shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिम इंडियाच्या यंग ब्रिगेडची अनुभवी कांगारुंवर आघाडी


             मागच्या रविवारी म्हणजे १९ नोव्हेंबरला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला चितपट करून विश्वजेतेपदाचा षटकार मारला. त्यानंतर बरोबर आठच दिवसांनी म्हणजे २६ नोव्हेंबर रोजी केरळमधील तिरुअनंतपूरम येथे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला षटकार - चौकारांच्या आतिषबाजीत व गोलंदाजाच्या झंझावातात चिनभिन करून विश्वचषकातील अनपेक्षित पराभवाने घायाळ झालेल्या भारतीय क्रिकेट रसिकांच्या जमखांवर किमान मलमपट्टी लावण्याचं काम तरी केलं. पाच टि२० सामन्यांच्या मालिकेतील हा सलग दुसरा विजय मिळवून भारताने आघाडी तर घेतलीच परंतु दुःखसागरात डुबलेल्या भारतीय क्रिकेट शौकिनांना आशेचा किरण दाखवून उद्याची पहाट आपलीच असणार हे छातीठोक पणे सिद्ध केले. कारण येत्या जून मध्ये अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्यात संयुक्तरित्या होणाऱ्या वीस देशांच्या टि२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया संघात बहुतेक या संघातील खेळाडूच असणार आहेत.


