवाईकांचा शेजाऱ्यांना सुद्धा पत्ता नव्हता.त्यांची मुले अमेरिकेत राहत होती,पण त्यांच्याबरोबर वृद्धांचे पटत नव्हते म्हणून त्यांनी संबंध तोडून टाकले होते. कसातरी मुलीचा पत्ता शोधण्यात यश आले.तिने सरळ सांगितले तुम्ही त्यांची विल्हेवाट कशी लावायची ते लावा,आम्हाला येता येणार नाही, त्यांच्या संपत्तीचे काय करायचे विचारले असता,तीने सांगितले,तुम्हाला काय विल्हेवाट लावायची लावा,अनाथश्रमाला द्या किंवा कोणाला द्या,आमच्याकडे खूप आहे आम्हाला त्यांच्या संपत्तीतील काहीच नको.
अशीच एक घटना गुजरातमध्ये घडलेली,तिथेही हाच प्रकार त्यांची मुलेही बाहेर देशात,ते आजारी असताना कामाच्या व्यस्थतेमुळे मुले आली नाहीत, ते मरण पावले तेंव्हाही कामाच्या व्यस्थतेमुळे आले नाहीत,त्यांच्या संपत्तीतील त्यांना काहीच नको होते.पण त्यांनी एक विनंती गावकऱ्यांना केली की,जमत असेल तर त्यांच्यावर अंतिम संस्कार करताना व्हिडिओ कॉल करून आम्हाला दाखवा.तिकडूनच त्यांनी वडिलांचे अंतिम दर्शन घेतले.विषय संपवला.
या वरील घटना वानगीदाखल म्हणता येतील.अशा कितीतरी घटना घडत असतील.
आईबाप मुलांना शिकवतात.स्वतःची हौसमौज बाजूला ठेवतात.काटकसर करून संसार चालवतात.मुलांना सतत स्पर्धेत ठेवतात मुलेही पडत्या फळाची आज्ञा मानून आईवडिलांची ईच्छा पूर्ण करतात,चांगले शिक्षण घेतात. नोकरीसाठी सक्षम झाल्यावर भारतात नोकरी करण्याऐवजी परदेशात मोठ्या पगाराची नोकरी शोधतात .नोकरी मिळाल्यानंतर स्थिर होईपर्यंत आईबापापासून वेगळे होतात.स्थिर झाल्यावर आईबापाला बोलावून घेऊ अशी आशा दाखवतात. पण तिकडचे व्यस्थ जीवन, महागाई त्यांना परवडत नाही.त्यामुळे त्यांना आईवडिलांना सोबत ठेवण्याचा विचार बदलावा लागतो,त्यातच तेथील एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतात,आणि तिकडेच स्थिर होऊन जातात.असे मोठया प्रमाणात होते,काही अपवादही असतात.आईवडिलांना सोबत घेऊन जातात तिकडेच स्थायिक होऊन भारताचा संबंधच तोडून टाकतात. आम्ही भारतीय हे फक्त सांगण्यापूरते असते.निष्ठा मात्र परदेशाशी जोडल्या जातात.अमेरिकेत सध्या २२ लाख हिंदू आहेत, तर त्यांनी एक हजार मंदिरे बांधले आहेत,इस्कॉन मंदीरेच तिथे ३० आहेत.
आईवडील भाऊ बहीण यांच्याबद्दल आदर असणारे काही कर्तव्यदक्ष मुले त्यांना मासिक खर्च पाठवून आपले कर्तव्य निभावतात,काही तर तिकडे खर्च वाढलेला आहे असे सांगून पैसे पाठवण्याचे टाळतात. तिकडचे नागरिकत्व घेतलेल्या मुलांना भारताबद्दल काही पडलेले नसते. इकडे आईवडील आजारी पडले तर त्यांची सेवा मुलांनी करण्याऐवजी नातेवाईक किंवा शेजारचे करतात.बऱ्याचशा आई वडील निधन पावल्यावर मुले येत नाहीत आणि बऱ्याचदा येतातही.आणि संपत्तीची विल्हेवाट लावून निघून जातात.
परदेशातली जीवनशैली,जास्त पगार याचा मोह मुलांना होतो, त्यामुळे ते देशहित विसरून परदेशाच्या मोहात पडतात.
आपल्या देशानेही त्यांची काळजी केली पाहिजे.त्यांच्यां शिक्षणानुसार त्यांना नोकऱ्या दिल्या तर ते परदेशात कशाला जातील?
