पोळा म्हणजे बैलांचा सण.. लहानपणी पोळा आला की चित्रकलेचे शिक्षकांनी पोळ्याचे चित्र काढायला सांगावे व मराठीच्या शिक्षकांनी पोळ्यावर निबंध ल्हीण्यास सांगावा.. पोळ्यासाठी वस्तीगृहाला तीन दिवस सुट्टी असे..
*आमच्या घरी सहा बैलांची दावन होती.. पोळ्याचे अगोदर आठ दिवस बैलांना औत फाट्या पासून सुट्टी.. आमच्याकडे गोविंदा यायचा व बैलांच्या शेपीच्या गोंड्यांना आकार द्यायचा.. शिंगे साळून द्यायचा, शिंगाला पितळी छंबी बसवण्यासाठी शिंगाला भोक पाडून छंबी ठोकून जायचा*
पेटीत पडलेले पितळी तोडे, घोगर माळा बाहेर काढून घासून चकाकले जात.. एक आठवडा अगोदर पोळ्याचा बाजार होणार...
नवीन माठवटी, कासरा, वेवन, चवर, हिंगूळ, गोंडे, चवर, कवड्यांची केसरी, पायात घालाण्यासाठी गजरे, शिंगाना देण्यासाठी ऑईलपेन्ट, रंग , पाठीवर टाकण्यासाठी झुल, बाशिंग.. एक नव्हे अनेक..
*दोन दिवस अगोदर बैलांचे खांदे तेल लावून मळले जात असे.. शिंगांना तेल लावले जात असे.. पोळ्याचे दिवशी बैलं घेऊन आम्ही गोदावरी नदीवर जात असू.. बैलाला साबण लावून धुतले जाई.. आमचे गावचे कै नाना बाळाजी दैने बैल पोहाडण्यात निष्णात व हौशी.. प्रत्येक बैलाला पोहत नदीच्या धारेत घेऊन जात व वाहत्या पाण्यात बैलांचा शिंगासोबत असे काही करत की बैल पाण्या उलटा होऊन तरंगत हवेत पाय झाडत असे*
बैलं घरी आणल्यानंतर त्यांना मदन वाढले जात असे.. बैल सजवण्यास सुरूवात होत असे.. सर्व आभूषणे घालून बैल सजवले जात.. संध्या काळी बैलं घेऊन आम्ही संपूर्ण गाव मारूती मंदीरा समोर जमत असु.. बैलांनी मारूतीला प्रदक्षिणा घालून वेशीतून मानाच्या बैला पाठी संपूर्ण गावात वाजगाजत मिरवणूक निघे.. ठिकठिकाणी बैलांना ओवाळले जाई..
*घरी आल्यावर दारात जू ठेवले जात असे आई बैलांचे व बैला सोबतच्या गाडीवानाचे पाय धुत व ओवाळून मनोभावे पुजा करे.. बैल पोळ्याला पुरणाचे जेवण बनवले जात असे.. नैवेद्य दाखवून मोठी पंगत असे.. पुरणपोळीचा बेत बनवण्यासाठी सात आठ सालदारांचे कुटुंब मदत करीत व सर्व सालदारांचे कुटुंबांसह समुह भोजनाची एक आगळी वेगळी पंगत पोळ्याला होई..*
आज पोळा हे स्वप्नवत झाले.. नदीला पाणी नाही, दावनीला बैल नाही, कामाला सालदार नाही, वस्तीवर रहाणदार नाही, प्रेमाचा झरा माणसात नाही तर बैलांप्रती काय?
*आमच्या पिढीने बैलांकरवी पन्नास पन्नास एकर नागरठी केल्या.. त्या नांगरठ्यांचे हाताला पडलेले घट्टे उतार वयात मिटलेले नाही.. बैलांची निगा कशी घ्यायची, साभाळायचे कसे.. बैल पेठवायचा कसा.. दोन बैलांचा, चार बैलांचा, सहा बैलांचा नांगर म्हणजे काय? औत पेठायचे कसे, गाडीची साकण ध्यायची कशी, सुती औत वेठणी कशी करायची.. पेरणीत बैलांचा वेग व बियाण्याचा मुठीचा वेग सांभाळायचा कसा? हे सगळं इतिहास जमा होणार.. व हळूहळू पोळा फक्त दिनदर्शिकेवर एक रूढी म्हणून मातीच्या बैलांची पुजा करून साजरा होणार!*
संजय भास्करराव काळे

