shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आहे दीपप्रज्वलन



दीपावलीचा प्रकाश 
आहे दीपप्रज्वलन,
अंतरंगी उजळले 
हे जीवन संजीवन !

माणुसकीचे संदर्भ 
आहेत प्रकाशरात्री,
अमावसेच्या अंधारी 
 दान असावं सत्पात्री !

दिन दिन दिवाळी ही 
गायवासरांना जपू ,
नरकासूर मनात 
त्यालाच आधी संपवू !

  दिवाळीचा गोडवा हा 
  जनमनात रुजावा,
  ज्योतीने ज्योत लावू ही 
  माणूस मात्र पूजावा  !

माणुसकीचा उजेड 
आहे अर्थ दिवाळीचा ,
संकटात हात देऊ 
 क्षण हा देवदर्शनाचा !

   लक्ष्मीचे पूजन घरी 
   धनधान्य सोबतीला ,
   शेती मातीचे स्तोत्र हे
    सार्थ करी मानवाला !

तेजोमय दिवाळीचे 
सामर्थ्य माणुसकीला ,
जीवन म्हणजे गती 
अनुभवी प्रवाहाला !

   आनंदाचे,सुखाचे हे
    प्रकाशपर्व नात्यांचे ,
    आकाशकंदील दारी
     मोल सांगे संस्कृतीचे  !

दारोदारीच्या पणत्या 
सांगतात स्त्रीसन्मान ,
रांगोळीच्या रेषा रंगी 
अंगणाला देई मान !

  मानवी संस्कृती आहे 
   सत्य, शिव, सुंदराची ,
   दिवाळी सांगते अर्थ 
   पूजा करू निसर्गाची !

आहे दीपप्रज्वलन
ज्ञानदीप जगी लावू ,
माणसाला माणसाचे 
अंतरात देव पाहू !

दिवाळी पाडवा गोड
भाऊबीज आनंदाची,
पावित्र्य आणि चारित्र्य 
दिवाळी आहे प्रेमाची !

डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर - 9270087640

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close