                नवोदित कर्णधार सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या तरण्याबांड पोरांच्या संघाने आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या पराभवाचे जरा जास्तच मनावर घेतलेले दिसेतय. पहिला सामना विक्रमी धावसंख्या पाठलाग करून खिशात घातला तर दुसऱ्या सामन्यात स्वतःच धावांचा डोंगर उभारून त्या डोंगराखाली ऑस्ट्रेलियन्सला चिरडून टाकण्याचं कामही मोठया शिताफीने करून चौव्वेचाळीस धावांचा मोठा विजय मिळविला. वास्तविक हा विजय आणखी मोठा दिसला असता परंतु अंतिम टप्प्यात कर्णधार मॅथ्यू वेडने केवळ वैयक्तिक प्रतिमा जपण्यासाठी नावाप्रमाणेच वेडाच्या भरात वाकड्या तिकड्या बॅटने फटकेबाजी केली व थोडया फार धावा स्वतःच्या व संघाच्याही नावावर लावल्या. ते करताना दोन -तिनदा त्याच्या नको त्या अवयवावर चेंडू आदळलेही. प्रत्यक्ष मैदानात त्याने फारसे गंभीर नसल्याचे दाखविले, मात्र पारितोषिक वितरण समारंभात परंपरेनुसार दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपले मत मांडायचे असते त्यावेळी वेड काही हजर नव्हता. त्याच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक संघाची बाजू मांडण्यास उपस्थित होते. यावरून लक्षात येते कि प्रसिद्ध कृष्णाने वेडच्या जिव्हारी लागणाऱ्या वेदना किती जोरदार दिल्या आहेत.
              तिरुअनंतपुरमच्या मैदानावर खेळाच्या सुरुवातीपासूनच दव (डयू) ने ताबा घेतल्याने दुसरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला चेंडूवर पकड (ग्रीप) मिळविण्यात अडचण येणार व त्याचा लाभ त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघास होईल व कितीही मोठे विजयी लक्ष असले तरी ते सहज गाठता येईल. हे उघड सत्य होते व त्याची प्रचिती पहिल्या सामन्यात विशाखापट्टणमला आली होतीच. हि बाब ध्यानात ठेवून नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने क्षणाचाही विलंब न करता भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मात्र पुढे काय होणार हे त्याच्या ध्यानी मनीही नव्हते.
             विशाखापट्टणमला भारतीय डावाच्या सुरुवातीलाच यशस्वी जयस्वालच्या चुकीमुळे धावबाद झालेल्या ऋतूराज गायकवाडनेही दोघांमध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही याची दखल घेत संयमी खेळ करताना एक बाजू सांभाळत जयस्वालला टोलेबाजी करण्यास रान मोकळे केले. मग यशस्वीरित्या जयस्वालने शाळकरी पोरांसारखे प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजास फोडून काढत केवळ २५ चेंडूत ५३ धावा ठोकल्या, त्यानंतर आलेल्या ईशान किशनने मागच्या सामन्यातील खेळीची झेरॉक्स कॉपी साकारताना पुन्हा एकदा झंझावाती अर्धशतक साकारले. तर ऋतूराजने विराट कोहली सारखी अँकरची भूमिका योग्यरित्या निभावताना ४३ चेंडूत ५८ धावा जोडताना संघांची पडझड होणार नाही याची दखल घेतली. भारताच्या पहिल्या तिनही फलंदाजांच्या झुंजार अर्धशतकांनी धावगती मजबूत केली होतीच. परंतु त्यानंतर कर्णधार सुर्याच्या बॅटमधून ७ चेंडूत १९ धावा निघाल्या. मात्र सुर्या या वेळी जास्त वेळ तग धरू शकला नाही. मात्र त्यानंतर आलेल्या रिंकू सिंगने नेहमी प्रमाणे व्हिडीओ गेम खेळल्या प्रमाणे अवघ्या ९ चेंडू ३१ धावांची लयलूट करताना कांगारूंच्या कळपात घबराट निर्माण केली व त्याला तिलक वर्माने एक षटकारासह दोन चेंडूत सात धावा करून चांगली साथ दिली. शेवटच्या सात षटकात १११ धावांची लयलूट करणाऱ्या भारताने यावेळी ग्लेन मॅक्सवेल, एडम झांपा यांच्या उपस्थितीमुळे मजबूत झालेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे दिवाळेच काढत २३५ मजली टोलेजंग इमारत बांधली.
              या भल्या थोरल्या धावांचा पाठलाग करताना कांगारूं फलंदाजी सुरुवातीला बरी वाटली. सलामीवीर स्मिथ व शॉर्ट प्रत्येकी १९ धावांच्या शॉर्ट खेळी करून परतले. तर मागच्या सामन्यात दोनशेच्यावर सरासरीने ११० धावा करणाऱ्या जोश इंग्लिशचा जोश यावेळी चार चेंडूत दोन धावा करण्या इतपतच उरला होता. विश्वचषकात कमजोर नेदरलँड विरूध्द ४० चेंडूत विश्वविक्रमी शतक व अफगाणिस्तानच्या अननुभवी संघाविरूध्द महापराक्रमी द्विशतकी खेळी करणारा मॅक्सवेल समोर ढाण्या वाघ समोर आल्यावर शेळपटा सारखा शेपूट घालून परतला तेंव्हा त्याच्या त्या दोन खेळ्या किती फ्ल्यूक होत्या हे आपोआप सिध्द झाले. त्यानंतर टिम डेव्हीड व मार्कस स्टोईनसने कांगारूंच्या विजयाच्या आशा जागवल्या. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्याही लागलीच उध्वस्त केल्या.
             पहिल्या षटकात वीस धावा मोजाव्या लागल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने नियंत्रित मारा करून तीन बळी मिळवत भारताला सामन्यात परत आणले. तर पहिल्या सामन्यात सगळे गोलंदाज सडकून मार खात असताना टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या मुकेश कुमारचे दुसरे षटक २५ धावांचे गेले. मात्र चार षटकांच्या कोटयात ४३ धावा १ बळी अशी कामगिरी करत त्याने स्वत:ची इमेज सांभाळली. या सामन्यात रवि बिश्नोई पूर्ण तयारीनिशी आला हे त्याच्या तीन बळींवरून सिध्द झालेच. भारताच्या प्रत्येक गोलंदाजाला किमान एक बळी तरी मिळाला. शिवाय कर्णधार म्हणून सुर्यकुमार यादव यावेळी प्रगल्भ वाटला. त्याच्या प्रत्येक चाली यशस्वी ठरल्या. यशस्वी जयस्वालची धुवांधार खेळी त्याला सामनावीर ठरविण्यास पुरेशी ठरली. 
                 भारताने सुरवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली असून पुढील सामना जरी जिंकला तरी मालिका भारताच्या खिशात जाईल. परंतु यावरच समाधान न मारता व्हाईट वॉशचा विचार करून आगामी विश्वचषकासाठी भारताला मजबूत तयारी करून सर्व नव्या खेळाडूंना आत्मविश्वास उंचावता येईल. किप इट अप यंग ब्रिगेड !

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२.
close