shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंतिम सामन्यापूर्वी टिम इंडियाने स्वतःचे तसे करून घेतले ?



          टिम इंडियाने आशिया चषक स्पर्धेच्या साखळी व सुपर फोर मध्ये प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखत अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु अंतिम फेरी निश्चित झाल्यानंतर उर्वरीत एका औपचारीक सुपर फोर सामन्यात तुलनेने दुबळ्या बांगलादेश संघाने टिम इंडियाला एक अकल्पित धक्का दिला. अंतिम सामन्यापूर्वी हा पराभव भारताच्या इभ्रतीला ठेच पोहणविरा असला तरी या सामन्याकडे टिम इंडियाने केवळ प्रयोग म्हणून बघितले होते. 

           सुपर फोरच्या तीन पैकी पहिले दोन सामने सरस धावगतीसह जिंकून भारताने अंतिम फेरी आधीच निश्चित केली. त्यामुळे शेवटच्या सुपर फोर सामन्यात भारताने आगामी अंतिम सामना व येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषकाच्या या पूर्वीच्या सामन्यात ज्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नव्हती अशा खेळाडूंना हात अजमावण्याची संधी बांगलादेशविरूध्द दिली. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रित बुमराहा, मोहम्मद सिराज व कुलदिप यादव यांना आराम देत सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली. यापैकी तिलक वर्मा एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत होता.
             भारताने नाणेफेक जिंकून धावसंख्येचा पाठलाग करताना होणाऱ्या त्रासाचा सराव व्हावा या उद्देशाने प्रथम बांगलादेशला फलंदाजीस निमंत्रित केले. भारताचे आघाडीचे जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी व शार्दूल ठाकूर यांनी बांगलादेशला सुरूवातीलाच तीन धक्के देऊन बॅकफूटला ढकलले. यातील दोन बळी शार्दूलच्या गोलंदाजीवर मिळाले. तर पहिल्या पावर प्लेमध्ये शार्दूलच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा व केएल राहुलने बांगलादेशी फलंदाजांचे हातातले झेल सोडले. त्याचा फायदा कर्णधार साकिब उल हसन व तौहीत हृदोय यांनी उठविला व संघाला समाधानकारक म्हणजे २६५ एवढी धावसंख्या उभी करून दिली.
             या दरम्यान बांगलादेशच्या येईल त्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढविला. यामध्ये सर्वाधिक तीन बळी घेणाऱ्या शार्दूलला मोठा मार बसला. याच शार्दूलच्या गोलंदाजीवर झेल सोडले नसते तर शार्दूलच्या गोलंदाजीचे पृथ:करण वेगळेच दिसले असते व बांगलादेशची धावसंख्या मर्यादेत राहिली असती. भारताचे फिरकीपटू रविंद्र जडेजा व अक्षर पटेल साफ निष्प्रभ दिसले. तुलनेने बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनी अतिशय टिच्चून मारा करताना भल्याभल्या भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले व धावा करण्यास लगाम घातला. त्याचाच परिणाम ईशान किशन, सुर्यकुमार यादव, के एल राहुल, तिलक वर्मा सफसेल अपयशी ठरले. कर्णधार रोहित तर सुरूवातीलाच शुन्याचा धनी बनला. मात्र या धावांच्या दुष्काळात एक बाजू लावून धरणाऱ्या सलामीवीर शुभमन गिलने १२१ धावांची शानदार खेळी केली पण तोही लक्षाचा पाठलाग करून देऊ शकला नाही. त्याच्या नंतर अक्षर पटेल (४२ धावा) यानेही जोरदार प्रयत्न केला मात्र तोही संघाची नैय्या पैलतिरी नेऊ शकला नाही. तथाकथीत अष्टपैलू शार्दूल ठाकूर फलंदाजीचा चांगला ठराव करून घेण्यास कमी पडला. शेवटी मोहम्मद शमीचे प्रयत्न तोकडे पडले व एक चेंडू आणि सहा गड्यांनी भारताला पराभव पत्करावा लागला.
             या पराभवाने भारताच्या विजय अभियानाला जोरदार हादरा बसला असला तरी टिकाकार व सिमेपलिकडचे हितचितंक समजतात एवढा मोठा हा सेटबॅक नाहीये. भारताने आपले प्रमुख खेळाडू अंतिम सामन्यासाठी ताजेतवाने व्हावे व इतरांना मॅच प्रॅक्टिस मिळावी या उद्देशाने या सामन्यात प्रयोग केले. यामुळे एक अनपेक्षित पराभव वाट्याला आला. यामुळे खास करून टिम इंडियाच्या समर्थकांना घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. उलट या झालेल्या पराभवाने टिम इंडियाला आपल्यातील त्रृटी दुरूस्त करण्यास वाव मिळेल व पुढील सामन्यांमध्ये त्या चुका टाळण्यास लाभच होईल. म्हणतात ना, जे काही होतं ते भल्यासाठीच होतं. असं समजून टिम इंडियाला फायनलसाठी आपण मनापासून सदिच्छा चिंतू व शुभेच्छा देऊया !

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close