shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संक्रांतीला पतंग उडवताना तुटला आयुष्याचा दोर, १४ वर्षीय मुलाचा धक्कादायक मृत्यू..!!

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार  ता. १४/०१/२०२६

अहिल्यानगर :   मकर संक्रांतीच्या उत्सवाचा आनंद सुरू असतानाच कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पतंग उडवताना विजेच्या हाय व्होल्टेज तारेचा स्पर्श झाल्याने १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर १९ वर्षीय तरुण या घटनेत जखमी झाला आहे. अर्णव महेश व्यवहारे असे मृत मुलाचे नाव असून, तो सण साजरा करण्यासाठी पुण्यातून मामाच्या गावी आला होता.
मूळचा पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरातील रहिवासी असलेला अर्णव महेश व्यवहारे हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी काल सायंकाळीच कोपरगाव येथील लक्ष्मीनगर भागात आपल्या मामाच्या घरी आला होता. सणाच्या दिवशी सकाळी अर्णव आपल्या मित्रांसोबत घराच्या गच्चीवर पतंग उडवण्याचा आनंद घेत होता. मात्र, या आनंदाचे रूपांतर काही क्षणातच शोकांतिकेत झाले.मिळालेल्या माहितीनुसार, अर्णव आणि त्याचा मित्र ऋषिकेश संजय वाघमारे (वय १९, रा. कोपरगाव) हे गच्चीवर पतंग उडवत होते. पतंग उडवण्यासाठी त्यांनी वायडिंग तारेचा वापर केला होता. पतंग आकाशात झेप घेत असताना, या तारेचा अचानक जवळून जाणाऱ्या विजेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श झाला. या तारेतून प्रचंड दाबाचा विद्युत प्रवाह अर्णवच्या शरीरात उतरल्याने त्याला भीषण झटका लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
    अर्णव सोबत असलेला त्याचा मित्र ऋषिकेश वाघमारे यालाही विजेचा धक्का बसला असून तो जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुट्टीच्या आनंदासाठी मामाकडे आलेल्या लाडक्या भाच्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने व्यवहारे आणि मामाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संक्रांतीला पतंग उडवताना तुटला आयुष्याचा दोर, १४ वर्षीय मुलाचा धक्कादायक मृत्यू..!!

मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना अनेकदा नायलॉन मांजा किंवा धातूच्या तारांचा वापर केला जातो, जो अत्यंत धोकादायक ठरू शकतो. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विशेषतः पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, मुलांनी पतंग उडवताना विजेच्या तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत. अनावधानाने झालेली एक चूक जीवावर बेतू शकते, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close