प्रदूषणाचा कडेलोट! अशी बातमी आज पुणे सकाळ मध्ये आलेली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पहिला क्रमांक दिल्लीचा आणि दुसरा पाकिस्तान मधील लाहोरचा .तिसऱ्या क्रमांकावर कोलकत्ता नंतर ढाका व पाचव्या क्रमांकावर मुंबई.
एकंदरीत भारताच्या पूर्व-पश्चिम असा हा प्रदूषणाचा कडेलोट हा काही कौतुकाचा विषय नव्हे. प्रदूषण काही एका दिवसात वाढलेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण रक्षणाकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे हे सर्व घडले आहे. शहरांचे केंद्रीकरण, खेड्यांच्या विकासाकडे केलेले दुर्लक्ष, वायू व जल प्रदुषण करणाऱ्या रासायनिक कंपन्यांच्या अमर्याद औद्योगिक वसाहती, त्यांना मिळणारी प्रतिष्ठा, प्रचंड वृक्षतोड, गावातील जलस्त्रोतासह नद्या, खाड्या आणि समुद्र यामध्ये प्रक्रिया न करता सोडलेले विषयुक्त प्रदूषित पाणी, चंगळवाद पोसणाऱ्या व प्रदूषण निर्मितीस कारणीभूत होणाऱ्या उत्पादनांची जाणीवपूर्वक उभी केलेली बाजारपेठ यामुळे देशातील मातीचा कण नि कण विषारी झालेला आहे, त्यामुळे निरापराध जनतेसह प्रदूषण निर्मितीला कारणीभूत ठरलेले धनदांडगे, संशोधक, अधिकारी देखील भयावह अशा रोगराईचे शिकार झालेले आहेत.
पूर्वी खेडेगावात गरीब, सामान्य माणसे राहत असत व नगरांमध्ये श्रीमंत लोक राहत असत. आता श्रीमंत मंडळी खेड्याकडे जात आहेत आणि पोटाची खळगी भरण्यासाठी गरीब लोक शहरात बकाल वस्तीमध्ये जीवन कंठत आहेत.
केलेल्या चुकीला शिक्षाही असतेच. हा कर्म सिद्धांत आहे म्हणून केवळ शिक्षा भोगत बसायचे काय ? प्रदूषणाला नियंत्रण करण्यासाठी आपण प्रत्येकाने मी काय करू शकतो हा विचार करायला हवा. आपल्या परीने प्रत्येकाने प्रदूषण नियंत्रण कसे करता येईल याचे चिंतन करून प्रयत्न केले तर पन्नास वर्षांनी आपला देश प्रदूषणमुक्त होईल. भावी निरोगी पिढीसाठी हे करायला हवे.
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, पुणे.
मोबाईल : ९८८१३७३५८५.

