*कर्मवीरांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावेत-- डॉ काशिनाथ सोलनकर*
इंदापूर प्रतिनिधि: रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती सभेच्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना डॉ सोलनकर यांनी कर्मवीरांचा जीवनपट अतिशय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांना ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा काढून त्या चालवत असताना किती त्रास सहन करावा लागला, आलेल्या अडचणीवर कशाप्रकारे मात केली. त्याचबरोबर त्यांना या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मीवहिनी यांनी कशी साथ दिली याचा संघर्षमय इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी सुद्धा छोट्या -मोठ्या अपयशाला अथवा संकटाला न घाबरता आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे गेले तर यश तुम्हाला नक्की मिळेल हे उदाहरणासह पटवून दिले. यावेळी विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना सर्व उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या कलागुणांचा विकास करून घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेत कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन सुद्धा दिले. विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कर्मवीर जयंती सभेमध्ये प्रथमतः रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे यांनी केले. दहावी- बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रकमेची बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचाही सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा समितीचे सदस्य विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस,तय्यब शेख व विध्यार्थी मुनाफ शेख आणि चारुशीला मखरे यांनी मनोगत व्यक्त केले.कै.धनंजय वाशिंबेकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने विद्यालयाला भिंतीवरील वीस घड्याळे भेट देण्यात आली. त्याबद्दल वेंकटेश वाशिंबेकर यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गिरीश शहा, पै मारुती मारकड, दादासाहेब सोनवणे, भीमराव वनवे, छाया जाधव,पत्रकार नितीन चीतळकर, पालक शिक्षक संघाचे सुनील जाधव, रवींद्र भोंग, व इतर सदस्य मान्यवर उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांना माजी विध्यार्थी रवी चव्हाण यांच्या वतीने गोड खाऊ देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गायकवाड व प्रिया भोंग यांनी केले तर पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी आभार मानले.