विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपली. त्यामध्ये टिम इंडियाची कामगिरी चांगली झाली मात्र विजेतेपद न मिळाल्याने भारतीय क्रिकेट रसिक निराश झाले. तेंव्हा हि निराशा किमान भारतात तरी क्रिकेटला रसातळाला घेऊन जाईल असे वाटत होते. मात्र तसे काहीही न होता समस्त क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का देत टिम इंडियानेच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटने स्वतःला सावरत नवीन कात तर टाकलीच पण पूर्ण जगाला दाखवून दिले क्रिकेट भारतात लोकप्रियच नाही तर सर्व भारतीयांचा तो एक आत्माच आहे. क्रिकेट शिवाय भारतीय रसिक जीवंत राहूच शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
ऑस्ट्रेलियाविरूध्द विश्वचषकाचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट रसिक निराशाच्या गर्तेत जातील असे अनेक जागतिक क्रिकेट पंडितांनी गृहीत धरले होते. परंतु या दुर्देवी पराभवानंतर चारच दिवसांनी क्रिकेटच्या छोटया प्रारूपातील म्हणजे टि२० मालिकेसाठी हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर ठाकले आणि त्यात चार दिवसांपूर्वी काय झाले हे भारतीय क्रिकेटपटू तर विसरलेच पण भारतीय प्रेक्षक वर्गही जणू काही झालेच नाही आशा अविर्भात मैदानात उतरला. प्रत्यक्षात दोन्ही संघ आपआपल्या देशांच्या जर्सी घालून मैदानात उतरले असले तरी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेले मोजकेच खेळाडू या संघामध्ये समाविष्ठ होते. बाकी सर्व नवोदित आगामी टि२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने निवडले गेले आहेत.
प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिलेल्या दोन्ही सामन्यात टिम इंडियांच्या नवोदित शिलेदारांनी आपल्या दर्जेदार खेळाने सर्वांनाच प्रभावित करताना ऑस्ट्रेलियाला खेळाच्या सर्वच क्षेत्रात चारीमुंड्या चित करताना भारताला २-० अशी आघाडी मिळवून देत मालिका जिंकण्याच्या दृष्टीने भक्कम सुरुवात केली असे म्हंटल्यास गैर ठरू नये. मालिकेतील तीन सामने अद्यापही बाकी असल्याने किमान एक विजय भारताला मालिका जिंकून देण्यास पुरेसा ठरेल. परंतु टिम इंडियाचा धडाका बघात क्लिन स्वीप झाल्यास कोणीही आश्चर्य मानू नये.
दुसरीकडे जगातली सर्वात मोठी व लोकप्रिय टि२० लिग म्हणून गणली जाणारी इंडियन प्रिमियर लिग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या आवृत्तीच्या तयारीचा भाग असलेली खेळाडूंची देवाण घेवाण व खेळाडू राखून ठेवण्याची प्रक्रिया संपली. आता १९ डिसेंबर रोजी दुबई येथे खेळाडूंचा मुख्य लिलाव होणार आहे. आयपीमधील सहभागी सर्वच्या सर्व दहाही संघांनी आपली निर्धारीत पूर्तता पुर्ण केली. या प्रक्रियेत बरेचसे खेळाडू मुळ संघात राखून ठेवण्यात आले. तर अनेक खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात हस्तांतरीत करण्यात आले. या घडामोडीत सर्वात जास्त लक्ष वेधले ते हार्दिक पांड्याने. त्याला विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात बांगलादेश विरूध्द जखमी झाल्यानंतर संघाबाहेर जावे लागले होते. हाच हार्दिक पांड्या मुळचा गुजरातचा खेळाडू असला तरी त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा श्रीगणेशा मुंबईकडून झाला होता. अल्लड वयातील हार्दिकची मुंबई इंडियन्सने चांगल्या प्रकारे जडण घडण केली. त्याच्यातील अष्टपैलूत्वाला तेथेच योग्य आकार मिळाला. त्याचा लाभ मुंबई इंडियन्सला झालाच परंतु टिम इंडियालाही त्याच्या रुपात एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळाला.
