बुधवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुंजेस्थित स्टेडियमवर युरोपातील दोन क्रिकेट संघ गतविजेता इंग्लंड व पात्रता फेरीतून आलेला नेदरलँड ( हॉलंड ) यांच्यातील सामन्यात इंग्लंडने विजय मिळविला खरा, परंतु तो त्यांच्या लौकिकाप्रमाणे नव्हता. तरी या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीवर एक कटाक्ष टाकला तर हा विजय मोठा दिसतो. कारण नेदरलॅंड जरी पात्रता फेरीतून आले असले तरी त्यांनी स्पर्धेतील हॉट फेव्हरीट दक्षिण आफ्रिकेला व धुळ चारली तर कसोटी दर्जा असलेल्या बांगलादेशचाही फडशा पाडला आहे. त्यामुळे या सामन्यात हॉलंडकडून चमत्कार घडला असता तर फारसं कोणीही नवल मानलं नसतं. उलट इंग्लंड जिंकल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
तसे पहाल तर इंग्लंडने विजय मिळवून स्वतःवरच उपकार केले आहेत, कारण या विजयामुळे ते गुणतालिकेत तळावरून चक्क सातव्या स्थानी आले आहेत, आणि सन २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पीयन्स ट्रॉफीमध्ये सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या आठ क्रमांकाच्या संघांनांच खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत त्यांचा आणखी एक साखळी सामना पाकिस्तान विरूद्ध होणे बाकी असल्याने त्यामध्ये सरस धावगतीसह विजय मिळवून ते पहिल्या आठ संघात आपली जागा पक्की करू शकतात.
हॉलंडवरील विजयात इंग्लंडकडून ज्या चमकदार खेळाची अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही. कारण त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते ते अजूनही सुटलेले दिसत नाहीत. इंग्लिश कर्णधार जोश बटलर, जॉनी बेअरस्टो हे आपला गमावलेला फॉर्म शोधतानाही दिसले नाहीत. नेदरलॅंडविरुद्धही ते हतबलच दिसले.
बेन स्टोक्स हा मुळचा न्युझिलंडचा खेळाडू असला तरी आता ता पूर्णपणे इंग्लंडवासी झाला आहे. सध्या तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून काही दिवसांपूर्वी सफेद चेंडूच्या म्हणजे वनडे व टि२० प्रकारातून निवृत्ती घेतली होती. परंतु इंग्लिश क्रिकेट बोर्ड ( इसीबी ) ने त्याला विशेष विनंती करून वर्ल्ड कप खेळण्यासाठी निवृत्तीतून परत बोलावले. परंतु सुरुवातीच्या सामन्यात त्याच्या बॅटने त्याला ठेंगा दाखविल्याने इंग्लंडच्या अपेक्षांना सुरुंग लागला, त्यामुळे त्यांची हालात बिकट बनली. स्टोक्स मुळचा अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याने गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतल्याने संघाला तो असून अडचण व नसून खोळंबा असल्याचाच प्रकार होता. त्यामुळे इंग्लंडची गोलंदाजीही मजबूत झाली नाही. त्यातच काही महत्वाचे गोलंदाज जखमी होऊन संघाबाहेर गेल्याने स्टोक्सच्या गोलंदाजीची इंग्लंडला सक्त गरज असतानाही तो गोलंदाजी न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळे इंग्लंडची मैदानावर पिछेहाट झालीच शिवाय संघाचे संतुलनही बिघडले.
या सामन्यात इंग्लंडची प्रथम फलंदाजी करताना बिकट परिस्थिती होती नेमके त्याच वेळेस बेन स्टोक्सच्या खेळात जान संचारली आणि त्याने शेवटच्या दहा षटकात जोरदार प्रहार करत व्यक्तिगत शतक ठोकून विश्वचषक स्पर्धेत शतकवीर होण्याचा बहुमान मिळविला. मात्र त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडला ३३९ धावांचे मोठे भांडवल उभे करता आले की ज्याच्या दबावात हॉलंडला चेपता येईल. इंग्लंडकडून डेव्हीड मालानची बॅटही चांगल्यापैकी तळपली. बाकी सर्व अलबेल ठरल्याने झाकली मुठ सव्वा लाखाची ठरली.
नेदरलँडची या स्पर्धेत चांगली कामगिरी झाल्यामुळे त्यांच्या फलंदाजांकडून तीव्र प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र त्यांचा पूर्वीचा जोश यावेळी दिसला नाही व १६० धावांचा मोठा पराभव त्यांच्या पदरी पडला. त्यामुळे गुणतालिकेत त्यांची थेट शेवटच्या स्थानावर घसरण झाली. साखळीतील त्यांचा शेवटचा साखळी सामना अव्वल क्रमांकावरील भारताशी होणार असल्याने व भारताचा विद्यमान खेळ बघता नेदरलॅंडच्या विजयाची शक्यता फारसी धुसर दिसते. त्यामुळे गुणतालिकेत ते तळालाच स्वतःचा वर्ल्ड कप २०२३ फिनिश करतील असेच दिसते. याचा तोटा त्यांना चॅम्पीयन्स ट्रॉफीत प्रवेश न मिळण्यावर होणार हे उघड आहे.
इंग्लंडला चॅम्पीयन्स ट्रॉफीत प्रवेश मिळवून या स्पर्धेत झालेल्या नाचक्कीची लाज राखायची असेल तर शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला हरविणे गरजेचे आहे. मात्र पाकिस्तानलाही तो सामना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जिंकणे गरजेचे असल्याने दोघांच्याही करिता तो सामना जीवन मरणाची लढाई ठरणार असल्याने या दोन पैकी एक संघ हसणार व एक रडणार हे मात्र पक्कं असेल.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

