कोणत्याही खेळाचा, कुठल्याही स्पर्धेचा अंतिम सामना म्हंटलं की, त्याची उत्सुकता जरा वेगळीच असते आणि मग तो अंतिम सामना क्रिकेटचा असेल व त्यात भारत खेळत असेल तर विचारूच नका. करोडो भारतीयांच्या नजरा त्याकडेच असतात. तसेच हजारो प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन त्या रंगतदार सामन्याचा आनंद लुटतात. परंतु रविवारी श्रीलंकेच्या कोलंबो मधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात नेहमीपेक्षा वेगळेच चित्र दिसले. येथे तर अंतिम सामन्यात स्थानिक श्रीलंकेचा संघ खेळत होता. दोन्हीकडच्या प्रेक्षकांनी मैदान ओसंडून वाहत होते. मात्र प्रत्यक्ष खेळाचं म्हणाल तर एखादया सामन्याची हायलाईटस् या सामन्यात झालेल्या खेळापेक्षा जास्त वेळ चालतात. इतका कमी वेळ हा खेळ झाला.
एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघाचे डाव मिळून सहाशे चेंडूचा खेळ निर्धारीत होता, मात्र येथे केवळ एकशे एकोणतीस चेंडूचा खेळ झाला. गतविजेता श्रीलंका सामन्यात कुठे होता हे कोणालाच उमगले नाही. नाणेफेक सोडून श्रीलंकेसाठी कोणतीच बाब समाधानकारक झाली नाही. नाणेफेक
जिंकून फलंदाजी स्विकारल्यानंतर श्रीलंकेकडून मोठया धावसंख्येची आशा होती. पण भारतीय तेज गोलंदाजांच्या त्सुनामीपुढे श्रीलंकेचा डाव कधी व कसा उडाला हे कळलंच नाही. श्रीलंकेसाठी ही त्सुनामी घेऊन आला तो भारताचा तेजतर्रार सळसळत्या रक्ताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ! सामन्याच्या चौथ्याच षटकात त्याने लंकेचे चार प्रमुख बाद करून लंका हा सामना जिंकणार नाही हे निश्चित करून टाकलं. सिराजने या स्पेलमध्ये अनेक विक्रम पादाक्रांत करून सहा बळी घेताना लंकेचा डाव मात्र पन्नास धावांत गुंडाळला. भारताकडून बुमराहाने एक तर हार्दिक पांड्याने तीन बळी घेऊन लंकेच्या वाताहातीला हातभार लावला. लंकेचा डाव पन्नासीच्या आतच संपला असता मात्र विराट कोहलीने सर्वाधिक सतरा धावा करणाऱ्या कुशल मेंडिसचा चार धावांवर सोपा झेल सोडला. तर क्षेत्ररक्षणातही थोडासा गलथानपणा केल्याने जेथे एकच धाव मिळू शकते तेथे ओव्हर थ्रो करून लंकेला सहा धावांची अनुदान योजना राबवली.
विजयासाठी असलेल्या एक्कावन्न धावांचे लक्ष भारताने सदवतीस चेंडूतच पार करून आठव्यांदा आशिया करंडक भारतात आणला. भारताने नियमीत सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा ऐवजी डावखुऱ्या ईशान किशनला शुभमन गिल सोबत सलामीला धाडलं व आगामी विश्वचषकासाठी आपली आणखी एक रणनिती अजमावून बघितली.
अविस्मरणीय कामगिरीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्कार मिळाला त्या पोटी त्याला चार लाख तेरा हजारांचा धनादेश मिळाला मात्र त्याने तो स्वतःसाठी सविनय नाकारला. सदर रक्कम त्याने पावसाने बाधीत केलेल्या या स्पर्धेत जिवाच्या आकांताने संपूर्ण मैदानाचे संरक्षण करणाऱ्या ग्राऊंडसमन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भेट म्हणून दिली. सिराजच्या या दानशूरतेचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
भारताने या सामन्यासाठी संघात बांगलादेश विरूध्द खेळलेल्या सहा खेळाडूंना आराम देऊन स्थापित पाच खेळाडूंना संघात सामावून घेतलं. तर जखमी अक्षर पटेल ऐवजी खास भारतातून बोलावलेल्या वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली. मात्र सुंदरला बॅटींग व बॉलिंग करायला संधीच मिळाली नाही, क्षेत्ररक्षणात दोन चेंडू अडवण्यात त्याचा हातभार लागला इतकंच.
आशिया चषकापूर्वी भारतीय संघाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र या स्पर्धेत टीम इंडियाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. भारतीय वेगवान गोलंदाजीपासून ते फिरकी विभागापर्यंत सर्व गोलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. रोहित-गिल आणि विराटने आघाडीच्या फळीत मोठी खेळी केली आहे. त्याचबरोबर इशान-राहुल आणि हार्दिक यांनीही मधल्या फळीत चांगल्या धावा केल्या आहेत.
टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. आशिया चषक २०२३ पूर्वी भारतीय सलामीच्या जोडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. रोहित आणि गिलचा फॉर्मही काही खास नव्हता. मधल्या फळीत कोण खेळणार हेही माहीत नव्हते. ईशान किशन कधीही पाचव्या क्रमांकावर खेळला नाही. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या बुमराह आणि राहुल यांच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले होते, पण भारताने या स्पर्धेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. रोहितने सलग तीन अर्धशतके झळकावली. गिलने शानदार फलंदाजी करत अवघड खेळपट्टीवर शतक झळकविले. मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर लोकेश राहुल आणि इशान किशन यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. हार्दिकनेही बॅटने धावा केल्या. बुमराह, सिराज, शार्दूल आणि हार्दिकने वेगवान गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. फिरकीमध्ये कुलदीपची फिरकी प्रभावी ठरली. एक संघ म्हणून भारताने उत्कृष्ट कामगिरी दाखवत विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा जोरदार दावा मांडला आहे.
आशिया चषक विजेत्या टिम इंडियाला हार्दिक शुभेच्छा !
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

