shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डाव्या कालव्यातून पाझर तलाव तात्काळ भरून द्यावेत – माजी खा.वाकचौरे



अन्यथा शिवसेना UBT जन आंदोलन उभारणार – मुकुंद सिनगर

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात अत्यंत दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यावर्षी पर्जन्यमान पूर्णतः घटल्याने पालखेडच्या डाव्या कालव्यातून पूर्व भागातील पढेगाव, कासली, करंजी, बोलकी, अंचलगाव, ओगदी, शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, उक्कडगाव आदि गावातील पाझर तलाव तात्काळ भरून द्यावेत, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नाशिकचे पाठबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता सौ. शहाणे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. जर तात्काळ दखल घेतली नाही तर पूर्व भागातील संपूर्ण शेतकऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मोठे जनआंदोलन उभारणार असून हायकोर्टात हक्काचे पाणी मिळण्याबाबत याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर यांनी दिली आहे.
नुकताच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्यासह कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील उक्कडगाव येथील जागृत रेणुकामातेचे दर्शन घेऊन आपला  गाव भेट दौरा सुरु केला असून यावेळी गावागावात अनेक शेतकरी, कष्टकरी व छोट्या व्यावसायिकांनी आपल्या भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. अनेक ठिकाणी महिलांनी पुढे येऊन सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा पाढा वाचला. आपल्या मतदार संघातील सद्य परिस्थिती बघून मा.खा.वाकचौरे यांनी संताप व्यक्त करत फोनवर जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. एका बाजूला नैसर्गिक कोप आणि दुसऱ्या बाजूला सरकारची उदासीनता यात सर्वसामान्य जनता होरपळत असून आपण फक्त बघ्याची भूमिका घेणे योग्य नसल्याचे सांगत किमान आपल्या अधिकाराचा वापर जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी करा, अशा सूचना दिल्यात. यावेळी उपस्थित शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर यांनी शेतकरी वर्गाला धीर देत जर यावर कार्यवाही झाली नाही तर आपल्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने  मोठे जन आंदोलन उभारू आणि वेळप्रसंगी आपण हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह ग्राहक कक्षाचे उपजिल्हा संघटक अशोक पवार, उक्कडगावचे शाखाप्रमुख नंदु निकम, शिरसगावचे प्रवीण चौधरी, भोजडेचे शंकर सिनगर, धोत्रेचे अमोल शिंदे, तळेगावचे बबन वैद्य, आपेगावचे गायकवाड सर आदींसह ठिकठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close