नृत्यसाधनेचा २५ वर्षांचा अविरत प्रवास: शिर्डीत ऋतुजा धनेश्वर यांच्या 'नृत्यात्मि'चा नेत्रदीपक सोहळा संपन्न
नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
नृत्यकला ही केवळ करमणूक नसून ती ईश्वरी साधनेचे एक रूप आहे, हे आपल्या २५ वर्षांच्या तपश्चर्येतून सिद्ध करणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना कु. ऋतुजा संजय धनेश्वर यांच्या नृत्य कारकीर्दीचा रौप्य महोत्सव सोहळा रविवारी शिर्डीत मोठ्या दिमाखात पार पडला. 'रंगमंच' या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ऋतुजा यांच्या २५ वर्षांच्या योगदानाबदद्ल शिर्डीतील 'ब्राम्हण एकता संस्थे'च्या वतीने त्यांना 'समाज भूषण रत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिर्डी येथील हॉटेल 'साई गोल्ड इन' येथे रविवारी (दि. ११) सायंकाळी हा दैदिप्यमान सोहळा संपन्न झाला. कु. ऋतुजा धनेश्वर यांचा नृत्य प्रवास सन २००० मध्ये अगदी प्राथमिक शाळेपासून सुरू झाला होता. यंदा २०२५ मध्ये या प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात कलेचा आणि कलाकाराचा यथोचित सन्मान करण्यात आला.
शालेय शिक्षणापासून ते 'मास्टर्स' पर्यंतचा प्रवास
ऋतुजा यांनी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले असून, यात 'मास्टर्स इन भरतनाट्यम' (Masters in Bharatanatyam) ही पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केंद्राची (CCRT) प्रतिष्ठित शिष्यवृत्तीही त्यांनी मिळवली आहे. तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी नृत्यात विशेष प्राविण्य मिळवत बक्षिसे पटकावली आहेत. सध्या त्या शिर्डीत 'नृत्यात्मि डान्स स्टुडिओ' ही स्वतःची अकादमी चालवत असून, त्याद्वारे नवीन पिढीला भरतनाट्यमचे प्रशिक्षण देत आहेत आणि गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करत आहेत.
मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव
या सोहळ्याचे नेटके नियोजन आणि संकल्पना ऋतुजा यांचे वडील श्री. संजय धनेश्वर, आई सौ. सुनीता धनेश्वर आणि बहीण पल्लवी धनेश्वर यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य श्री. मुठाळ सर व सौ. मुठाळ, खेडकर मॅडम, श्री. कुबल, श्री. चौरे आणि सौ. भनगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित गुरुजनांचाही सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक मेजवानी आणि आईचे गाणे
या कार्यक्रमात 'नृत्यात्मि डान्स स्टुडिओ'च्या विद्यार्थिनींनी आणि ऋतुजा यांची बहीण पल्लवी हिने बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ऋतुजा यांच्या आईंनी गायलेले 'आकाशी झेप घे रे पाखरा' हे गाणे, ज्याने कार्यक्रमात एक वेगळीच भावनिक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्मिती केली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. श्रुती उपासनी यांनी केले. सर्व उपस्थितांनी हा सोहळा एकत्रितरीत्या साजरा करून आपल्या मनोगतातून ऋतुजा यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