मात्र या दरम्यान सन २०२१ च्या सत्रात
गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायटंस या दोन संघांची नव्याने निर्मिती करण्यात आली. नेमके त्याच कालावधीत हार्दिकचा फॉर्मही लोपला होता. तर फिटनेसचे भले थोरले आव्हान उभे ठाकले होते. त्याच कालावधीत युएईत टि२० विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेच्या साखळी सामन्यातच भारताचे आव्हान संपले. त्यामध्ये हार्दिकची कामगिरी अतिशय निराशजनक ठरल्याने त्याची संघातून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्याने ऑपरेशन व इतर उपचार करून घेतले. हार्दिकच्या एवढया पडझडीत मुंबई इंडियन्सने संघातून त्याला वगळले. त्यावेळी नव्या गुजरात टायटन्स संघाने त्याला नुसतेच संघात घेतले नाही तर चक्क कर्णधारपदाची माळही घातली. त्यानंतर त्याचे नशिब उजळले असेच म्हणावे लागेल. कारण पदार्पणाच्या वर्षातच गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकविले. अर्थात त्याचे श्रेय हार्दिकला मिळालेच. त्यानंतरच्या वर्षीही त्याचा संघ अंतिम फेरीत धडकला मात्र एमएस धोनीच्या नेतृत्वगुणांपुढे हार्दिकचे कलागुण थिटे पडले. सन २०२२ च्या टि२० विश्वचषक स्पर्धेनंतर त्याची लॉटरीच लागली. ती चक्क भारताच्या टि२० संघाचा कर्णधारपद मिळून.
आपल्या गृह राज्यातल्या संघाचा यशस्वी कर्णधार ठरल्यानंतरही त्याचे मन तेथे रमले नाही व पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स मध्ये जाण्याचे त्याला वेध लागले. पडद्याआडून बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर शेवटच्या क्षणी गुजरातने त्याला ट्रेडिंग विंडोच्या माध्यमातून मुंबईला बहाल केले. त्यासाठी मुळ १५ कोटी किंमत असलेल्या हार्दिकला संघात सामावून घेण्यासाठी १७.५ कोटीच्या कॅमरून ग्रिनला मुंबई संघातून बाहेर जावे लागले. आरसीबी मध्ये ग्रीनची रवानगी झाली. पर्समनीचं गणित जुळवण्यासाठी वरील घडामोडी घडल्याचे बोलले जाते.
विश्वचषक स्पर्धेत निराशजनक कामगिरीनंतर भारताचा शेजारी देश पाकिस्तान क्रिकेटमध्येही बरीच उलथापालथ झाली. कर्णधार बाबर आझम पदावरून पायउतार झाला. टि२० साठी शाहिन आफ्रिदी तर कसोटीसाठी संघात नसलेल्या शॉन मसूदला थेट कर्णधारपदाचा राज्याभिषेक करण्यात आला. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डब्ल्यूटीसी अंतर्गत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी रावळपिंडी येथे त्यांचे तयारी शिबीरही संपन्न झाले. उमर गुल वेगवान तर सईद अजमल यांना फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक बनविले गेले. मोहम्मद हाफीज हा क्रिकेट प्रशिक्षणाचा कुठलाही कोर्स न केलेला प्रशिक्षक नेमूण पाकिस्तानने अजबच चाल खेळली. हाच हाफिज रावळपिंडीच्या सराव शिबीरात सईद अजमलच्या कामात ढवळाढवळ करत असल्याच्या सुरस कथा बाहेर येत असल्याने संघातील वातावरण अलबेल नसल्याची खबर मिळत आहेत. शॉन मसूद कसोटी कर्णधार नियुक्त केला असला तरी सराव सत्रात बरेचसे खेळाडू माजी कर्णधार बाबर आझमच्याच आसपास घोंगावताना दिसत असून शॉन मसूद एकटा पडल्याचे चित्र दिसत होते. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात कधीही विजय न मिळालेल्या पाकिस्तानचे यंदा ३-० विजय मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. सध्या तरी ते स्वप्न स्वप्नच राहाण्याची शक्यता दिसते.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.