हिंदू धर्मात प्रत्येक पुरुषाला तीन ऋणातून मुक्त व्हावे लागते देवऋण,ऋषीऋण,पितृऋण.
पितृऋणमधून मुक्त होण्यासाठी मुलाने मातापित्यांना अग्नी द्यावा ,श्राद्ध करावे हे ऋण उतरणे महत्वाचे असते,कारण ज्या माता पित्याने जन्म दिलेला असतो,आपले आयुष्य आरोग्य,सुख समृद्धीसाठी कष्ट घेतलेले असतात त्यांच्या ऋणातून मुक्त झालो नाही तर जन्म निरर्थक आहे.असे हिंदू धर्म शास्त्रात म्हटले आहे.यासाठी मुलगा पाहिजे असतो.आपला मुलगा चांगला शिकून घराण्याचे नाव उज्वल करणारा असावा,असे कोणत्या आईवडिलांना वाटणार नाही.
शेवटच्या क्षणाला मुलांनी जवळ असावे असे आईवडिलांना वाटत असते.पण त्यांचाच अट्टहास असतो मुलाने परदेशात जावे.त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केलेले असतात. पण परदेशात गेलेली मुले हिंदू धर्मातील तीनही ऋणाना तिलांजली देतात की काय असा संशय निर्माण होतो.
ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटला दिस गोड व्हावा. पण मुले आईवडील सोडून बाहेर असतील तर कसा होईल शेवटचा दिवस गोड ? दोन तीन मुले असतील तर त्यातील एखादा परदेशात गेला तरी हरकत नाही,इतर पितृऋण फेडण्यास जवळ असतीलच ,पण दोघे तिघे गेले तर आईवडिलांची काळजी घेणार कोण?
ही बाब आपल्याला उच्चवर्णीय आणि मध्यम वर्गीयांमध्ये दिसते.तर त्याच्या उलट गरीब कुटुंबातील मुले ,अशिक्षित मुले,कमी शिकलेली मुले, सकाळी काम मिळाले तर रात्री जेवण मिळत असलेली मुले मात्र वृद्ध आईवडिलांना सोडायला तयार नसतात.त्यांची शुश्रूषा करतात.कर्ज काढून त्यांची दुखणी बरी करतात.
ज्या घरातील सून चांगली असेल त्या घरातील वृद्धांना घाबरण्याचे कारण नाही. कारण ती सून वृद्ध सासू सासऱ्यांची आई वडिलांसारखी काळजी घेत असते.सासू सासरे मृत पावल्यावर ओकसाबोक्सी रडताना नेहमी पाहत असतो.ज्या घरातील सुनेला वाटते की,आपल्या वृद्ध आईबापांनी आनंदाने राहावे तिने आपल्या सासुसासऱ्यांची काळजी आईवडील समजून घ्यायला पाहिजे.बहुतेक ठिकाणी सुनेच्या स्वार्थीपणामुळेच मुलगा आईवडिलांशी जन निंदेला न घाबरता क्रूरपणे वागतो. ज्या आईवडिलांनी त्याला इतकी वर्षे संभाळलेले असते त्याला एक वर्षात त्याची पत्नी आईवडीलांपासून वेगळे करते.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल ते सरळ आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून आपले कर्तव्य निभावत असतात.अशी मुले पितृऋणातून मुक्त होत असतील का?
जी मुले बायकोचे न ऐकता आई बापाची काळजी घेतात आणि ज्या सुना सासू सासऱ्यांची काळजी आईवडिलांसारखीच घेतात. ते आम्हाला आदरणीयच आहेत.
ज्या मुली माहेरी गेल्यावर वहिनीला तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायला सांगतात त्याच मुली इकडे सासरी आल्यावर सासू सासऱ्याला पाण्यात पाहताना दिसतात.याला काही अपवाद असतील.त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
आजच कोल्हापूरमधील माणगाव येथील ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे,की जी मुले वृद्ध आईवडिलांना संभाळणार नाहीत त्यांना ग्रामपंचायत वारसाहक्क पत्र देणार नाहीत.अतिशय स्तुत्य उपक्रम असून असा निर्णय सर्वच ग्रामपंचायतीने करावा,तसेच सरकारने सुद्धा याबाबत विचार करायला काय हरकत आहे ?
- - - लेखिका : अनुरिता झगडे , अ . नगर

